Tuesday, March 27, 2012

त्सुनामी आणि सायकल-सहकार्य


यापूर्वीच्या एका लेखात लिहिले होते कीं त्सुनामीमुळे जपानमधून अनन्वित प्रमाणावर कचरा, अजमासे ८० लाख टन, – त्यात घरे, गाड्या, बोटी अशा मोठ्या वस्तूंचाहि समावेश आहे – समुद्रात ओढला गेला. वर्षानंतर आता त्यातील अनेक वस्तू हळूहळू अमेरिकेच्या किनार्‍यावर येऊन थडकूं लागल्या आहेत.
त्यातलाच एक प्रकार म्हणजे १५० फूट लांबीचे एक मासेमारीचे (होकॅडो स्क्विड फिशिंग कंपनीचे) जहाज कॅनडाच्या किनार्‍याजवळ आढळले आहे. त्यावर कोणीहि नव्हते त्यामुळे कोणी मरण्याचा प्रश्न नव्हता. सुदैवाने हे जहाज सागरातील नेहेमीच्या ये-जा करण्याच्या वाटेवर नसल्यामुळे त्याच्यापासून इतर जहाजाना धोका नाही तसेच त्यावर तेल वा इतर अनिष्ट वस्तू नसल्यामुळे पर्यावरणालाहि धोका नाही. त्यामुळे जहाज तोडण्याचा वा बुडवण्याचा सध्यातरी बेत नाही.
सायकल सहकार्य
न्यूयॉर्क शहरामध्ये मुंबईप्रमाणेच वाहतुकीचा प्रश्न ज्वलंत आहे. या उन्हाळ्यामध्ये त्यावर इलाज म्हणून सायकल सहकार्याचा एक अफलातून कार्यक्रम सुरू व्हावयाचा आहे. या कार्यक्रमा-अंतर्गत शहरामध्ये ६०० ठिकाणी सायकल भाड्याने मिळेल व त्यापैकी कोणत्याही ठिकाणी ती परत करता येईल. एकूण १०,००० सायकली यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्या अशा ठिकाणावरून सायकल घ्यावी व कामाच्या ठिकाणाजवळ वा रेल्वे स्टेशनजवळ ती परत करावी. घरी परततानाहि असेच करावे, म्हणजे सायकल विकत घ्यायला नको, ठेवावी कुठे, सुरक्षित कशी राहणार हे प्रश्न नाहीत. यामुळे ही योजना लोकप्रिय होईल अशी योजना सुरू करणार्‍या खात्याची अपेक्षा आहे. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये गेली दोन वर्षे अशी योजना, अर्थात लहान प्रमाणावर, (तीस सायकली आणि १० स्टेशने), चालवली जात आहे आणि तिला विद्यार्थी, प्रोफेसर व इतर यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी आणखी ४५ सायकली वाढवल्या जाणार आहेत. सायकली चोरीला जाण्याचे वा अपघाताचे प्रकार आढळले नाहीत त्यामुळे शहरात सुरू होणार्‍या मोठ्या कार्यक्रमालाहि यश येईल अशी आशा आहे.
मुम्बई शहरात असे काही कां होत नाही?

Tuesday, March 20, 2012

शैक्षणिक कर्ज आणि पावसाचे पाणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज.
अमेरिकेतल्या जीवनपद्धतीत आणि शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यानी शिक्षणासाठी कर्ज काढणे हे सर्वमान्य आहे. सरकारी शैक्षणिक कर्जावर व्याजदर माफक असतो आणि शिक्षण पुरे होऊन नोकरी-व्यवसायाला लागल्यावर साधारणपणे २-३ वर्षात विद्यार्थी कर्जमुक्त होतात. अर्थात ज्यांच्या पालकांकडे भरपूर पैसा असेल त्यांची गोष्ट वेगळी. फेडरल कंझ्यूमर फिनान्शियल प्रोटेक्शन ब्यूरो अशी एक सरकारी संस्था आहे. विद्यार्थ्याना कर्जफेडीबाबत वा कर्ज देणार्‍या धनको कडून वसुली तगादा याबद्दल काही गैरवाजवी त्रास होऊ नये याबद्दल ही संस्था मदत करते. शाळा-कॉलेजे व कर्ज देणार्‍या बॅंका विद्यार्थ्याना सरकारी कमी व्याजदराच्या योजनांबाबत अंधारात ठेवून भरमसाठ जास्त दराने कर्ज घेण्यास प्रवृत्त करतात असे आढळून आले आहे. विद्यार्थी असे चुकीने गृहीत धरतात कीं खाजगी व सरकारी कर्जाच्या अटी सारख्याच असतील. प्रत्यक्षात सरकारी शिक्षणकर्जाचे व्याजदर ६.८ % पेक्षा कमी असतात. खाजगी कर्जाचा व्याजदर १५% वा त्याहूनहि जास्त असल्याचे दिसून येते. सरकारी कर्ज शिक्षण संपल्यावर परत फेडताना काही अडचणी आल्यास, उदा. नोकरी जाणे, सवलतीचे धोरण असते. त्यामुळे काही काळ हप्ता थांबवणे वा कमी करून मिळणे शक्य असते. खाजगी कर्जाची वसुली पठाणी धोरणाने होते. अर्थात सरकारी कर्ज किती मिळेल याच्यावर मर्यादा असतेच. विद्यार्थ्याला सरकारी लोन मिळणे शक्य आहे कीं नाही हे कळणे आवश्यक आहे त्यामुळे वर उल्लेखिलेल्या ब्यूरोने असे नियम केले आहेत कीं खाजगी कर्जे देणारे वा शैक्षणिक संस्था यानी याबद्दल विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. अशा काही योजना व नियम भारतातहि हवेत.
विश्वास ठेवा!
हल्लीच एक बातमी वाचली आणि विश्वासच बसेना! पण न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहिले आहे तेव्हा खरेच असणार. न्यूयॉर्क हे जुने शहर आहे येथे Sewerage System आहे पण पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारेच नाहीत म्हणे! पावसाचे पाणी Sewerage मध्येच जाते! नवल वाटले ना? मुंबईमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारे फार पूर्वीपासून आहेत. पूर्वी शहरात तीं बंद व उपनगरात उघडी असत. त्यामुले उपनगरात डांस असत! आता बहुतेक उपनगरातहि तीं बंद केली गेली आहेत. फार मोठा पाऊस जास्त काळ पडला तर त्यांची क्षमता कमी पडते व मग पावसाचे पाणी तुंबते, पूर येतो हे सर्व वेळोवेळी आपण अनुभवलेले आहे. त्यावर उपाय म्हणून कोट्यावधि रुपये खर्चून पावसाचे पाणी पंपांनी खेचून समुद्रात फेकण्याच्या योजना (Brimstowad Project) अमलात आल्या आहेत.
पण न्यूयॉर्कची व्यथा वेगळीच आहे! पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइनच नाहीत. ते पाणी Sewerage च्या सिस्टिम मध्येच जाते! त्यामुळे जोराचा पाऊस झाला कीं Sewage बरोबर पावसाचे पाणी येऊन जेथे Treated Sewage नेहेमी सोडला जातो तेथेच सर्व प्रवाह बाहेर पडतो अर्थातच सर्वावर Treatment ची प्रक्रिया पुरी झालेली नसते. त्यामुळे त्या नद्या-नाल्यांमध्ये Polution होते. स्वतंत्र पाऊस-गटारे शहरभर यापुढे बांधणे अति खर्चाचे असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाणे कसे कमी करता येईल यासाठीच काही योजना अमलात येत आहेत. गच्च्यांवर बागा करणे, पार्किंग लॉट्समध्ये पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारचे Paving करणे, रस्त्यांच्या कडेला हिरवळ लावणे असे या योजनांचे स्वरूप आहे. अर्थात अशा 'फाटलेल्या आकाशाला ठिगळ लावणे' पद्धतीच्या योजनांमुळे प्रश्न कितपत सुटेल याची शंकाच आहे.

Thursday, March 15, 2012

त्सुनामी आणि एल्मोअर - दोन वेगळ्याच हकिगती

त्सुनामी
जपानमध्ये प्रचंड त्सुनामीची लाट येऊन अफाट नुकसान झाले त्या घटनेला एक वर्ष झाले. त्सुनामीच्या लाटांनी परत फिरताना असंख्य लहानमोठ्या वस्तू समुद्रात ओढून नेल्या. अशा वाहून गेलेल्या मालमत्तेचे वजन दोन लाख टन असल्याचा अंदाज आहे! यामध्ये घरगुती सामानाबरोबरच गाड्या घरे, बोटी अशा अनेक जड वस्तूंचाहि अंतर्भाव आहे. यातला किती भाग समुद्रात बुडून गेला, किती अजून पाण्यावर फिरतो आहे हे कोणी सांगू शकत नाही पण एक गोष्ट नक्की मान्य आहे की यातील कित्येक वस्तू आता अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर येऊन पोचत आहेत! येथून पुढे दीर्घकाळ लहानमोठ्या वस्तू किनार्‍यावर येत राहातील असा तज्ञांचा अंदाज आहे. यामध्ये प्लास्टिक वस्तूंचे प्रमाण बरेच राहील. प्लास्टिक Buoys अनेक मिळताहेत व त्यांवर त्सुनामीत नाश पावलेल्या जपानी ऑइस्टर कंपन्यांचे नाव असते. येऊ लागलेल्या इतर डेब्रिस वरहि अनेक वेळा जपानी अक्षरात लिहिलेला मजकूर असतो. National Oceanic and Atmospheric Administration ही संस्था या डेब्रिस वर लक्ष ठेवून आहे व पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जात आहे. किनार्‍यावर अशा काही वस्तू मिळाल्या तर त्याची माहिती लोकानी या संस्थेला कळवावी असे तिचे आवाहन आहे व त्याला प्रतिसादहि मिळत आहे. शेकडो ई-मेल संस्थेकडे येताहेत. मात्र चिनी, जपानी किंवा कोरियन भाषेतील अक्षरे असलेल्या अनेक लहानमोठ्या वस्तू यापूर्वीहि अशाच किनार्‍यांवर मिळत असत त्यामुळे आता मिळणार्‍या वस्तू या त्सुनामीने नेलेल्याच किंवा कसे याबद्दल एकवाक्यता नाही!
निर्दोष असणे पुरेसे नाही.
एड्वर्ड ली एल्मोअर जानेवारीत ५३ वर्षांचा झाला. या आफ्रिकन अमेरिकन माणसाचे निम्म्याहून अधिक आयुष्य न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यात गेले. ११,००० दिवस तुरुंगात राहून हल्लीच तो बाहेर पडला. तो अगदी निर्बुद्ध आहे. साउथ कॅरोलिनातील तुरुंगात तो दीर्घकाळ फाशीच्या कोठडीत अडकलेला होता. जो काही पुरावा रेकॉर्डवर आहे त्यावरून तो निर्दोष असण्याचीच जास्त शक्यता आहे. त्याच्या बाजूने ठरेल अशा चौकशीत पुढे आलेल्या गोष्टी लपवण्यात आल्या. गरिबीमुळे त्याला बर्‍यापैकी वकील मिळाला नव्हता. एका वृद्ध गोर्‍या स्त्रीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. सहा दिवसात त्याच्या खटल्याचे कामकाज संपले. त्या बाईच्या घरी तो कधीकधी खिडक्या धुण्या-पुसण्याचे काम करी. एवढाच त्याचा तिच्याशी संबंध आला होता. खुनापूर्वी १५ दिवस त्याने असे काम केले होते. खून झाल्यानंतर केलेया तपासात त्या स्त्रीच्या बिछान्यावर काही केस सापडले होते ते एल्मोरच्या शरीराच्या 'विशिष्ट भागा'वरचे असण्याची शक्यता सिद्ध होत होती एवढा एकुलता एक पुरावा त्याच्या विरुद्ध होता.(बिछान्यावरून जमा केलेल्या केसात एल्मोअरचे केस तपासाचे वेळी उपटून काढून मिसळले गेले असणेहि शक्य होते.)जमा केल्या केसात एक केस न जुळणारा पण होता मात्र ही गोष्ट लपवली गेली! (पुढे दीर्घ काळानंतर तो केस 'गोर्‍या' व्यक्तीचा असल्याचे दिसून आले आणि तो खर्‍या खुन्याचा असण्याची शक्यता नाकारता आली नाही). त्या काळात DNA टेस्ट नव्हती. पोलिस आणि सरकारी वकिलानी खटला एवढ्याच पुराव्यावर रेटून नेला. एल्मोरला फाशीची शिक्षा झाली. अनेक वर्षे अनेक प्रकारानी केलेल्या अपिलांचा उपयोग होत नव्हता. पण अखेर त्याच्या बाजूने लढणार्‍या कार्यकर्त्या वकिलाना यश आले. अखेरच्या अपिलातहि त्याला कोर्टाने निर्दोष ठरवले नाहीच. मात्र त्याने ( न केलेला) गुन्हा कबूल केल्याच्या बदल्यात सरकारपक्षाच्या संमतीने त्याला माफी देऊन तुरुंगातून सोडले. अमेरिकेत असेहि प्रकार घडत असतात.

Wednesday, March 7, 2012

धार्मिकता आणि ज्यू धर्मीय.

कट्टर धार्मिकता म्हटली कीं आपल्याला मुसलमान धर्म आठवतो. पण ज्यू धर्मीय किंवा जेझुईट हे काही कमी कट्टर नसतात! यासंबंधातील दोन हकिगती वाचनात आल्या.
न्यूयॉर्क मेडिकल कॉलेज अशी १८६० सालापासूनची एक जुनी शैक्षणिक संस्था आहे. सुरवातीपासून तिचा लौकिक चांगला आहे. स्त्रिया आणि परदेशातून अमेरिकेत आलेल्या समाजातील व्यक्ति यांना येथे सुलभपणे प्रवेश मिळत असे. येथील विद्यार्थी इतर मोठ्या कॉलेजांतून पुढील शिक्षण घेत असत. १९७० साली आर्थिक अडचणींमुळे हे कॉलेज न्यू यॉर्क मधील कॅथॉलिक पंथाच्या आश्रयाला गेले. मात्र तरी ते थोडेबहुत स्वातंत्र्य टिकवून होते व कॅथॉलिक पंथाचा प्रभाव रोजच्या कामकाजावर नव्हता. Touro नावाची एक ज्यू लोकांची शिक्षणसंस्था आहे. ती संस्था इतर क्षेत्रात शैक्षणिक कार्य करते. त्यानी आता हे कॉलेज ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या कट्टर धार्मिकतेचा प्रभाव कॉलेजच्या रोजच्या कामकाजावर दिसूं लागला आहे.
कॉलेज कॅथॉलिक चालवत असले तरी तेव्हां जिकडे-तिकडे ख्रिस्ताचे पुतळे, क्रॉस असा प्रकार नव्हता त्यामुळे ज्यू चालक आल्यावर ते काढावे लागले नाहीत. कॉलेजमध्ये एक चॅपेल होते पण तेही मान्यताप्राप्त नव्हते त्यामुळे ते बंद करावे लागले नाही. मुख्य बदल कॅंटीन्सच्या स्वयंपाकघरात झाले आहेत. ज्यू लोकांना एका विशिष्ट प्रकारे कत्तल केलेया प्राण्याचेच मांस खाण्याची परवानगी आहे. त्याला 'कोशर' मांस म्हणतात. हॅमहि त्याना चालत नाही. परिणामी, किचनचे दोन भाग केले गेले. एका भागातील सर्व जुनी यंत्रसामुग्री काढून टाकली किंवा गॅस टॉर्चने जाळून 'शुद्ध' करून घेतली. मग तेथे ज्यू ना चालणारे पदार्थ बनू लागले. किचनच्या दुसर्‍या भागात इतराना हवे असणारे पदार्थ बनतात. ज्यूना दुधाचेहि वावडे आहे त्यामुळे ज्यू भागात त्याचाहि वापर नाही! चहा - कॉफी घेणारानी एकदा त्यात दूध घातले तर तीं भांडीं ज्यू किचनमध्ये परत जाऊ शकत नाहीत! आतां बोला! या कॉलेजमध्ये शिकायचे तर इतरधर्मीयाना हे सर्व नियम पाळावेच लागतात. पण कॉलेजची फी कमी आहे त्यामुळे विद्यारथ्यांचा तोटा नाही!
दुसरी बातमी अशीच मजेशीर आहे.
न्यू यॉर्क मध्ये सर्वत्र उंच इमारती आहेत आणि लिफ्ट वापरण्याला पर्याय नाही. लिफ्टमध्ये शिरलो कीं आपण आपल्याला पाहिजे त्या मजल्याचे बटण दाबतो म्हणजे त्या मजल्यावर लिफ्ट थांबते आणि आपण बाहेर पडतो कारण आपण काही ज्यू नाही! मुसलमानांच्या शुक्रवार पेक्षा, ख्रिश्चनांच्या रविवार पेक्षा वा हिंदूंच्या एकादशी-चतुर्थी पेक्षा ज्यूंचा शनिवार ( त्यांचा सॅब्बाथचा दिवस) फार कडक असतो. त्या दिवशी काय काय करायचे नाही याबद्दल अनेक नियम आहेत. त्यात एका नियमाप्रमाणे असे काही करायचे नाहीं कीं ज्यामुळे ठिणगी उडेल! लिफ्टचे बटण दाबल्याने ठिणगी उडते (म्हणे) त्यामुळे शनिवारी लिफ्टचे बटण दाबायचे नाही! (मग घरातले विजेचे दिवे लावायचे-बंद करायचे नाहीत की काय माहीत नाही!)ज्या इमारतीमध्ये पुष्कळ प्रमाणावर ज्यू लोक रहात असतील तेथे शनिवारी एखाददुसरी लिफ्ट नेहेमीप्रमाणे चालू ठेवली जाते आणि इतर लिफ्टमध्ये दर शुक्रवारी सूर्यास्तापासून शनिवारी सूर्यास्तापर्यंत (सॅब्बाथ काळ), अनेक प्रकार केले जातात. एखादी लिफ्ट वर-खाली जाताना सर्व वेळ प्रत्येक मजल्यावर आपोआप थांबते. म्हणजे तुम्ही २० व्या मजल्यावर रहात असाल तर १-२-३ करत विसावा मजला येईपर्यंत लिफ्टमध्ये आराम करायचा! उतरताना त्या-उलट! त्या दुसरी एखादी लिफ्ट तळमजल्याहून निघाली कीं सरळ सर्वात वरच्या मजल्याला जाते व खाली येताना प्रत्येक मजल्यावर थांबते. ती अगदीं टॉपला राहणारांच्या सोईची! लिफ्टला चालक असला आणि तो तुम्हाला ज्यू म्हणून ओळखत असला आणि त्याला तुमचा मजला ठाऊक असला तर तो तुम्हाला योग्य मजल्यावर सोडीलच. काहीहि होऊदे पण लिफ्टचे बटण दाबायचे नाही! मी ज्यू असतो तर काय केले असते कोणास ठाऊक!

Friday, March 2, 2012

वेगळी ऍन फ्रॅन्क व वेगळीं घरे

आज वाचनात आलेल्या दोन गोष्टी. दोन्हीमध्ये 'वेगळेपणा' एवढाच समान धागा आहे.
ऍन फ्रॅन्कची कथा बहुतेकाना माहीत असते. तिच्या डायरीवर आधारलेला सिनेमाही खूप गाजला. ऍन, तिचे कुटुंब व इतर दोन कुटुंबे, सर्व ज्यू, यानी ऍम्स्टरडॅम मध्ये एका घरात बराच काळ युद्धकाळात जर्मन गेस्टापोपासून वाचण्यासाठी कसा काढला पण अखेर फितुरीमुळे ते सर्व जण उघडकीस आले व नंतर त्यांची रवानगी जर्मनानी ज्यूंच्या छळछावणीत केलीच ही ह्रूदयद्रावक कथा परिचित आहे.
आजच्या वर्तमानपत्रात एका अशाच कथेचा उल्लेख वाचला. Dr. Tina Strobos असे या स्त्रीचे नाव आहे. ती हल्लीच ९१ व्या वर्षी वारली. युद्धकाळात तिने ऍम्स्टरडॅम येथील ऍन फ्रॅंकच्या घराच्या जवळच असलेल्या आपल्या घरात १०० हून जास्त ज्यू लोकाना आसरा दिला होता. अर्थात एका वेळेला ३-४ च व्यक्ति तिच्या घराच्या पोटमाळ्यावर राहू शकत. पोटमाळा एका सुताराने असा कौशल्याने बनवला होता कीं त्याच्या अस्तित्वाची शंकाहि कोणास येऊ नये! काही धोका असला तर बेल मारून वर दडलेल्याना सावध केले जाई. शिवाय अवश्य तर खिड्कीतून बाहेर पडून शेजारच्या शाळेच्या छपरावर लपून बसता यावे अशीहि व्यवस्था केलेली होती त्यामुळे अखेरपर्यंत कोणीहि पकडले गेले नाही. काही दिवस राहून मग त्यांची दुसरीकडे पाठवणी होई. युद्धानंतर, आपले मेडिकल चे अर्धवट राहिलेले शिक्षण तिने पुरे केले व मग अमेरिकेत गेली व तेथेहि डॉक्टर म्हणून काम केले, विवाह, संसार, मुले नातवंडे वगैरे सर्व झाले. दीर्घ आयुष्य, मानसन्मान मिळाले. तिला एक वैषम्य मात्र वाटे कीं ऍन फ्रॅंकच्या कहाणीला जशी जगभर प्रसिध्ही मिळाली तशी तिच्या यशस्वी कामगिरीला मात्र मिळाली नाही. तिला आश्चर्य वाटे कीं ऍनच्या वडिलानी पोटमाळ्यावरून आवश्यक पडले तर बाहेर पडण्याची काही व्यवस्था कशी केली नव्हती? त्यामुळेच अखेर ते सर्व लोक पकडले गेले!
दुसरी वेगळी गोष्ट वाचली ती म्हणजे वेगळेच घर! धान्य साठवण्याच्या Silos चा वापर करून बनवलेले घर आणि मोडीत काढलेल्या Boeing 727 विमानाचे पंख कापून व आत सर्व नवीन व्यवस्था करून बनवलेले घर. आपल्याला अशा वेगळ्याच घरात रहायला आवडेल का? आपल्याकडे धान्याचे Silos मिळणार नाहीत पण कदाचित KingFisher वा AirIndia कडून स्वस्तात टाकाऊ विमान मिळाले तर पहा! फोटो पहा आणि मग ठरवा!