Wednesday, May 30, 2012

भाषांतरकार आणि डायव्होर्स हॉटेल्स.

भाषांतरकार
अमेरिकन कोर्टांमध्ये इंग्लिश न येणारांसाठी भाषांतरकार मिळण्याची सोय कायद्याने केली आहे. १९७८ च्या या कायद्याप्रमाणे या सोयीसाठी खर्च मात्र केस हरणार्‍या पक्षकाराला सोसावा लागतो. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहून भाषांतर करणारा वापरला तर खर्चाची अट स्पष्ट आहे. मात्र कागदपत्रांचे भाषांतर करावे लागले व ते करून घेतले तर त्यासाठी झालेल्या खर्चाचे काय? कायद्यामध्ये Interpreter असा शब्दप्रयोग आहे. Interpreter चा अर्थ कसा लावायचा? कागदपत्रांचे भाषांतर करून देणारास Interpreter म्हणायचे कीं नाही? असा मुद्दा हल्ली एका केस मध्ये उपस्थित झाला! एका जपानी बेसबॉल प्लेयरचा पाय एका रिझॉर्ट्मध्ये एका डेकवरून चालताना फळी मोडून अडकला व इजा झाली. त्या जपानी खेळाडूने रिझॉर्ट मालकावर केस केली. ती केस तो हरला हे एक, मात्र तो हरल्यामुळे रिझॉर्टमालकाला काही जपानी कागदपत्रांचे भाषांतर करून घ्यावे लागले होते त्याचा खर्चहि त्या खेळाडूला सोसावा लागला. प्रश्न उभा राहिला कीं Translator ला Interpreter म्हणावयाचे काय? केस वर सरकत सुप्रीम कोर्टापर्यंत गेली!
सुप्रीम कोर्टाने ६ विरुद्ध ३ मताने निकाल दिला की ‘नाही’! एका प्रसिद्ध भाषांतरकाराचे उदाहरण देऊन त्यानी म्हटले कीं त्याने इलियड, ऑडिसी वगैरेची इंग्लिशमध्ये उत्तम भाषांतरे केली पण म्हणून त्याला इलियड-ऑडिसीचा Interpreter म्हणावयाचे काय?
शब्दशः विचार केला तर हे बरोबर वाटते पण कायद्याचा उद्देश लक्षात घेतला तर संवादाचे भाषांतर आणि लिखित मजकुराचे भाषांतर दोन्हीमध्ये फरक करण्याचे काही कारण नाही. उद्देश उघडच भाषा न कळणाराला अडचण येऊ नये व त्यापोटी अन्याय होऊ नये हा असल्याने कायद्यात शब्द जरी Interpreter असा वापरला असला तरी त्याचा Translator असा अर्थ करणेच उचित. तेव्हा ३ जज्जानी लावलेला अर्थ जास्त योग्य! कायदा गाढव असतोच पण जज्जहि असतात असे म्हणावेसे वाटते.

डायव्होर्स हॉटेलकशी काय वाटते कल्पना? अनेक प्रकारची हॉटेल्स असतात, अगदी अल्प दराच्या मॉटेल्स पासून प्रचंड दराच्या, हजारो खोल्यांच्या लास व्हेगास मधील हॉटेल्स पर्यंत अनेक प्रकार. पण डायव्होर्स साठी खास हॉटेल्स? होय आता तशी पण खास हॉटेल्स निघत आहेत. हॉलंड मध्ये हा प्रकार हल्लीच सुरू झाला आहे. म्हणजे कल्पना अशी, तुमचे घटस्फोट घेण्याचे नक्की झाले आहे आणि फारसे वादविवाद आणि भांडणे नाहीत ना?, मग एका वीक एंडसाठी दोघे आमच्या हॉटेलात मुक्कामाला या. शनिवार, रविवार तुम्ही दोघे, तुमचे वकील (हवे असल्यास) आणि मध्यस्थ (तो आम्ही देऊं हवा तर), असे एकत्र बसा, चर्चा करा आणि कागदपत्रे पुरी करून, रविवारी संध्याकाळी विभक्त होऊन हसत खेळत बाहेर पडा. आमचा स्टाफ तुम्हाला सर्व सुखसोयी पुरवील आणि त्रास होऊ देणार नाही. सर्व कामासाठी आमची एकूण फी अमुक-अमुक, तेवढी द्या म्हणजे काम झाले!
अर्थात हॉटेलमधल्या सर्वच खोल्या या कामासाठी नसतात. पण लोक हॉटेलात खोल्या घेऊन लग्ने लावतात, समारंभ करतात, मीटिंग्ज घेतात तसेच घटस्फोट हे आणखी एक काम येथे होते!
हॉलंड्मध्ये प्रथम सुरू झालेल्या अशा ठिकाणी अद्याप १७ असे यशस्वी घटस्फोट झाले आणि आता तशा तर्‍हेची सोय अमेरिकेतील हॉटेल्समध्येहि उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू आहे.
मात्र अमेरिकेतील घटस्फोटाच्या केसेस लढवणार्‍या वकिलाना हा प्रकार हास्यास्पद वाटतो! कारण उघड आहे.त्याना केसेस लढवण्यात खरे स्वारस्य! जोडप्याकडे पैसा रग्गड असेल तर मग पहायलाच नको, दोन्हीकडील वकिलांची चांदीच! त्यामुळे त्यानी ही कल्पना उडवून लावली आहे!

Sunday, May 13, 2012

भाड्याची गाडी आणि घरावर सोलर पॅनेल्स

भाड्याची गाडी
गाडी (कार) विकत घ्यायची नसेल तर तात्पुरती भाड्याने घेणे हा पर्याय अनेक व्यक्ति वा संस्था वापरतात. कित्येक ऑफिसांमध्येहि हा पर्याय वापरला जातो. मात्र डेट्रॉइट शहराच्या पोलिस खात्याची कथाच वेगळी! सध्याच्या येथील आर्थिक तंगीच्या काळात असे उघडकीस आले आहे कीं २००३ सालापासून या खात्याने एक २००४ मॉडेलची डॉज-इंट्रेपिड गाडी महिन्याला ६०८ डॉलर या दराने भाड्याने घेतली आणि अजूनहि ती तशीच भाड्याने चालू ठेवली आहे. मूळच्या भाडेकराराप्रमाणे २००५ साली ती परत करतां आली असती किंवा विकत घेतां आली असती आणि विकत घेतली असती तर नवीन मॉडेल मिळाले असते. खात्याने यातले काहीच केले नाही. भाड्याचा मीटर चालू राहिला आणि आजमितीस ५६००० डॉलर भाडे दिले एवढेच नव्हे तर आणखी १०,००० डॉलर,मूळचा करारापेक्षा खूप जास्त अंतर गाडी वापरली गेली या कारणास्तव जादा फी देणे आहे म्हणजे एकूण ६५,००० डॉलर झाले! २००३ साली भाड्या ऐवजी विकतच घेतली असती तर त्या गाडीची किंमत २५,००० डॉलर पडली असती.
खरी धक्कादायक गोष्ट ही कीं अशा शंभरचे वर गाड्या ज्यांचे लीज संपले आहे अशा अजूनहि ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे लाखो डॉलर विनाकारण खर्च पडले आहेत!
एकूण काय कीं इथे किंवा तिथे, एकच प्रकार, ‘आंधळं दळतंय …’

घरावर सोलर पॅनेल्स


आता सोलर पॉवरचा जमाना आहे. येथे घरावर लोकानी सोलर पॅनेल्स बसवावी यासाठी बर्‍याच सवलती दिल्या जातात. पूर्वीच्या मानाने आता किमतीहि खाली येत आहेत तरीहि अजून त्या सगळ्यानाच परवडण्यासारख्या खासच नाहीत. मोठमोठ्या कंपन्या आपल्या गोडाउन्सच्या छपरांवर सोलर पॅनेल्स बसवतात त्यात प्रसिद्धीचाहि काही भाग असतो.
एक नवीनच कल्पना वाचायला मिळाली. ती म्हणजे पॅनेल्स लीजवर बसवून देणे. म्हणजे काही कंपन्या जाहिरात करतात कीं तुम्हाला काडीचाहि खर्च न लावता आम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनेल्स बसवून देऊं. त्यातून निर्माण होणारी वीज तुमच्याच घरात तुम्ही वापरा. तिचे पैसे तुम्ही अमुक दराने आम्हाला दर महिना (मीटर दाखवील तितक्या युनिट्सचे) द्यावयाचे. हा दर वीज पुरवठा करणार्‍या कंपनीच्या वीजदरापेक्षा थोडा कमीच असतो त्यामुळे घरमालकाचा फायदा होतो. वीजनिर्मितीसाठी काही रोजचा खर्च नसल्यामुळे अशा मिळणार्‍या रकमेतून पॅनेल्स बसवणार्‍या कंपनीला भांडवली खर्च (वजा सरकारी सब्सिडी) व देखभाल खर्च विचारात घेऊनहि फायदा होतोच. पॅनेल्सना देखभाल नगण्य लागते (मात्र घरमालकाला ती कटकटीची ठरू शकते) आणि एकाच शहरात अनेक घरांवर अशी पॅनेल्स बसवली तर कंपनीला देखभाल व्यवस्था खर्चिक होत नाही. वीज खरेदी करण्याचा करार २० वर्षे अशा दीर्घ मुदतीचा असतो कारण पॅनेल्सचे आयुष्य तेवढे मानले जाते.
ज्या भागात विजेचा दर जास्त आहे तेथे ही योजना सर्वानाच लाभाची ठरते कारण घरमालकाला काही खर्च न करता विजेच्या खर्चात बचत होते शिवाय करारात नमूद केल्यापेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती फुकट! अडचण अशी एकच पडू शकते ती म्हणजे घर विकावयाचे झाल्यास नवीन मालकावरहि वीजखरेदी करार बंधनकारक असतो. अनेक कंपन्या आता अशा कराराच्या जाहिराती करताहेत. मुंबईतहि कदाचित टाटा पॉवर कंपनी असे करू शकेल पण मुंबईत स्वतंत्र घरे जवळपास नाहीतच त्यामुळे कठीण आहे.

Wednesday, May 9, 2012

परदेशी विद्यार्थी आणि Marijuana

परदेशी विद्यार्थी.
पूर्वीच्या एका लेखात उन्हाळ्याच्या सुट्टीत अमेरिकेत येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या संबंधात लिहिले होते. (फेब्रुवारी २६ चा लेख पहावा.)या उपक्रमाचा मूळ उद्देश अतिशय चांगला होता. परदेशात कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यानी उन्हाळ्यात अमेरिकेत यावे, छोट्या नोकर्‍या करून चार पैसे कमवावे, अमेरिकेत फिरावे, अमेरिकन जनतेशी संपर्क यावा असा मूळ उद्देश. त्यासाठी या प्रोग्रॅमसाठी काही कंपन्यांनी सहकार्य करावे असेहि ठरले होते. काही कुटुंबांनी विद्यार्थ्याना थोडक्या मोबदल्यात वा विनामूल्य आपल्या घरी ठेवून घ्यावे असाहि उद्देश होता. पन्नास वर्षे हा उपक्रम चालू आहे!
मात्र गेल्या वर्षी हर्षे चॉकोलेट कंपनीत काम करणार्‍या विद्यार्थ्याना फार वाईट अनुभव आले व निदर्शने करावी लागली. याबद्दल मागील लेखात विस्ताराने लिहिले होते. श्रीमती हिलरी क्लिंटन यानीहि या घटनेवर कडक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आजच्या पेपर मध्ये बातमी आली आहे कीं State Department ने यावद्दल आता कडक नियम केले आहेत आणि अशा विद्यार्थ्याना कमी पगारावर राबवून घेण्याचे बंद केले आहे. सर्वसाधारणपणे असे विद्यार्थी छोटी हॉटेले, रिझॉर्ट्स, पार्क्स अशा ठिकाणी कामे करतात. अमेरिकेतील अनेक कॉलेजविद्यार्थीहि सुट्टीत कामे करतातच. गेली ५० वर्षे दरवर्षी हजारो परदेशी विद्यार्थी या प्रकल्पाअंतर्गत अमेरिकेत येतात. गेल्या वर्षीचा प्रकार आता होणार नाही असे वाटते. ज्या भारतीय विद्यार्थ्याना यात रस असेल त्यानी http://j1visa.state.gov/programs/summer-work-travel
या वेबसाइटवर माहिती पहावी.

येथे एकेक बातम्या वाचाव्या आणि नवल वाटावे असे रोज चालते. गेली दोन-चार वर्षे आर्थिक हलाखीची गेली. मुख्यत्वेकरून बॅंकेकडून भरमसाठ रक्कम कर्जाऊ घेऊन घरे विकत घेणारांचे हाल चालले आहेत. कर्जाचे हप्ते कोणत्याहि कारणाने, म्हणजे नोकरी जाण्यामुळे, मुख्यतः, थकले कीं बॅंका सरळ घर ताब्यात घेतात आणि कर्ज वसूल होईल एवढी किंमत मिळाली तर खुशाल विकून टाकतात. परिणामी देशाच्या अनेक भागांमध्ये घरांच्या किमती खूप उतरलेल्या आहेत.
थोडक्या किमतीत मिळाणार्‍या अशा घराचा एक नवाच उपयोग एका बातमीत वाचायला मिळाला. घर घेतले पण ते राहण्यासाठी नव्हेच! त्याच्या आंत गांजाची (Marijuana) लागवड करायची. कॅलिफोर्नियात औषधि-उपयोगासाठी गांजा बाळगण्यास परवानगी आहे व लागवडहि करता येते! मात्र उघड्या शेतावर गांजा लावण्या ऐवजी बंद घरात, green-house पद्धतीने वाढवलेल्या गांजाला जास्त किंमत मिळते म्हणे. हा प्रकार आता आडबाजूच्याच घरांतून नव्हे तर बर्‍या वस्तीच्या भागातील घरांमधूनहि चालतो. काही Accident किंवा आग वगैरे प्रकार होईतो शेजार्‍याना पत्ताहि लागत नाही. शिवाय शेजार्‍याच्या घरात डोकावण्यास हा काही भारतदेश नाही! येथे काही वर्षांपासूनचा शेजारी घर विकून गेला किंवा नवीन रहायला आला तरी कोणी दखल घेत नाही. त्यामुळे हे उद्योग उघडकीसहि येत नाहीत! २०१० साली कॅलिफोर्नियात ७९१ घरांमध्ये अशी लागवड उघडकीस आली असे बातमीत म्हटले होते. फोटो पहा म्हणजे खरे वाटेल.
या घराला आग लागली होती तेव्हा फायरब्रिगेडला, पोलिसाना व शेजार्‍याना कळले!

Tuesday, May 1, 2012

दोन गमतीदार हकिगती

धान्य कोठारात झाडे.
कान्सास राज्यातील ही कथा. राज्यात पूर्वापार शेती मोठ्या प्रमाणावर त्यामुळे धान्य साठवण्याचे सिलो गावोगावी अनेक शेतांमधून बांधलेले होते. सिलो म्हणजे ही एक जमिनीवर असणारी विहीरच असते. बांधकाम बहुधा दगडी. त्यामुळे भक्कम. मात्र शेतीच्या बदलत्या स्वरूपामुळे लहान शेतकर्‍यांच्या सिलो आता रिकाम्या पडलेल्या असतात. शेतीचे यांत्रिकीकरण व मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाल्यामुले, लहान शेतकर्‍यांच्या अवजारे ठेवण्याच्या शेड्स रिकाम्या व मोडकळीला आलेल्या दिसतात. छोटे गोठे व कोंबड्यांची खुराडींहि रिकामीं कारण पशुपालन वा कोंबड्या पाळणे लहान प्रमाणावर परवडत नाही. रिकामे सिलो वा शेड्स पाडून टाकण्याचा खर्च तरी कशाला करा म्हणून ते तसेच सोडून दिलेले असतात. हा प्रदेश बराच उघडा-बोडका, झाडी फार क्वचित. मात्र निसर्ग आपले काम कसे करतो पहा. सिलोवर छप्पर नसते त्यामुळे झाडाच्या बिया वरून आत पडतात. काही अखेर रुजतात. थोडेफार पावसाचे पाणी आपोआप मिळते. सुरवातीचे छोटे झुडूप हळूहळू वाढते. वर सिलोच्या उघड्या तोंडातून सूर्यप्रकाश खुणावत राहतो त्याच्या ओढीने झाड वरवर जोमाने वाढते, अखेर सिलोच्या तोंडातून बाहेर येते आणि मग आणखी जोराने वाढावयास मोकळीक! धान्याच्या कोठारात अशी झाडे वाढतात. खरे वाटत नाही? मग फोटोच पहा ना!

झाड सिलोच्या आतच आहे! पाठीमागे नाही!Isaac Hayes – Rip Van Winkle

रिप व्हॅन विंकल ची कथा आठवत असेल. दीर्घ काळ तो झोपी गेला. त्या काळात अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झाले आणि तो जागा झाला तेव्हा त्याला भोवतीचे जग ओळखूच येईना.
Isaac Hayes ची कथा थोडीफार अशीच. हा व्यवसायाने डॉक्टर पण त्याला हौस उत्तर ध्रुव शोधून काढण्याची! त्याची अशी थिअरी होती कीं उत्तर ध्रुवापाशी जमीन नाही तर समुद्र आहे आणि जहाजात बसून उत्तर ध्रुवापर्यंत जाता येईल! तेथे जमीन नाही हे कालांतराने खरे ठरले आहे पण ध्रुवाभोवतीचा समुद्राचा विशाल भाग कायमचा गोठलेला असतो त्यामुळे जहाज तेथपर्यंत जाऊ शकत नाही हे आता सर्वद्न्यात आहे.

डॉ.इसॅक हेस

आपली थिअरी सिद्ध करण्यासाठी डॉ. हेसने जहाजातून उत्तरध्रुवापर्यंत प्रवास करण्याचा प्रयत्न केला. जुलै १८६० पासुन ऑक्टोबर १८६१ पर्यंत हेस प्रवासात होता. बोस्टनपासून निघून ग्रीनलॅंड आणि कॅनडाच्या मधून उत्तर ध्रुवापर्यंत पोचण्याचा त्याचा प्रयत्न होता. ग्रीनलॅंडच्या पश्चिम किनार्‍यावरून उत्तरेला सरकत जातां आले तेवढे उत्तरेला तो गेला पण सर्व हिवाळा तेथेच कसाबसा काढून त्याला फार पुढे जाता आले नाही. ८१ डिग्रीज आणि ३५ मिनिटे येवढ्या लॅटिट्यूड पर्यंत तो पोचू शकला. तेथे त्याला जो समुद्राचा भाग दिसला त्यातून उत्तर ध्रुवापर्यंत जाता येईल ही त्याची समजूत कायम राहिली मात्र जहाजाची मोडतोड झाल्यामुळे परत फिरावे लागले. तो परत आल्यानंतर त्याची फारशी कोणी दखल घेतली नाही. मात्र त्याच्या अनुपस्थितीच्या काळात अमेरिकन यादवी युद्ध घडून गेले होते. देशातील परिस्थिति एकदम बदलून गेली होती आणि त्याला सगळ्या घटनांचा पत्ताच नव्हता! जणू तो रिप व्हॅन रिंकलप्रमाणे झोपेतून जागा झाला होता. त्यानंतर अमेरिकन सैन्यात नोकरी करून तो १८८१ मध्ये वारला. त्याची थिअरी अर्थातच खरी ठरली नाहीच.