Friday, September 21, 2012

रशियन गॅस आणि दाभोळ बंदर.

रशियन गॅस रशियामध्ये नैसर्गिक वायु (Natural Gas) फार मोठ्या प्रमाणावर मिळतो. इतका कीं देशाची गरज भागून तो मोठ्या प्रमाणावर निर्यातहि केला जातो. गॅझप्रॉम या सरकारी कंपनीला याबाबत सर्वाधिकार आहेत. मुख्यत्वे ही निर्यात पूर्व-युरोपीय देशांना होते. त्यासाठी पाइप-लाइन्स टाकलेल्या आहेत. काही थोड्या प्रमाणावर रशिया हा गॅस जपानलाहि विकतो. जपानची उर्जा-भूक मोठी आहे व अणुविद्युत केंद्रांच्या अडचणीमुळे जपानला मिळेल तेवढा रशियन गॅस हवाच आहे. व्लाडिओस्टॉक या शहराचे नाव आपण कधीतरी वाचलेले असते. हे रशियातील सर्वात पूर्वेकडील बंदर आहे. प्रख्यात ट्रान्स-सैबेरियन रेल्वेचे हे अतिपूर्वेकडील अखेरचे स्टेशन आहे. गॅझप्रॉम आणि जपान सरकार यांच्यात हल्लीच एक करार झाला. त्या अन्वये येथे गॅझप्रॉम १३ बिलियन डॉलर खर्च करून एक गॅस टर्मिनल बांधणार आहे. मग समुद्रमार्गे येथून मोठाल्या जहाजातून Liquified Natural Gas (LNG) जपानला रवाना होईल. रशिया व जपान हे एकेकाळचे कट्टे शत्रु पण आर्थिक गरजा सर्वांवर मात करत असतात! भारतातहि परदेशातून LNG आणण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी मोठाल्या जेटी बांधण्यात आल्या आहेत व नवीनहि बांधल्या जात आहेत असे वेळोवेळी वाचनात येते. ENRON मुळे बदनाम झालेल्या दाभोळ बंदरातहि अशी एक मोठी जेटी कार्यान्वित झाल्याचे वाचले होते मात्र काही अडचणी आल्यामुळे ते काम बंद पडले होते. पुढे दाभोळपासून कर्णाटकापर्यंत गॅस नेण्यासाठी पाइपलाइन टाकली जाणार असेहि वाचले होते. मुळात हा गॅस दाभोळच्या पॉवरस्टेशन साठी वापरावयाचा होता. पण आता? आता दाभोळ महाराष्ट्रात, गॅस कर्णाटकात, सरकार आनंदात!

