Thursday, December 20, 2012

बलात्काराला फाशीची शिक्षा

दिल्लीमधल्या भयानक बलात्कार प्रकरणानंतर अनेक व्यक्ति, राजकीय वा इतरहि, सर्रास बलात्काराला फाशीची शिक्षा हवी असे म्हणू लागले आहेत. हे फारसे विचारपूर्वक बोलले जात आहे असे वाटत नाही. पूर्वीहि एकदा श्री. अडवाणीनी अशीच, फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. खुनासारख्या गुन्ह्यालाहि जगात अनेक देशात फाशीची शिक्षा दिली जात नाही. फाशीची शिक्षा अजिबात नसावी असा विचार जगात अनेक देशात मान्य झालेला आहे आणि जरी भारतात फाशीची शिक्षा रद्द झालेली नसली तरी जगातील जनमताचा रेटा भारताकडून तशी अपेक्षा करत आहे. भारतातहि, जरी खुनाच्या गुन्ह्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यातून काढून टाकलेली नसली तरी सुप्रीम कोर्टाने त्याच्या वापरावर स्पष्ट बंधने टाकलीं आहेत. Rarest of Rare Case मध्येच फाशी फर्मावतां येईल असा नियम केलेला आहे. तसेच फाशीची शिक्षा होण्यासाठी गुन्हा पूर्णपणे निरपवादपणे सिद्ध व्हावा लागतो. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट अशा तीनहि ठिकाणी फाशी फर्मावली गेली तरीहि त्यानंतर दयेच्या अर्जाची तरतूद आहेच व त्याचा निर्णय अनेक वर्षे लागत नाही ही वस्तुस्थिति आहे. बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाला तर काही फायदा आहे काय हा विचार करण्यासारखा विषय आहे. या गुन्ह्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असू शकते. पोलिस, वकील न्यायाधीश या सर्वांची फिर्यादी व आरोपीकडे बघण्याची दृष्टि निकोप असते असे म्हणणे धार्ष्ट्याचेच ठरेल. कोर्टात खटला चालताना, फिर्यादी ही जणू आरोपी असल्याप्रमाणे तिला वागवले जाते! उलटतपासणीबाबत आरोपीच्या वकिलाना फार सवलतीने वागवले जाते. याउलट , काही वेळेला आकसाने वा अन्य हेतूने खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रकारहि होत नाही असे नाही! फाशीच्या शिक्षेचा कायदा झाला तर आरोप सिद्ध होण्याच्या कसोट्या जास्तच कडक होतील. त्याबाबत आरोपीला झुकते माप मिळेल अशी साधार भीति आहे. आरोप सिद्ध झाला तरीहि, Rarest of Rare Case हे बंधन राहीलच. त्यामुळे खरोखरी प्रत्यक्षात किती आरोपीना फाशीची शिक्षा दिली जाईल याची शंकाच आहे. उलट, कसोट्या कडक झाल्यामुळे निर्दोष सुटण्याचे प्रमाण कदाचित वाढेलच!. त्यामुळे फाशी हे या प्रष्नाचे उत्तर नाही. पोलिसांकडून फिर्यादी व्यक्तीला विश्वासाची, आधाराची, आदराची व न्यायाची वागणूक मिळू लागली व कोर्टात केस चालवण्याच्या पद्धतीत व दृष्टिकोनात सुधारणा झाली तरच न्यायाच्या मार्गावर स्त्रियांचा विश्वास बसेल नाही तर ‘आपले दुर्दैव’ असे म्हणून होणार्‍या अत्याचाराना बळी पडण्यापासून स्त्रियांना सुटका नाही.

Thursday, December 13, 2012

हिंदु होता येते काय?

हिंदु होता येते काय? काल एक बातमी वाचली ती विचार करण्यासारखी आहे. केरळच्या हायकोर्टाने एका केसमध्ये दिलेल्या निर्णयाची ती बातमी होती. एका मुस्लिम तरुणाने एका हिंदु मुलीशी लग्न केले होते. ते तिच्या घरच्या मंडळीना मान्य नव्हते व ते रद्दबादल ठरवावे असा दावा त्यानी केला होता. त्या तरुणाचे म्हणणे होते कीं त्याने हिंदु धर्म स्वीकारला होता व तो हिंदु झाल्याचे प्रमाणपत्र विश्व हिंदु परिषदेने दिले होते व त्यानंतर त्या दोघानी हिंदु विवाह कायद्याखाली लग्न केले होते. बातमीवरून असे दिसते कीं कोर्टाने त्याचा हिंदु झाल्याचा दावा अमान्य केला होता. व असे धर्म बदलून नवीन धर्माच्या कायद्याखाली केलेले लग्न बेकायदेशीर ठरवले व त्या दोघानी सिव्हिल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करावे म्हणजे ते कायदेशीर होईल असा त्याना सल्ला दिला. विश्व हिंदु परिषदेचा हिंदु करून घेण्याचा अधिकार कोर्टाने अमान्य केला असे म्हणता येईल. निर्णय देणारे दोन्ही जज्ज ख्रिश्चन होते याला काही महत्व देणे योग्य नाही पण ही गोष्ट लक्षात घेण्यास हरकत नाही. (ते हिंदु असते तर वेगळा निर्णय झाला असता?) त्या तरुणाने निर्णय मान्य करून कोर्टाच्या सल्ल्याप्रमाणे सिव्हिल मॅरेज रजिस्टर करण्याचे ठरवले असे बातमीत म्हटले होते. या निर्णयाने माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. हिंदु आईबापाचीं मुलें आपोआप हिंदु ठरतात. हिंदु धर्मामध्ये अ-हिंदूला दीक्षा देणे असा काही प्रकार नाहीं. कोणतीहि अशी धार्मिक यंत्रणा नाहीं कीं जिला हिंदु म्हणून जन्माला न आलेल्या व्यक्तीला हिंदु करून घेण्याचा अधिकार आहे! विश्व हिंदु परिषदेने वा इतर एखाद्या व्यक्ति वा संस्थेने जरी काही धार्मिक विधि ठरवले व ते केल्यावर एखाद्या व्यक्तीला हिंदु झाल्याचे शिफारसपत्र दिले तरी त्याला धार्मिक वा कायदेशीर आधार नाही. सार्वत्रिक मान्यताहि नाही. हिंदु मुलीशी लग्न करण्यासाठी हिंदु होणे सोडा, पण एखाद्या अन्य धर्मीय व्यक्तीला हिंदु धर्म खरोखरच आवडला व त्याला हिंदु व्हावयाचे असेल तर त्याने काय करावे? अशी एखादी कायद्याला मान्य अशी, हिंदु होण्याची प्रक्रिया असावयास नको काय? हिंदु धर्माच्या नावाने गळे काढणार्या वा उर बडवणार्या व्यक्ति वा संस्थांनी यासाठी काही चळवळ वा मागण्या वा प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पण खरे तर अशी काही तजवीज अवश्य असायला हवी! मुस्लिम व ख्रिस्ती धर्मामध्ये दुसर्या धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्मात घेण्यासाठी दीक्षा देण्याची तरतूद आहे व त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने मुस्लिम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर त्याला कायद्याची मान्यता नाकारता येणार नाही. फक्त, आर्थिक व इतर प्रलोभन दाखवले गेले असे सिद्ध झाले तरच कायदा काही करूं शकेल. बातमीतील मुस्लिम तरुणाचे जागी एखादा हिंदु तरुण असता व त्याने मुस्लिम / ख्रिस्ती मुलीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला असता व नंतर तिच्याशी मुस्लिम / ख्रिस्ती धर्माप्रमाणे विवाह केला असता तर कोर्टाने तो बेकायदेशीर ठरवला असता काय वा कोर्टाला तसे कायद्याप्रमाणे करता तरी आले असते काय हा मला पडलेला आणखी एक प्रश्न! बहुधा तसे करतां आले नसते! बातमी असे म्हणते कीं हे धर्म बदलून केलेले लग्न कोर्टाने बेकायदेशीर ठरवले. पण असे दिसते कीं फक्त हिंदु धर्मात प्रवेश करून केलेले लग्नच कायद्यात बसत नाही! माझ्या मुस्लिम-ख्रिस्ती वाचकानी या निर्णयावरून धडा घ्यावा! हिंदु वाचकानी मात्र या विषयाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे असे मला वाटते.

