Sunday, January 22, 2012

नाव्हा नाकोर्न

जग आता किती एकत्र जोडले गेले आहे आणि किती परस्परावलंबीहि झाले आहे याचा एक नमुना आज वाचला. गेल्या वर्षी पावसाळ्यात थायलंडमध्ये फार मोठे पूर आले. याच्या बातम्या व फोटो आपण पाहिल्या होत्या. त्याच्या भीषणतेची पुरेशई कल्पना आपल्याला नुसते फोटो पाहून आलेली नसणार. त्या पुराचा एक परिणाम आजच्या एका बातमीत दिसला. थायलंडची राजधानी बॅंकॉक. या शहराच्या जवळ एक खास इंडस्ट्रियल झोन आहे. त्याचे नाव Nava Nakorn. या झोनमध्ये अनेक कारखाने आहेत. जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी येथे उत्पादन चालवले आहे. या झोनला गेल्या पावसाळ्यातील या भीषण पुराचा फार मोठा फटका बसला व येथील कारखान्यांची अपरिमित हानि झाली. पूर संपून महिने लोटले मात्र तरीहि या झोनमध्ये परिस्थिति सुधारलेली नाही. रस्ते उखडलेले आहेत. कारखान्यांमधील फुकट गेलेली यंत्रसामग्री, फर्निचर, कागदपत्रे, रस्त्यांवर टाकलेलीं आहेत. या झोनमधील २२७ कारखान्यांपैकी फक्त १५% ठिकाणी काम सुरू झाले आहे. कॅंबोडियातून आलेले मजूर चिखल उपसणे कचर्‍याची विल्हेवाट लावणे यांत मग्न आहेत.
विषेश गोष्ट म्हणजे, या झोनमध्ये जगाच्या एकूणपैकी ४० ते ४५ टक्के Hard Disk Drives बनत होते! त्यांचे उत्पादन बंद पडले आहे व पूर्वपदावर येण्यास आणखी किती काळ लागेल हे सांगता येत नाही. कदाचित सप्टेंबर उजाडेल! परिणामी HDD च्या किमती अमेरिकेत ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
या झोनमधील कारखान्यांपुढे दुसरी चिंता आहे कीं असेच महापूर या झोनमध्ये पुन्हा-पुन्हा येणार का? सरकारी प्लॅन असा आहे कीं सप्टेंबरपर्यंत या झोनभोवती प्रचंड अशी पुरनियंत्रक भिंत बांधायची!. तिचे दरवाजेहि पाण्याचा थेंबहि आत येणार नाही असे सीलबंद असणार.
कारखाने जीव मुठीत धरून पुन्हा नव्याने उभे राहतीलच. HDD पुन्हा बनू लागतीलच. कारण कॉम्प्यूटरवर चालणारे जग HDD शिवाय कसे चालणार?

Friday, January 20, 2012

कथा डेट्रॉइट आणि विचिटा ची

अमेरिका ही कारखानदारीबद्दल प्रख्यात. मोटरगाड्या आणि विमाने बनवणारे प्रचंड कारखाने येथे आहेत. डेट्रॉइट हे शहर मोटरगाड्यांच्या कारखान्यांचे आगर अशी त्याची ख्याति. येथील नागरिक पिढ्यानपिढ्या याच व्यवसायात गुंतलेले. मध्यमवर्ग खूप वाढलेला कारण या व्यवसायातील पगार चांगले. शहराची वर्षानुवर्षे भरभराट होत होती. मात्र गेली काही वर्षे अमेरिकन मोटरव्यवसायाला उतरती कळा लागलेली आहे. परिणामी डेट्रॉइटमधील अनेक लहानमोठे कारखाने बंद पडले आहेत. शहरावर एक औदासीन्याची अवकळा पसरली आहे. शहराची लोकवस्ती झपाट्याने कमी झाली आहे. या व अशाच अनेक बातम्या वाचनात आलेल्या होत्या. आज एक वाचावयास मिळाले कीं डेट्रॉइटमध्ये स्क्रॅप जमवण्याचा व विकण्याचा व्यवसाय जोरात आहे. बंद पडलेले व रिकामे टाकून दिलेले अनेक लहानमोठे कारखाने या शहरात आहेत. त्यांची छ्परे वा कॉलम/बीम्स पाडून व कापून स्क्रॅप जमा करून विकणार्‍या काही तरुणांच्या टोळ्या हे काम रात्रंदिवस पद्धतशीरपणे करत आहेत. इतर ठिकाणांहूनहि बेकारीने गांजलेली माणसे त्यात सामील होत आहेत. टेलिफोनच्या तारा पाडून आणि कापून तांब्याचे स्क्रॅप विकण्याचेहि काम जोरात चालले होते व टेलिफोन बंद पडण्याच्या तक्रारी फार झाल्यामुळे पोलिसाना खास कारवाई करावी लागली. मुंबईच्या रस्त्यांवरून व वस्त्यांमधून स्क्रॅप जमवणारी अनेक माणसे फिरत असतात व त्यातून थोडेफार पोटाला मिळवतात. रस्त्यावर पडलेली कॉन्क्रीटची तुटकी मॅनहोल कव्हर्स व पाइप दिवसभर फोडत बसून आतील लहानसे लोखण्डी वायरचे वा बारचे तुकडे जमवून नेणारी मुलेहि दिसतात त्यांची मला आठवण आली.
त्यातच, कान्सास राज्यातील विचिटा या शहरातील बोइंग कंपनीचा मोठा कारखाना एक वर्षानंतर बंद होणार आहे अशीहि बातमी दिसली. गेल्या वर्षी बोइंग कंपनी, लढाऊ विमानाना हवेतच इंधन पुरवठा करण्याचे काम करणार्‍या नवीन प्रकारच्या विमानांच्या बांधणीचे खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या खटपटीत होती. त्या वेळेला अशी अपेक्षा होती कीं यामुळे विचिटातील कारखान्यात अनेक नवे जॉब निर्माण होतील. या कारणास्तव कंपनीला राजकीय पाठिंबाही मिळत होता. आता कंपनीला ते काम मिळाले आहे पण ते विचिटातील कारखान्यात होणार नाही. हा कारखाना चालवणे परवडत नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. विचिटा हे विमान कारखान्यांचे शहर आहे. मात्र बोइंगशिवाय इतर कंपन्यांचे कारखाने लहान आहेत. गेली ८० वर्षे बोइंगच्या कारखान्यात काही घराण्यांच्या २-३ पिढ्यांनी नोकर्‍या केल्या व हा आपला कारखाना असे मानले. त्यांच्यात नैराश्य पसरले आहे व कंपनीने आपणाला फसवले अशी भावना आहे. विचीटा शहर डेट्रॉइटच्या मार्गाने चालले आहे कीं काय असे वाटते.
मुंबईतील कापडगिरण्या, जवळपास सर्वच, २०-३० वर्षांमध्ये बंद पडलेल्या पाहिलेल्या माझ्यासारख्याला यात नवीन काही नाही. मात्र ‘एकहि कारखाना बंद होऊ दिला जाणार नाही’ अशी खोटी व पोकळ आश्वासने येथे कोणी देत नाही!

Monday, January 16, 2012

नोमची सुटका

अमेरिकेच्या अलास्का राज्यात एक नोम नावाचे गाव आहे. ते एक आर्क्टिक समुद्रकाठावरील बंदर आहे. हिवाळ्यामध्ये आर्क्टिक समुद्र गोठला कीं हे गाव एकाकी पडते कारण येथे जाण्यासाठी रस्तेच नाहीत! मग येथे माणसे वा मालाची वाहतूक बंद पडते. थंडीचा काळ संपेपर्यंत पुरेल एवढे खनिज तेल व इतर सर्व माल आधीच भरून ठेवावा लागतो. गावाची वस्ती अर्थातच थोडी आहे. फक्त ३,५००.
यंदा काहीतरी गडबड झाली आणि पेट्रोल-डिझेलचा शेवटचा हप्ता वेळेवर येऊन पोचलाच नाही!पंचाइत झाली!आता थंडीचा काळ कसा काढणार?
काही दिवसांपूर्वी रशियाच्या व्ह्लाडिव्होस्टॉक बंदरातून Renda नावाची एक टॅंकर ‘नोम’ साठी तेल घेऊन निघाली होती पण नोमच्या दक्षिणेला असलेल्या 'डच हार्बर' नावाच्या एका अलास्कातीलच बंदरापर्यंत आल्यावर पुढे समुद्र गोठलेला असल्यामुळे तिला नोमकडे जाताच येईना! मग अमेरिकन कोस्ट-गार्डची एक आइस-ब्रेकर Healy तिच्या मदतीला धावली. मग हीली बर्फ फोडत पुढे आणि तिने बर्फात करून दिलेल्या वाटेवर रेंडा तिच्या मागे असा प्रवास ४ जानेवारी पासून सुरू झाला. मात्र काही वेळा हीली बर्फ फोडून पुढे सरकते तों लगेचच पाठचा बर्फ पुन्हा एकत्र येऊन रेंडाची वाट बंदच असाही प्रकार होत होता.हीलीची ताकद कमी पडत होती. मैला-मैलाने प्रगति चालू होती. काही वेळा पीछेहाटहि होत होती. १४ जानेवारीला अखेर रेंडा नोम बंदरापर्यंत येऊन पोचली अशी बातमी आली आहे. मात्र अजूनहि रेंडा धक्क्याला लागू शकत नाही! दूर समुद्रात बर्फात अडकून उभी आहे. आता तेथूनच एक मैल अंतरावरून भल्यामोठ्या लांबलचक होझपाइपने सर्व तेल नोम ला पोचवले जाणार आहे. ते यशस्वीपणे पार पडले म्हणजे नोम वाचले असे होईल!
१००-१२५ वर्षांपूर्वी असेच एकदा नोम बंदर गोठले व मग तेथे एक साथीचा रोगहि उद्भवला पण औषधे पोचवणे कसे जमणार हा प्रश्न होता. तेव्हाहि रशियाच्या व्ह्लाडिव्हॉस्टॉक मधूनच रेनडियरनी ओढायच्या गाड्यानी बर्फावरून शेकडो मैल प्रवास करून नोम ला वाचवले होते त्याची यावेळी सर्व जण आठवण काढत आहेत. अमेरिकन Coast Guard ने प्रसिद्ध केलेला एक नकाशा व एक-दोन फोटो येथे देत आहे त्यावरून खुलासा होईल.
रेंडा

