Friday, March 2, 2012

वेगळी ऍन फ्रॅन्क व वेगळीं घरे

आज वाचनात आलेल्या दोन गोष्टी. दोन्हीमध्ये 'वेगळेपणा' एवढाच समान धागा आहे.
ऍन फ्रॅन्कची कथा बहुतेकाना माहीत असते. तिच्या डायरीवर आधारलेला सिनेमाही खूप गाजला. ऍन, तिचे कुटुंब व इतर दोन कुटुंबे, सर्व ज्यू, यानी ऍम्स्टरडॅम मध्ये एका घरात बराच काळ युद्धकाळात जर्मन गेस्टापोपासून वाचण्यासाठी कसा काढला पण अखेर फितुरीमुळे ते सर्व जण उघडकीस आले व नंतर त्यांची रवानगी जर्मनानी ज्यूंच्या छळछावणीत केलीच ही ह्रूदयद्रावक कथा परिचित आहे.
आजच्या वर्तमानपत्रात एका अशाच कथेचा उल्लेख वाचला. Dr. Tina Strobos असे या स्त्रीचे नाव आहे. ती हल्लीच ९१ व्या वर्षी वारली. युद्धकाळात तिने ऍम्स्टरडॅम येथील ऍन फ्रॅंकच्या घराच्या जवळच असलेल्या आपल्या घरात १०० हून जास्त ज्यू लोकाना आसरा दिला होता. अर्थात एका वेळेला ३-४ च व्यक्ति तिच्या घराच्या पोटमाळ्यावर राहू शकत. पोटमाळा एका सुताराने असा कौशल्याने बनवला होता कीं त्याच्या अस्तित्वाची शंकाहि कोणास येऊ नये! काही धोका असला तर बेल मारून वर दडलेल्याना सावध केले जाई. शिवाय अवश्य तर खिड्कीतून बाहेर पडून शेजारच्या शाळेच्या छपरावर लपून बसता यावे अशीहि व्यवस्था केलेली होती त्यामुळे अखेरपर्यंत कोणीहि पकडले गेले नाही. काही दिवस राहून मग त्यांची दुसरीकडे पाठवणी होई. युद्धानंतर, आपले मेडिकल चे अर्धवट राहिलेले शिक्षण तिने पुरे केले व मग अमेरिकेत गेली व तेथेहि डॉक्टर म्हणून काम केले, विवाह, संसार, मुले नातवंडे वगैरे सर्व झाले. दीर्घ आयुष्य, मानसन्मान मिळाले. तिला एक वैषम्य मात्र वाटे कीं ऍन फ्रॅंकच्या कहाणीला जशी जगभर प्रसिध्ही मिळाली तशी तिच्या यशस्वी कामगिरीला मात्र मिळाली नाही. तिला आश्चर्य वाटे कीं ऍनच्या वडिलानी पोटमाळ्यावरून आवश्यक पडले तर बाहेर पडण्याची काही व्यवस्था कशी केली नव्हती? त्यामुळेच अखेर ते सर्व लोक पकडले गेले!
दुसरी वेगळी गोष्ट वाचली ती म्हणजे वेगळेच घर! धान्य साठवण्याच्या Silos चा वापर करून बनवलेले घर आणि मोडीत काढलेल्या Boeing 727 विमानाचे पंख कापून व आत सर्व नवीन व्यवस्था करून बनवलेले घर. आपल्याला अशा वेगळ्याच घरात रहायला आवडेल का? आपल्याकडे धान्याचे Silos मिळणार नाहीत पण कदाचित KingFisher वा AirIndia कडून स्वस्तात टाकाऊ विमान मिळाले तर पहा! फोटो पहा आणि मग ठरवा!

1 comment: