Sunday, April 22, 2012

पॉल लोरेमची कथा.

जगामध्ये गुणवत्ता सर्वत्र असते पण संधि मात्र थोड्यानाच मिळते. पॉल लोरेम हे या अनुभवाचे उत्तम उदाहरण आहे. असे अनेकानेक लोरेम भारतात सर्वत्र विखुरलेले असतात व कधीकधी त्यांच्यातल्या एखाद्याला लोरेमसारखी संधि मिळते पण क्वचित! लोरेम आत्ता २५ वर्षांचा आहे. दक्षिण सुदान मधल्या एका विजेचे दर्शनहि न झालेल्या खेड्यातला आणि वर अनाथ! त्याचे मायबाप कधी शाळेत गेलेले नव्हते. एका रेफ्यूजी कॅंपात तो असाच वाढला. पण आज तो अमेरिकेतील प्रख्यात येल युनिव्हर्सिटीत पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. हे कसे घडले हीच त्याची कथा. ही बातमी न्यू यॉर्क टाइम्समध्ये देणार्‍याने त्याची मुलाखत येल कॅंपस मध्ये घेतली तेव्हा तो अतिशय नम्रपणे म्हणाला, 'माझे अनेक मित्र असे होते कीं ते माझ्यासारखेच गुणी होते त्याना माझ्यासारखी संधि मिळाली नाही. माझी एकच इच्छा होती कीं त्यानाही शिक्षणाची संधि मिळावी.' लोरेमचे घराणे गुरे बाळगणारांचे. सुदानच्या आग्नेय भागातील या दुर्गम प्रदेशाची परिस्थिति आपल्या आदिवासी भागांपेक्षा वेगळी नाही. शाळा वा आरोग्याच्या सोयी मुळीच नाहीत, जवळचा पक्का रस्ता काही दिवस पायी चालल्यावर भेटणार. त्यात भर म्हणून सुदानमध्ये अनेक वर्षे उत्तर-दक्षिण घोर यादवी युद्ध चालले होते. वयाच्या ५ व्या वर्षी लोरेमला क्षयाने ग्रासले. त्याचा जीव वाचावा म्हणून त्याच्या मायबापानी त्याला उत्तर केनिया या परदेशातील 'काकुमा अनाथ कॅंप' मध्ये नेऊन सोडले आणि परत आल्यावर दोघे मरूनहि गेलीं! लोरेम त्या कॅंपात त्याच्यासारख्या इतर मुलांच्यात वाढला. पण या इतर मुलानीच त्याला शाळेत घातले. शाळा कशी असेल त्याची आपण सहज कल्पना करूं शकतों कारण आपल्या मागास भागातल्या शाळा तशाच असतात. पण लोरेमला त्याच्या नशिबाने एक मिशनर्‍यांची छोटीशी लायब्ररी मिळाली आणि त्याने त्यातील सगळी पुस्तके अधाशासारखी वाचली! त्याच्या शिक्षकाना त्याचे फार प्रेम व अभिमान. त्यानी खटपट करून त्याला केनियातील एका ७वी-८वी च्या शाळेत पाठवले कारण तेथे त्याला हायस्कूलच्या प्रवेश परीक्षेला बसता येईल! अडचण एकच होती कीं ती परीक्षा 'स्वाहिली' या केनियातील भाषेत घेतली जाई आणि ती भाषा लोरेमला येत नव्हती पण त्याने हार मानली नाही. खडतर प्रयत्नांती परीक्षेत केनियाच्या त्या विभागातून तो दुसर्‍या क्रमांकाने पास झाला! त्याला केनियाची राजधानी नैरोबी येथील एका नावाजलेल्या आणि वसतिगृहाची सोय असलेल्या शाळेत प्रवेश व शिष्यवृत्ति मिळाली. नंतर दक्षिण आफ्रिकेतील 'African Leadership Academy' मध्ये त्याचे शालेय शिक्षण पुरे झाले. शाळेच्या शेवटच्या वर्षी दीर्घ प्रवास करून तो आपल्या जन्मगावी गेला आणि खटपट करून त्याने आपल्या लहान भावंडाना, ज्या कॅंपात तो वाढला तेथे पाठवले कां कीं तेथे त्यानाहि शिक्षण मिळेल! आता त्याला येल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश व शिष्यवृत्ति मिळाली आहे. मात्र शिक्षणाची भाषा इंग्रजी, जी त्याची पांचवी भाषा आहे! (इतर तीन आफ्रिकन व चौथी अरेबिक!) पण त्याने इतक्या अडचणींवर अद्याप मात केली आहे कीं हा अडथळाही तो सहज पार करील अशी येलमधील त्याला प्रवेश देणारांची खात्री आहे. बाळपणापासून अमेरिकेचा व्हिसा मिळेपर्यंत ज्या अनेकानी त्याला मदतीचा हात दिला त्या सर्वांचे ऋण तो मानतो. आपण त्याला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. त्या भरभरून देऊंया.

Thursday, April 12, 2012

ली हार्वे ऑसवाल्ड आणि सुप्रीम कोर्ट

ली हार्वे ऑस्वाल्ड


हे नाव आता कोणाला चटकन आठवेल अशी खात्री नाही. अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी याचा ५० वर्षांपूर्वी खून करणारा हा माणूस. या खुनामागले रहस्य अजूनहि पूर्णपणे उलगडलेले नाही. याला अटक झाल्यानंतर तुरुंगात नेतानाच त्याचाच खून झाला! टेक्सास राज्यात त्याला पुरले होते पण त्याच्या थडग्यावरचा टॉम्बस्टोन चार वर्षानी चोरीला गेला. तो पोलिसाना परत मिळवता आला. मग तो त्याच्या आईपाशी होता. आईने मूळ थडग्यावर तो पुन्हा न बसवता तेथे छोटासा फक्त 'ओस्वाल्ड' एवढेच नाव लिहिलेला दगड बसवला व मूळ दगड आपल्या घरात जमिनीखालच्या पोकळीत दडवून ठेवला. तिच्या मृत्यूनंतर तिचे घर विकले गेले. त्या विकत घेणार्‍या 'कार्ड' कुटुंबाने तो दगड त्याना अचानक सापडल्यावर दुसर्‍या नातेवाइक व्यक्तीकडे सांभाळण्यास दिला. या जॉन रॅगानने तो २००८ सालापर्यंत संभाळला. मात्र त्यानंतर तो कार्ड कुटुंबाला परत न मिळता एका खासगी म्युझिअमला विकला गेला. हे Historic Automotive Attractions Museum रोस्को नावाच्या इलिनॉइस राज्यातील लहानशा गावात आहे! मुळात हे म्युझिअम दुर्मिळ मोटरगाड्यांचे होते पण आता त्यात जॉन केनेडीशी संबंधित अनेक वस्तूंचेहि एक दालन आहे.! त्या म्युझिअममध्ये खुद्द ऑसवाल्डला गोळ्या लागल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली ऍम्ब्युलन्सहि आहे!
ऑसवाल्डच्या टोम्बस्टोनसाठी १०,००० डॉलर मोजले गेले असे समजते. कार्ड आणि रॅगन कुटुंबामध्ये आता त्या दगडाच्या मालकी हक्कावरून कोर्टबाजी चालू आहे!
अमेरिकेचे सुप्रीम कोर्ट.
सध्या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात प्रेसिडेंट ओबामाच्या नवीन Health Plan बद्दल सुनावणी चालली आहे. तीन दिवस सुनावणी झाली आता निकाल जून अखेर लागणार आहे. रिपब्लिकन पक्षाला नवीन कायदा घटनाबाह्य ठरवला जायला हवा आहे. या निर्णयाला येथील राजकारणात खूप महत्व आले आहे कारण यंदा अध्यक्षीय निवडणूक आहे! सुप्रीम कोर्टात ९ जज्ज आहेत त्यातले जीर्णमतवादी व सुधारणावादी किती यावर निर्णय अवलंबून राहील! (५-४ कीं ४-५?).
या निमित्ताने एका वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा वाचावयास मिळाली. अमेरिकेत सर्व राज्यांचीं स्वतःची हायकोर्टे व सुप्रीम कोर्टे आहेत व शिवाय फेडरल हाय/सुप्रीम कोर्टेहि आहेत. येथे फेडरल कोर्टांमध्ये एकदा जज्जांची नेमणूक झाली कीं ती आयुष्यभरासाठी असते त्याना निवृत्तीच्या वयाचे बंधन नाही. जज्जाने स्वतःहोऊन पाहिजे तर निवृत्त व्हावे! परिणामी जक्ख म्हातारे झालेले जज्जहि निवृत्त होत नाहीत! निव्रुत्ति वय कां नाही तर म्हणे घटनेत असे म्हटले आहे कीं जोवर जज्जाची वर्तणूक चांगली असेल तोवर त्याला निवृत्त करता येणार नाही! जगातल्या इतर कोणत्याहि देशामध्ये असा प्रकार नाही ६० पासून ७५ पर्यंत कां होईना, निवृत्ति वय ठरलेले असतेच! हा अजब प्रकार अमेरिकेतहि बंद व्हावा असे अनेकाना वाटते पण त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची कोणाची तयारी नाही.
म्हातारे झालेले जज्ज हे जीर्णमतवादी असण्याची शक्यता अर्थातच जास्त! ओबामाच्या कायद्याचे त्यामुळे काही खरे नाही!

Tuesday, April 3, 2012

अमेरिकन पॉवर स्टेशन्स आणि वसंताची चाहूल

अमेरिकन पॉवर स्टेशन्स
अमेरिकेमध्ये अजूनहि विद्युतनिर्मिति ही कोळसा जाळूनच मोठ्या प्रमाणावर होते. ग्लोबल वार्मिंगला कारण ठरणार्‍या गॅस उत्सर्जनामध्ये पॉवर स्टेशन्सचा हिस्सा ४० टक्के आहे आणि त्यात कोळसा जाळणार्‍या स्टेशन्सचा जास्त सहभाग आहे. निदान कोळसा जाळणारी नवीन यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वाढू नये यासाठी प्रेसिडेंटने नवीन नियम आणावयाचे योजले आहे कीं कोळसा जाळणार्‍या नवीन पॉवरस्टेशन्सनी प्रत्येक मेगावॉट-अवर ऊर्जा निर्मिती करताना १,००० पौंड पेक्षा जास्त कार्बन-डाय-ऑक्साइड वायू बाहेर टाकू नये. सध्या वापरात असलेल्या अशा पॉवर-स्टेशन्समध्ये हे प्रमाण १,६०० पौंड आहे. म्हणजे नवीन नियम लागू झाला तर कोळसा जाळणार्‍या बॉयलरर्निर्मात्याना किती मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा कराव्या लागतील याचा अंदाज येईल. कोळसा जाळल्यावर CO2 निर्माण होणारच मात्र जादा बनणारा गॅस चिमणीमधून बाहेर पडू न देता तो पकडून जमिनीत गाडण्याची यंत्रणा अजून प्राथमिक-प्रायोगिक अवस्थेत आहे ती विकसित करून अशा स्टेशन्सना वापरावी लागेल तरच हा नियम पाळता येईल. नैसर्गिक वायु जाळणार्‍या स्टेशन्सना अशी अडचण येणार नाही कारण गॅस जाळल्यावर १,६०० ऐवजी ८०० पौंडच CO2 बाहेर पडतो. मात्र प्रेसिडेंट ओबामाने सुचवलेला हा नियम प्रत्यक्षात येईलच अशी खात्री देता येत नाही. कोळसाखाणी आणि कोळसा जाळणार्‍या पॉवरप्लॅंटचे निर्माते अशा नियमाला विरोध करतील व इथल्या राजकारणावर त्यांचा किती प्रभाव पडेल यावर नव्या नियमाचे भवितव्य ठरेल.
भारतालाहि अजून दीर्घकाळ कोळसा जाळून विद्युतनिर्मिति करणे प्राप्त आहे. मात्र सध्या असे वातावरण आहे की कोठलेहि नवे पॉवर प्रोजेक्ट सुखासुखी वाटचाल करू शकत नाही. मग ते कोळसा जाळणारे असो, गॅस जाळणारे असो वा अणुशक्तीवर चालणारे असो. आम्हाला वीज मात्र हवीच आहे पण ती येणार कोठून याचा विचार कोण करणार?
वसंताची चाहूल
मी राहतो आहे त्या कॅलिफोर्नियाच्या भागात आता थंडी ओसरू लागली आहे. वसंताची चाहूल परिसरात जाणवू लागली आहे.
‘वठोनि गेल्या तरुलागिं पाणी, घालावया जात न कोणि रानी,
वसंतिं ते पालवतात सारे, हे सृष्टिचे कौतुक होय बा रे.’
अशी एक कविता शाळेत वाचली होती तिची आठवण आली. बाहेर फिरताना लोकांच्या घरांसमोरच्या फुलझाडांवर पाना-फुलांचा नवा बहर दिसतो आहे. काही झाडांवर रंगीत पाने, काहींवर पाने नाहीत पण सर्व झाडच फुलानी भरलेले असे अनेक प्रकार पहायला मिळत आहेत. काही पूर्णपणे पर्णहीन झालेल्या झाडांवर नवीन पालवी नुकतीच फुटूं पाहते आहे. गंमत म्हणून काही फोटो काढले ते पहा.
पूर्वीचे फोटो
वसंताचा प्रभाव