हीली आणि रेंडा

Saturday, January 14, 2012

रंगांची उधळण

न्यूयॉर्क टाइम्स मधील एका बातमीतील काही मजकूर खाली जसाच्या तसा देत आहे. त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. मुलानी केलेल्या रंगांच्या उधळणीचे तीन फोटो त्याखाली पहावयास मिळ्तील. खोलीचे क्रमाने बदलत गेलेले रूप आपणाला नक्की आवडेल

This December, in a surprisingly simple yet ridiculously amazing installation for the Queensland Gallery of Modern Art, artist Yayoi Kusama constructed a large domestic environment, painting every wall, chair, table, piano, and household decoration a brilliant white, effectively serving as a giant white canvas. Over the course of two weeks, the museum’s smallest visitors were given thousands upon thousands of colored dot stickers and were invited to collaborate in the transformation of the space, turning the house into a vibrantly mottled explosion of color.

Wednesday, January 11, 2012

अडवणूक

अमेरिकेतील राजकारण परक्या देशातील माणसाला कळणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्षच प्रेसिडेंट ओबामाची प्रत्येक गोष्टीत अडवणूक करतो असे नाही. हल्लीच एक बातमी वाचली ती अशी कीं प्रेसिडेंट ओबामा यानी एका वरिष्ठ कोर्टावर जज्ज म्हणून एका स्त्रीची केलेली नेमणूक एका डेमोक्रॅटिक सिनेटरने अडवून ठेवली आहे!
या सिनेटरचे नाव आहे रॉबर्ट मेनेंडेझ व त्या स्त्रीचे नाव आहे पॅटी श्वार्झ. ऑक्टोबर महिन्यात ही नेमणूक केली गेली. या स्त्रीला वकिलीचा व जज्ज म्हणून कां करण्याचा दीर्घ अनुभव आहे. अमेरिकन बार असोसिएशनने तिच्या नेमणुकीचे स्वागत केले आहे. मात्र प्रेसिडेंटने केलेल्या अशा नेमणुकीला सिनेटच्या ज्युडीशिअरी कमिटीची नियमाप्रमाणे मान्यता लागते. त्यासाठी कमिटीच्या चेअरमन (सिनेटर पत्रिक लिहे) ने सभाच बोलावलेली नाही. सिनेटच्या एका प्रथेप्रमाणे संबंधित राज्याच्या दोन्ही सिनेटर्सनी लेखी मान्यता दिल्याशिवाय ही सभा होणार नाही. एका सिनेटरने मान्यता कळवली आहे मात्र मेनेम्देझ याची मान्यता मिळालेली नाही.
मान्यता न देण्याचे कारण वैयक्तिक आहे असे बातमीत म्हटले आहे. श्वार्झ यांचे एक ‘मित्र’ जेम्स नोबेल यांनी २००६ साली मेनेदेझ यांचे विरुद्ध एका भ्रष्टाचार संबंधी तक्रारीच्या संदर्भात त्याना समन्स बजावले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यावेळची सिनेटची निवडणूक मेनेदेझ याना जड गेली. नोबेल यांच्यावरचा राग श्रीमती श्वार्झ याना भोवतो आहे. अर्थात मेनेदेझ यांनी हे कारण नाकारले आहे हे सांगणे नलगे!
असे येथील राजकारण चालते!

Friday, January 6, 2012

नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड

अमेरिकेत एक नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड आहे. कामगारांच्या प्रश्नांसंबंधीं त्याला अनेक अधिकार आहेत. त्याचे पांच सभासद असतात व प्रेसिडेंट त्यांची नेमणूक करतो पण अमेरिकेच्या घटनेप्रमाणे त्या नेमणुकीला सिनेटची मान्यता लागते. तीच तर गोची आहे. गेल्या वर्षी या बोर्डाववर दोनच सभासद उरले होते व म्हणून प्रेसिडेंट ओबामाने Craig Becker या तिसर्‍या सभासदाची नेमणूक केली होती. सिनेटचे सेशन चालू नसेल तेव्हा अशी नेमणूक प्रेसिडेंटला आपल्या अधिकारात करता येते. त्या मेंबरची मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती.
इथल्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय पूर्वी केला आहे कीं पांच सभासदाच्या या बोर्डाचे निदान तीन सभासद उपस्थित असल्याशिवाय त्याला कामगारविषयक विवादांवर निर्णय घेता येणार नाही. या नियमामुळे १ जानेवारी २०१२ पासून बोर्डाचे काम ठप्प होणार होते. कामगारांचे प्रश्न अडकून रहाणार होते. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्ष अल्पमतात आहे तरीही कामकाजाच्या नियमांमुळे प्रेसिडेंटने केलेली नेमणूक नाकारण्याचा त्या पक्षाला अधिकार मिळतो! सध्या येथील राजकारण असे चाललेले आहे कीं प्रेसिडेंट ओबामाला काहीही करू द्यायचे नाही हे रिपब्लिकन पक्षाचे निश्चित धोरण आहे!! त्यामुळे ओबामा याना नवीन मेंबर नेमताच येणार नव्हता!
हीच परिस्थिती ग्राहक हितरक्षक अशा एका नवीन बोर्डाचीही होती. एक वर्षापूर्वी कायदा होऊन बोर्ड अस्तित्वात येऊनही डायरेक्टर नेमला गेलेला नसल्यामुळे बोर्ड काम करू शकत नव्हते. आणि ओबामांना ज्याची नेमणूक करायची होती तिला रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळणार नव्हती!
आता २०१२ साली अध्यक्षाची निवडणूक व्हावयाची आहे. त्यामुळे ओबामांची अडवणूक करणे हा एक कलमी कार्यक्रम रिपब्लिकन पक्ष चालवत आहे. या पेचप्रसंगातून प्रेसिडेंट ओबामांनी मार्ग काढला तो असा.
नववर्षाच्या सुरवातीलाच सिनेट Adjourn झालेले आहे असे पाहून आपल्याला घटनेप्रमाणे अशा काळात असलेले खास अधिकार वापरून अध्यक्षाने तीन लेबर बोर्ड मेंबर व एक ग्राहक हितरक्षक बोर्डाचा डायरेक्टर यांची सरळ नेमणूकच करून टाकली आणि रिपब्लिकन पक्षाच्या अडवणुकीच्या धोरणावर जोरदार टीकाही केली. आता यावर काही करता येत नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा जळफळाट झाला आहे!
निवडणूक वर्षात आता असे अनेक झगडे होणार आहेत.

Tuesday, January 3, 2012

विमाने रंगविणे

अनेक वर्षे जबरदस्त चढाओढ व त्यामुळे प्रचंड तोटा सोसलेल्या अमेरिकन विमानकंपन्या आता देशांतर्गत प्रवासासाठी टाळता येणारे सर्व अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. विमानतळ देखील तसेच करत आहेत. बहुतेक विमानतळांवर Observation Decks असायची तीं आता बंद झालीं आहेत. विमानातील खाण्यापिण्याच्या सोयी आता बहुतेक सर्व बंद झाल्या आहेत(आंतरराष्ट्रीय प्रवास सोडून).
या काटकसरीच्या धोरणाचा एक सहज दिसणारा परिणाम म्हणजे विमानांना दिले जाणारे रंग! पूर्वीचा तऱ्हेतऱ्हेच्या रंगकामाचा जमाना जाऊन आता बहुतेक कंपन्यांची विमाने पांढरी स्वच्छ असतात. काही किरकोळ रंगीत पट्टे वा कंपनीच्या विशिष्ट खुणा पंखावर वा शेपटावर असतात तेवढ्या अपवाद. याचे कारण विमान रंगवण्याचा खर्च! विमानाचा रंग खराब झाला आणि त्याला पुन्हा रंग काढायचा तर ते फार खर्चिक होते. १४ दिवस विमान जमिनीवर अडकते म्हणजे तेवढे दिवस उत्पन्न बंद! शिवाय रंगाचा खर्च. बोईंग ७४७ जम्बो विमान रंगवण्यासाठी २५० ग्यालन रंग लागतो म्हणे! त्यामुळे आता पांढरा रंगच सर्रास वापरला जातो आहे! तो टिकतो देखील जास्त!
एकेक वाचावे ते नवल!