Sunday, December 2, 2012

थॉमस जेफरसन

अमेरिकेच्या इतिहासात थॉमस जेफरसनचे नाव विख्यात आहे. स्वातंत्र्ययुद्धाच्या संदर्भात त्याचे नाव जॉर्ज वॉशिंग्टनच्या बरोबरीने घेतले जाते. अमेरिकेचे Declaration of Independence हे त्याने लिहिलेले आहे. त्यात 'That all men are created equal, is a self evident truth’ असे त्याने म्हटले होते. मात्र हे फक्त गोर्‍या अमेरिकनांपुरतेच मर्यादित होते होते! हे लिहितेवेळी त्याच्या मालकीचे १७५ काळे गुलाम होते! यात काही गफलत आहे असे त्याला कधीच वाटले नाही. गुलामीच्या प्रथेचे त्याने नेहेमीच पूर्ण समर्थन केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्याचे आधीहि, जॉर्ज वॉशिंटनने आणि इतर अनेक पुढार्‍यानी आपल्या गुलामांना मुक्त केले, जेफरसनने ते अखेरपर्यंत मुळीच केले नाही. त्याने गुलाम विकत घेणे व विकणे अखेरपर्यंत चालू ठेवले होते. मृत्युकाळीहि त्याने फक्त पांच गुलामाना मुक्त केले. ते कोण होते? त्याची सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम उपपत्नी होती तिचे ते नातेवाईक होते! इतर २०० गुलामांची लिलावाने विक्री झाली! खुद्द सॅली हेमिंग्ज ही गुलामच राहिली मात्र तिचीं आणि जेफरसनचीं अपत्ये मुक्त झालीं! जेफरसन ‘दयाळू’ मालकही नव्हता. गुलामाना शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्या नातेवाईक व मित्रांपासून दूर ठिकाणी तो विकून टाकी! त्या काळीहि ती एक कठोर शिक्षाच होती. गोर्‍या नागरिकांसाठी सौम्य शिक्षा असावी असे म्हणणारा जेफरसन काळ्या गुलामांना वा मुक्त झालेल्या काळ्याना मात्र कठोर शिक्षाच हवी असे मानी. मुक्त गुलामाना Outlaws ठरवणारा कायदा त्याने मांडला होता. आपल्या राज्यामध्ये कालांतराने गुलामाना मुक्त करणारा कायदाहि त्याने होऊ दिला नाही! आपल्या शेजार्‍यालाहि त्याने 'गुलामाना मुक्त करूं नकोस' असाच सल्ला दिला. मुक्त झालेले काळे हे आपली काळजी घेऊ शकणार नाहीत व ते म्हणजे एक Pest च असतात असे त्याचे मत होते. एका १० वर्षांच्या काळात त्याने चैनीसाठी पैसे हवेत म्हणून ८५ गुलाम विकले!अशा अनेक गोष्टी आहेत. स्वतंत्र झालेल्या अमेरिकन राज्यांमधून गुलामांच्या स्वातंत्र्याच्या प्रगतीच्या आड जेफरसन व त्याच्या बरोबरीचे अनेक स्वातंत्र्यसेनानी आले ही अडचणीची वस्तुस्थिति आहे. ती जेफरसनच्या चरित्रात लेखक लोक जमेल तेवढी लपवत असतात. पण ती नाकारता येत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनुसूचित जाती-जमातीना आपल्या घटनासमितीने शक्य तेवढा न्याय दिला ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे.