Friday, January 23, 2015

नवे मेट्रो- मोनो मार्ग.


मुंबईत एक मेट्रो लाइन चालू झाली. तिची उपयुक्तता निर्विवाद सिद्ध झाली आहे. मोनोरेलची पहिली लाइन अर्धी सुरू झाली आहे पण तिची उपयुक्तता लाइन सातरस्त्यापर्यंत पुरी झाल्यावरच सिद्ध होईल. ती करिरोड स्टेशनला जोडली गेली असती तर उत्तम झाले असते पण तसा प्लॅन दिसत नाही. नवीन दोन मेट्रो लाइन्स चर्चेत आहेत व त्यातील नं.३ आधी होईल असे दिसते. ही लाइन उत्तर दक्षिण आहे म्हणजे ती पश्चिम रेल्वेच्याच मार्गाला समांतर सेवा देईल. वांद्रे ते सीप्झ हा भाग निश्चित उपयुक्त ठरेल. मला असे वाटते कीं मेट्रो-मोनो पूर्व-पश्चिम धावणार्‍या झाल्या तर जास्त उपयुक्त ठरतील. मिरारोड ते ठाणे अशी मेट्रो झाली तर ती पूर्वपश्चिम जोडणारा दुवा ठरून निश्चित भरपूर उपयुक्त ठरेल. तो भाग दाट भरण्यापूर्वी लाइन बांधली गेली तर कमी अडचणी येतील.आणखी १० वर्षांनी कदाचित ते अशक्य होईल. मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्टेशनपासून निघून एक लाइन पूर्वेला खाडी ओलांडून महापे भागापर्यंत गेली तर अतिशय उपयुक्त ठरेल. मात्र ती स्टेशनाना जोडणारी हवी. मुंबईच्या दक्षिण टोकाला बॅलार्ड इस्टेट-शिवाजी-चर्चगेट-नरिमन पॉइंट अशी मोनोरेल खासच उपयुक्त ठरेल. तेथे रस्तेहि रुंद असल्यामुळे उंच खांबांवर लाइन बांधणे शक्य होऊ शकेल. अर्थात काम चालू असताना त्रास सोसावा लागेल. नवीन किनारा मार्ग बांधतानाच त्याच मार्गाने मोनोरेलहि बांधली तर फक्त मोटरवाल्यांसाठी खर्चिक रस्ता असा आक्षेप उरणार नाही. आणि पश्चिम रेल्वेवरचा भार जरा कमी होईल. प. रेल्वे स्टेशनांपासून दूर असलेल्याना प.रे. ला पर्याय मिळेल.

Thursday, January 22, 2015

मतलबाचा किनारी मार्ग.


गेले काही दिवस मुंबईत पश्चिम किनार्‍यावर नवीन रस्ता बांधण्याबद्दल बातम्या व लेख येत आहेत. या रस्त्याची कल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळेपासून चर्चेत आहे. वांद्रे-वरळी सेतु पुढे वाढवून हाजीअलीपर्यंत नेणे फार खर्चाचे होणार असल्याने त्याला पर्याय म्हणून किनारी मार्ग पुढे आला. त्यामुळे तेव्हा त्याची व्याप्ति वरळीपासून मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतच मर्यादित होती. मात्र आता त्याची व्याप्ति फार वाढली आहे. वरसोव्यापर्यंत किनार्‍यानजीक रस्ता करून मग एक लांबलचक बोगदा करून तो मारवे पर्यंत जाणार आहे. याचे मागे काय अर्थकारण आहे याचा विचार पडतो. वास्तविक मार्वे-मढ वगैरे भूभाग मुख्य भूमीपासून अलग पडलेला आहे. वरसोव्याहून लॉंच किंवा मालाडमधून निघणारा एक लांबलचक रस्ता येवढेच रहदारीचे मार्ग आहेत. या भूभागामध्ये या कारणामुळे फारशी वस्ती नाही. श्रीमंतांचे बंगले वगैरे आहेत. मग एवढा मोठा खर्च करून बोगदा बांधण्यामागे काय हेतु आहे? एकदा बोगदा झाला व या भागातून वरसोवा (मेट्रोची सोय) व तेथून थेट दक्षिण मुंबईपर्यंत जाण्याचा राजमार्ग उपलब्ध झाला कीं या भूभागाचे काय होईल हे उघड आहे. येथे प्रचंड प्रमाणावर मोठमोठ्या अनेकमजली इमारती उभ्या राहतील. त्यात अर्थातच राजेशाही 3BHK वा त्याहून मोठ्या आकाराचे फ्लॅट बनतील. बिल्डरांचे उखळ पांढरे होईल. हे सर्व जनतेच्या खर्चाने होणार. राजवट बदलली तरीहि बिल्डर व सत्ताधीश यांचे साटेलोटे अबाधितच राहणार आहे. जनता हतबल आहे.

Thursday, January 15, 2015

पानिपतची लढाई कधी झाली?


पानपतावर भाऊसाहेब पेशवा उत्तरायण सुरू होण्याची वाट पहात बसला होता. सैन्याची उपासमार होत होती. मकरसंक्रांत झाली आणि दुसर्‍या दिवशी मराठी सैन्य 'गोल बांधून' तळ सोडून निघाले. मात्र अबदालीच्या सैन्याला बगल देऊन निसटून जाणे शक्य नव्हतेच. अखेर लढाई झालीच व संध्याकाळपर्यंत मराठी सैन्याचा पूर्ण पराभव झाला. या लढाईला १४ जानेवारीला २५० वर्षे झाली असे म्हटले जात आहे. उत्तरायणाचा व संक्रांतीचा मेळ हजारो वर्षांपूर्वी असला तरी आता फार अंतर पडलेले आहे. दर ७०-७२ वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे जात आहे. २६००० वर्षांमध्ये पूर्ण ३६५ दिवस पुढे जाईल. गेल्या काही वर्षांत ती १४ जानेवारीला येत असली तरी यंदा १५ जानेवारीला सरकली आहे व आता १५ तारीख कायम होणार आहे. २५० वर्षांपूर्वी ती १०-११ तारखेला झाली असली पाहिजे. मग लढाईची तारीख १२-१३ जानेवारी असली पाहिजे. मग खरी तारीख कोणती? मराठी कागदपत्रांत तारखेचा उल्लेख नसेल कदाचित पण इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीझ, डच पत्रव्यवहारांत एवढ्या मोठ्या घटनेची तारीख नक्कीच नोंदली गेली असली पाहिजे. हे कोडे कोणी उलगडील काय?

Sunday, January 11, 2015

कालगणना - पुन्हा एकदा


आधीचा लेख लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून इतर कालगणनांचा शोध केला. ज्यू हा धर्म खूप जुना तेव्हां त्यांची कालगणना कशी आहे हे पाहिले तेव्हा कळले कीं तेही आपल्याप्रमाणे चांद्र वर्ष मोजतात. चांद्रवर्ष व सौरवर्ष यांत बराच फरक आहे त्यामुळे मेळ घालण्यासाठी तेहि अधिकमासाचा वापर करतात. मात्र त्यांच्या पद्धतीत फक्त वर्षाचा शेवटचा महिना हाच अधिकमहिना होतो. त्याचे नाव Adar असे आहे. त्यामुळे ज्या वर्षी अधिकमहिना घ्यायचा असेल त्यावर्षी Adar 1 and Adar 2 असे दोन महिने असतात. त्यातील पहिला अधिक व दुसरा निज असे आपल्याप्रमाणेच असते. १९ वर्षांच्या एका Cycle मध्ये ७ ठरलेल्या वर्षांमध्येच अधिक महिना मोजला जातो. या पद्धतीने, चांद्र व सौर वर्षांचा मेळ बर्‍याच अंशीं जुळवला जातो. हे थोडेफार मी पूर्वीहि वाचले होते. मात्र मला मुख्य कुतूहल होते ते म्हणजे ज्यू लोक कोणता 'शक' पाळतात. असे वाचावयास मिळाले कीं त्यांची वर्षगणना ईश्वराने सृष्टीची निर्मिति केली त्याचे एक वर्ष आधीआसून सुरू होते! म्हणजे ईश्वराने ०००२ साली सृष्टि निर्माण केली. आता २३ सेप्टेंबर २००६ रोजी त्यांचे ५७६७ साल सुरू झाले. व ८ सेप्टेंबर २०४० ला ५८०१ साल सुरू होईल! म्हणजे त्यांच्या धर्मकल्पनांप्रमाणे सृष्टीची निर्मिति फार जुनी नाही! पूर्वी इसवी सनाला A. D. (Anno Domini) म्हणत हे आठवत असेल. मात्र आता Jan. 11, 2015 (C. A. - Common Era) असे म्हणतात. ज्यूंच्या वर्षापुढे A.M. (Anno Munde) असे लिहितात. आपल्याला माहीत आहेच कीं इस्लाम प्रमाणे कालगणना पैगंबरांनी मक्केहून मदिनेला प्रयाण केले तेव्हापासून सुरू होते. त्याला हिजरी सन असे म्हणतात. तेहि चांद्र वर्ष मानतात मात्र अधिक महिन्याची तरतूदच नसल्यामुळे इस्लामी महिने दरवर्षी ८-१० दिवस लवकर सुरू होतात. दर ३५-३७ वर्षानी महिन्याचा प्रारंभ स्वस्थानावर येतो. वर्षारंभ वा सणवार आणि ऋतु यांचे नाते काही नाही. त्याना त्यात काही अडचण वाटत नाही. जगात इतर अनेक संस्कृति होऊन गेल्या. इतर अनेक वर्षगणना व 'शक' असतील. पण जगभर आता C.A. हाच 'शक' सर्वमान्य झाला आहे.

Thursday, January 8, 2015

भारतातील कालगणना

आपल्या भारतात, इंग्रज किंवा मुस्लिम राजसत्ता येण्याचे आधीपासून शालिवाहन शक आणि विक्रम संवत अशा दोन कालगणना/वर्षगणना चालू आहेत व त्या आजतागायत चालू आहेत. मुस्लिम सत्तेच्या काळात हिजरी सनाचा उपयोग होत असला तरी या वर्षगणना आपले स्थान धरून होत्या. इंग्रजी अमलात मात्र इसवी सनाने सत्तेच्या आश्रयामुळे प्रमुख स्थान पटकावले व या दोन्ही कालगणना धार्मिक व्यवहारापुरत्याच वापरल्या जात होत्या. इसवी सनाच्या जगव्यवहारातील स्थानामुळे इंग्रजी अंमल गेला तरी इसवी सन हीच आता प्रमुख कालगणना आपण वापरतो. सणवारांसाठी या जुन्या कालगणना अजून वापरात आहेत हे खरे पण व्यवहारात तारीख हीच खरी हे सत्य नाकारता येत नाही. जरा विचार केला तर शक, संवत व इसवी सन या तिन्ही गणनांची सुरवात एकमेकांपासून फार दूर नाही. विक्रम संवत सर्वात जुना आहे. मला प्रष्न पडला आहे तो असा कीं विक्रम संवत सुरु होऊन, पहिले, दुसरे, दहावे, बासष्टावे वर्ष अशी गणना सुरू होण्यापूर्वी एखाद्या घटनेचा काळ सांगण्यासाठी काय मार्ग होता? वर्ष हे कालाचे माप निश्चित होऊन अनेक शतके लोटली असणार. मग पहिले, दुसरे अशी गणना सुरू होण्याची समाजाला गरजच भासली नाही? कीं इतर अशी शकगणना पद्धत होती पण ती लुप्त झाली? कां? आणि केव्हा? युधिष्ठिर शक असे एक नाव मी ऐकलेले आहे पण विक्रमापुर्वीच्या घटनेचा 'युधिष्ठिर शक अमुक'मधील असा उल्लेख कोठे ऐकिवात नाही. विक्रमसंवत ही गणना तरी कोणी सुरू केली? त्याला तरी अशा गणनेची आवश्यकता कां भासली? समाजाला अशा गणनेची उपयुक्तता कशी जाणवली? विक्रम संवत व शालिवाहन शक अस्तित्वात असूनहि एकटे शिवाजीमहाराजच असे होऊन गेले कीं 'राज्याभिषेक शक' सुरू करावा अशी प्रबळ प्रेरणा त्याना झाली. मात्र, औरंगजेबाचे परचक्र ३० वर्षांच्या अविरत झगड्यानंतर परतवून लावणार्‍या मराठी सत्तेला ती कालगणना पुन्हा सुरू करून आपल्या कारभारात तिचा वापर अनिवार्य करावा असे वाटले नाही! आता काळ फार पुढे गेला आहे आणि इसवी सनाला आता पर्याय नाही.

Monday, January 5, 2015

या ब्लॉगवर गेल्या दीड वर्षात काही नवीन लिहिले नाही. फेसबुकवर काहीबाही लिहिले पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे दिसले. आता पुन्हा ब्लॉग लेखनाकडे वळावे असा विचार आहे. माझे वाचक विखुरले असणारच. त्याना पुन्हा नम्र आमंत्रण कीं वाचा आणि प्रोत्साहन द्या. ब्लॉगवरील लेखनाचे स्वरूप पूर्वी सारखेच राहील. फडणीस