Tuesday, March 29, 2011

फाशीची शिक्षा.

दूध भेसळ करणाराना फाशीची शिक्षा असावी असे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सुचवले असल्याचे वाचले. हा काय विनोद आहे?
भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली दूध भेसळ येत नाही काय? हल्ली तशा तक्रारी जास्त प्रमाणावर येत आहेत पण शासनाने कोणाकोणाला पकडले? किती जणांवर सध्याच्या कायद्यांखाली खटले भरले गेले? कोणाकोणाला किती शिक्षा झाली? गेल्या वर्षभरात असे काही कोणाच्या वाचनात आले आहे का? गुन्हा सिद्ध झाला पण शिक्षा मात्र कायद्यातील तरतूद थोडी असल्यामुळे पुरेशी झाली नाही असे आहे काय?
फांशीची शिक्षा खुनासारख्या अतिगंभीर गुन्ह्याला, ते सुध्हा Rarest of rare case असे कोर्टाचे मत झाले तरच दिली जाते. सेशन्स कोर्टात फाशी झाली तरी ती हायकोर्टात व पुढे सुप्रीम कोर्टात कायम व्हावी लागते. मग राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज होतो व पुढे काय होते हे सर्वांना माहीत आहे. दूध भेसळीबाबत एखाद्याला फाशीची शिक्षा होऊन तो खरोखरी फाशी जाईल असे सरकारला वाटत असले तर कमालच म्हटली पाहिजे.
मागे एकदा बलात्काराला फाशीची शिक्षा हवी असे अनेक ज्येष्ठ पुढारी खुशाल बोलून गेले. बलात्काराचे खटले नीट चालवले जावे, बलात्कारित महिलेला उलटतपासणीमध्ये ज्या विटंबनेला तोंड द्यावे लागते ती थांबवावी, गुन्हा सिद्ध झाल्यास आमरण तुरुंगवासाची शिक्षा असावी असे कुणाला वाटत नाही. थेट फाशीच! एक तरी बलात्कार करणारा खरोखरी फाशी जाईल काय याचा कोणी विचार करत नाही. Whom are the 'so-called' leaders kidding?

1 comment:

  1. आणखीही बातम्या आहेत हो....
    नोट फाडली किंवा नाणी वितळवली तर ७ वर्षे शिक्षा.
    रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्यास दंड...

    बहुधा गेले कित्येक वर्ष नवीन नियम/कायदे निघाले नसतील म्हणून एका मागोमाग एक कैच्याकै नवनवीन सुचवण्या आहेत.

    ReplyDelete