Saturday, September 15, 2012

सोलर पॉवर


अमेरिकेत वॉलमार्ट सारखी दुकानांची मालिका असलेल्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची दुकाने अवाढव्य असतात आणि साधारणपणे ही सर्व एकमजली इमारतीत असतात त्यामुळे त्यांच्या छपरांचे क्षेत्रफळ अफाट असते.
अशा अनेक दुकानांतून आता एक नवीनच बदल दिसून येऊ लागला आहे तो म्हणजे छपरांचा वापर सोलर विद्युतनिर्मितीसाठी करणे. छपराच्या विस्तीर्ण पसार्‍याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर सोलर र्पॅनेल्स बसवली जातात. उत्पन्न होणार्‍या ऊर्जेचा वापर त्याच दुकानातून होत असल्यामुळे, साठवणे, दूर पाठवणे वगैरे भानगडी टळतात व त्यातून होणारा ऊर्जेचा व्ययहि टळतो.
अशा प्रकारे निर्माण होणार्‍या उर्जेचे प्रमाण फार झपाट्याने वाढते आहे. वॉलग्रीन कंपनीने देशभरात आपल्या १३४ दुकानांवर सोलर पॅनेल्स बसवली आहेत. वॉलमार्ट, कॉस्टको, कोह्ल अशा इतर कंपन्याहि तसे करत आहेत. IKEA या फर्निचर कंपनीनेहि वर्ष अखेरपर्यंत आपल्या सर्व दुकानांवर पॅनेल्स बसवण्याचे हाती घेतले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निरनिराळ्या कंपन्यांच्या ३,६०० ठिकाणी सोलर पॅनेल्स बसली आहेत. वॉलमार्टच्या १०० चे वर दुकानांवर बसलीं आहेत व एकूण १,००० प्रचंड दुकानांवर २०२० अखेरपर्यंत पॅनेल्स बसतील!
वॉलमार्ट, पॅनेल्सप्रमाणे Wind Turbines चाही उपयोग करूं पाहते आहे. रेड ब्लफ कॅलिफोर्निया येथील Distribution Center पाशी त्यानी १ मेगावॉट चे मोठे Turbine बसवले आहे.हे सर्व वाचून मला प्रश्न पडला कीं असे काही भारतात कां होत नाही? मोठी दुकाने नाहीत पण कारखान्यांची प्रचंड छपरे आहेत, रेल्वेचे प्लॅट्फॉर्म आहेत. या सर्वांवर A C Sheets असतात. त्यांवर पॅनेल्स नक्कीच बसवता येतील. खालील भागात उष्णता कमी जाणवेल आणि निर्माण होणारी उर्जा तेथेच वापरता येईल. कोणाला तरी सुचेल अशी आशा करूं या.

Thursday, September 13, 2012

तेल आणि पाणी
जगातील यापुढील काळातील झगडे वा युद्धे पाण्यासाठी होतील असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय काही बातम्यातून नजरेला येऊ लागला आहे.
अमेरिकेत काही भागात दुष्काळी परिस्थिति आहे व पाण्याची टंचाइ जाणवत आहे असे बर्‍याच बातम्यांतून जाणवते. त्याचे एक उदाहरण वाचण्यात आले.
अमेरिकेत हल्ली भूमिगत तेलासाठी विहिरी खोदण्याचे काम अनेक भागात चालू आहे. हे भूमिगत तेल हे तेलाच्या कायम वाढणार्‍या मागणीवरचे उत्तर ठरेल अशी आशा येथे बाळगली जाते. याचे उत्पादन झपाट्याने वाढते आहे. मात्र हे तेल जुन्या तेलविहिरींप्रमाणे जमिनीत खोलवर विहीर खोदल्यावर आपोआप उसळी मारून वर येत नाही. शेल नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या खडकात हे दडलेले असते व ते खडक फोडून मिळवावे लागते व त्यासाठी अतिशय उच्च दाबाने त्या खडकात पाणी चेपावे लागते. तेल मिळवण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे तेथेच या विहिरीहि खोदल्या जात आहेत त्यामुळे तेल कंपन्या व त्या भागातील शेतकरी / रहिवासी यांच्यात तणाव निर्माण होतो.
पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतांचा ताबा मिळवण्यासाठी झगडे होऊ लागले आहेत. तेल कंपन्या पाण्यासाठी वाटेल तेवढा भाव मोजू शकतात आणि म्युनिसिपॅलिट्यांकडून पाणी विकत घेतात. म्यु. ना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला आहे पण शहरी नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे! शेतकर्‍यांनाही पाण्याचे वाढीव भाव परवडत नसल्यामुळे चिंता उत्पन्न झाली आहे.

Matthew Staver for The New York Times
Bob Bellis filled his tanker at a hydrant in Greeley, Colo., in August to supply a drilling site. Lease deals with oil companies are important revenue sources for cities.


फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या हायड्रंटला पाइप लावून पाणी भरून घेत असलेला टॅंकर दिसतो आहे. टॅंकर भरला कीं ड्रायव्हर तो घेऊन कच्च्या रस्त्याने तेल-विहिरीच्या ठिकाणी जाऊन पाणी विकणार व रिकामा टॅंकर लगेच परत येणार!
भारतात टॅंकर लॉबी हेच करते. ‘दुष्काळ सर्वांनाच आवडतो’ म्हणे.

Friday, September 7, 2012

दोन बातम्या

न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी पकडणे हे एक कठीणच काम असते, विशेषतः गर्दीच्या वेळेला. टॅक्सी रिकामी असली तर ड्रायव्हरचे लक्ष वेधून घेण्यासाठी, लोक शिट्टी वाजवणे, हातवारे करणे, चुटक्या वाजवणे, हात उंच उचलून धरणे असे अनेक प्रकार करतात. मुंबईत आपणहि असेच करतो. मुंबईतील टॅक्सीवाले, आपल्याकडे खुशाल दुर्लक्ष करून वा मान फिरवून निघून जातात तसे मात्र न्यूयॉर्कमध्ये कायद्याने करता येत नाही. गिर्हाईक नाकारणे हा गुन्हा मानला जातो.
रस्त्यावर टॅक्सी पकडणे ठीक आहे पण घर, दुकान किंवा ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वीच टॅक्सी हुकमी बोलावता आली तर जास्त चांगले ना? स्पेशल महागड्या टॅक्स्या तशा ठरवता येतात पण साधी पिवळी किंवा काळी/पिवळी टॅक्सी न्यूयॉर्कमध्ये तशी मिळत नाही. आता मोबाइल फोन सर्वत्र झाले आहेत पण गाडी चालू असताना टॅक्सीवाल्याना मोबाइल वापरण्याची बंदी आहे.
आता उबर नावाच्या कंपनीने नवीन स्मार्टफोन application बनवले आहे. त्याच्या सहाय्याने गिर्हाईक व टॅक्सी-ड्रायव्हर याना संपर्क साधता येतो. गिर्हाइकाने कंपनीशी संपर्क साधला कीं, त्याच्या जवळपास असलेल्या रिकाम्या टॅक्सीच्या ड्रायव्हरला कळवण्यात येते व त्याने भाडे स्वीकारले कीं त्याने कळवलेल्या ठिकाणी जाऊन गिर्हाइकाला गाठावयाचे. वाटेत इतर कोणी बोलावले तरी थांबायचे नाही. सध्या सुरवातीला फक्त १०५ टॅक्सीवाल्यानी हे उपकरण घेतले आहे पण लवकरच दर आठवड्याला आणखी १०० टॅक्सीची भरती अपेक्षित आहे. आणखी काही कंपन्यानीहि अशीच उपकरणे बनवलेली आहेत व तींहि बाजारात येत आहेत. मुंबईप्रमाणेच न्यूयॉर्कमध्येहि अशा विषयांवर टॅक्सी युनियन्सची भूमिका सहकार्याची नाही! कायदेशीर कटकटी चालू आहेत.
पण अखेर, म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाहीच!


घुसखोर परकीय हा अमेरिकेत एक गंभीर प्रश्न आहे. त्याचे अनेक पैलू आहेत.
मागील एका लेखात, प्रेसिडेंट ओबामाने बेकायदेशीर रहिवाशांसाठी हल्लीच जाहीर केलेल्या एका सवलतीबद्दल लिहिले होते. बालवयात पालकांबरोबर (बेकायदेशीरपणे) अमेरिकेत आलेल्या, पण पुढे अनेक वर्षे इथे राहून शिक्षण घेतलेल्या वा लहानमोठी नोकरी वा व्यवसाय करणार्या लोकांसाठी प्रेसिडेंटने एक सवलत जाहीर केली कीं अशा व्यक्तींचा रेकॉर्ड स्वच्छ असेल तर त्याना २ वर्षांसाठी रहिवासी परवाना दिला जाईल. पुढे काय ते नक्की नसूनहि मोठ्या प्रमाणावर अनेक शहरातून अशा अनेक व्यक्ति अर्ज करण्यासाठी पुढे आल्या आहेत.
मात्र ही नाण्याची एक बाजू आहे. १९९६ पासून असा कायदा आहे कीं कोणीहि अ-नागरिक, मग तो कायदेशीर कायम रहिवासी (legitimate green card holder) कां असेना, एखाद्या क्षुद्र गुन्ह्यासाठी जरी पूर्वी कधी पकडला गेलेला असला तरी त्याला अमेरिकेत प्रवेश द्यावयाचा नाही! या कायद्याचे काही परिणाम अनर्थकारक आहेत.
Marco Marino Fernandez हा फक्त ५ महिन्यांचा असताना कायदेशीरपणे आपल्या पालकांबरोबर चिलीहून अमेरिकेत आला. इतर अनेक कायदेशीर रहिवाशांप्रमाणे त्यानेहि अमेरिकन नागरिकत्व मात्र घेतले नव्हते. ३५ वर्षांचा होईपर्यंत त्याने अमेरिकेत वास्तव्य केले, येथेच तो शिकला, साहजिकच इंग्रजी उत्तम जाणतो, चिली देशाशी त्याचा काहीहि संबंध उरलेला नाही, काही दूरचे नातेवाईक सोडून तो तेथे इतर कोणालाहि ओळखत नाही. २००६ साली परदेशातून सुट्टी संपवून परत अमेरिकेत आला तेव्हा त्याने आपले green card पुढे केले. रेकॉर्ड तपासता त्याने पूर्वी काही किरकोळ गुन्हे केलेले दिसले. त्याला प्रवेश नाकारून दीर्घकाळ अडकवून ठेवले आणि न्यायिक चौकशीअखेर चिलीला पाठवून दिले! तेथे त्याने काय करावे? पुढे अमेरिकेत त्याची आई वारली तर तिच्या फ्युनरलसाठीहि त्याला अमेरिकेत येऊ दिले नाही! हा कायदा योग्य कीं अयोग्य? नक्की सांगणे अवघड आहे.
अशा लाखोंनी घटना झाल्या आहेत २००१ ते २०१० दरम्यान अशा १० लाखाहून जास्त लोकाना अमेरिकेबाहेर जावे लागले आहे. १९९६ पूर्वी अशा केसेसमध्ये जज्जाना काही निर्णयस्वातंत्र्य होते त्यामुळे गुन्हा कितपत गंभीर होता हे विचारात घेऊन, योग्य वाटल्यास, सवलत देता येत असे. आता तसे नाही. परिणामी अनेक देशांमध्ये असे अमेरिकेतून घालवून दिलेले लोक आढळतात. त्यांची अवस्था, मायदेशाला मुकलेला आणि अमेरिकेने नाकारलेला अशी. ना घरका ना घाटका!

Saturday, September 1, 2012

कबुलीजबाबातून सत्य.

गिल्बर्ट व्हेगा हा पीटर रोलॉक नावाच्या गुंडाच्या टोळीतील सराइत गुंड. २००३ सालीं एका प्रकरणात पकडला गेल्यावर शिक्षा कमी व्हावी म्हणून त्याने पोलिसांशी सहकार्य केले. त्याने अनेक गुन्ह्यांच्या कबुल्या दिल्या त्यात एका बर्याच जुन्या घटनेचा उल्लेख केला. त्याच्या टोळीचा त्यात काही संबंध नव्हता. तो आणि दुसरा एकजण यानी एका खासगी टॅक्सीच्या ड्रायव्हरला लुबाडले, मारहाण केली होती व गोळी घातली होती.
ह्या माहितीच्या आधारे तपास करता असे आढळून आले कीं प्रत्यक्षात, न्यूयॉर्कच्या ब्रोंक्स भागातील ५ इतर भलत्याच माणसाना त्या खुनाच्या गुन्ह्यासाठी दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली होती!
१९९७ साली पीटर रोलॉकला पकडण्यात यश आल्यानंतर त्याला अनेक गंभीर गुन्ह्यांच्या आरोपासाठी तुरुंगात पाठवले गेले. त्याचा एक साथीदार रॉड्रिग्ज याने पकडले गेल्यावर पोलिसांशी सहकार्य केले व टोळीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली होती. (व्हेगा त्यावेळी पकडला गेला नव्हता)
खरे तर शिक्षेतून सूट मिळण्यासाठी पोलिसाना सहकार्य करायचे तर एकूणएक सर्वच गुन्ह्यांची कबुली द्यायची असते. त्या सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा सुनावताना, पोलिसांच्या रदबदलीमुळे, न्यायाधीश थोडीफार सूट देतात. वर उल्लेखिलेल्या ड्रायव्हरच्या खुनामध्ये गिल्बर्ट व्हेगाबरोबर रॉड्रिग्जचाही सहभाग होता. मात्र त्या गुन्ह्याची रॉड्रिग्जने कबुली दिलेली नव्हती! त्या सर्व खटल्यात पोलिस अधिकारी जॉन ओ-मॅले याचा मुख्य भाग होता.
ड्रायव्हरच्या खुनाच्या गुन्हयासाठी ५ भलत्याच लोकाना मोठी शिक्षा झाली होती. त्यातल्या एरिक ग्लिसॉन नावाच्या एका कैद्याने सिंगसिंग तुरुंगातून आपण निरपराध असल्याचा दावा करणारे एक पत्र मे २००३ मध्ये सरकारकडे पाठवले ते योगायोगाने जॉन ओ-मॅले कडेच आले. गिल्बर्ट व्हेगाने दिलेल्या कबुलिजबाबाचीहि माहिती त्याला मिळाली. मात्र व्हेगाला ड्रायव्हरचे नाव माहीत नव्हते व त्याला गोळी घातली खरी, पण तो मेला काय, हेहि माहीत नव्हते! त्याने रॉड्रिग्जचे नाव घेतले नव्हते. त्यामुळे त्याच्या कबुलिजबाबाचा संबंध जोडणे सरळ-सुलभ नव्हते. जॉन ओ-मॅले याने रॉड्रिग्जची भेट घेतली. त्याने अखेर कबूल केले कीं त्याने आणि गिल्बर्ट व्हेगाने मिळूनच त्या ड्रायव्हरला मारहाण केली व गोळी घातली होती!. ‘तूं पूर्वीच्या कबुलिजबाबात या गुन्ह्याचा का उल्लेख केला नाहीस?’ असे विचारल्यावर त्याने म्हटले कीं हा गुन्हा कधी उघडकीस येईल असे मला वाटले नव्हते. आपण आणि गिल्बर्ट व्हेगा सोडून इतर कुणाला ते माहीत नव्हते. त्या दोघानी आपसात शपथ घेतली होती कीं याची कधी वाच्यता करावयाची नाही कारण टोळीप्रमुख पीटर रोलॉकला कळले तर अनावश्यक गुन्हे करून पोलिसांचे आपल्या टोळीकडे लक्ष वेधून घेतल्यामुळे त्याच्या रागाला तोंड द्यावे लागेल!
रॉड्रिग्ज आणि व्हेगा यांचा गुन्हा एकच असला तरी त्यानी कोणाला मारले याचे सूत्र जॉन ओ-मॅलेला गवसत नव्हते पण मे महिन्यातील ग्लीसनचे पत्रहि त्याच्याचकडे आल्यामुळे उलगडा झाला. आता पुढील सोपस्कार चालू राहून त्या पांच जणाना त्यानी न केलेल्या गुन्ह्यांबद्दल झालेल्या शिक्षेतून सुटका होण्याची शक्यता आहे. (मुळात त्याना शिक्षा कशी झाली हे एक वेगळेच कोडे आहे!)
अमेरिकेतील पोलिसतपास, गुन्हेगारांचे खरेखोटे कबुलीजबाब, न केलेल्या अपराधांबद्दल मोठाल्या शिक्षा, यातील न्याय-न्याय, या प्रकरणांचे विश्व हे असे आहे! भारतापेक्षा हे चित्र बरे कीं वाईट हे वाचकानीच ठरवावे!