Monday, April 29, 2013

धरणांमधले पाणी आणि दुष्काळ

हल्लीच उजनी आणि जायकवाडी या दोन धरणांसाठी वरच्या बाजूस असलेल्या धरणांमधून पाणी सोडण्याबाबत कोर्टांनी आदेश दिले आणि नाइलाजाने सरकारने तसे पाणी अखेर सोडले अशा स्वरूपाच्या बातम्या आपण सर्वानी वाचल्या आहेत. कोर्टाच्या बेअदबीचा धोका न पत्करतां याबद्दल काही विचार वाचकांसमोर ठेवावेसे वाटतात. १. नद्यांवरील धरणे बांधताना वरचीं आधी व खालचीं मागून (वा त्याचे उलट) असा काही नियम नाही. प्रत्येक धरण बांधताना, त्याचे वरचे बाजूस पडणार्‍या पावसाचे प्रमाण, ज्या क्षेत्रफळात पडणारे पाणी त्या धरणात जमू शकेल याचे माप, वरच्या अंगास पूर्वीच धरण असेल तर त्यात किती पाणी अडेल याचा हिशेब, हे सर्व पूर्णपणे विचारात घेऊन मगच या धरणात पाणी जमेल किती व त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी व इतर कामासाठी कसा उपयोग करावयाचा याचे आराखडे मांडले जातात. हे सर्व तांत्रिक काम आहे, कायद्याचे नव्हे. २. या वर्षी पाऊस कमी पडला आणि मराठवाड्यात फारच तुटपुंजा पडला हे सर्वज्ञात आहे. ३. अशा परिस्थितीत, विषेशेकरून दुष्काळी वर्षात, पावसाळा अखेर निरनिराळ्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन, त्याच्या वापराचे शास्त्रशुद्ध नियोजन करणे हे शासनाच्या संबंधित खात्याचे काम आणि कर्तव्यहि आहे. वरच्या बाजूच्या कोणत्या धरणातून सगळे उपलब्ध पाणी अडवून न ठेवतां काही प्रमाणात ते खालच्या धरणांसाठी ‘वेळीच’ सोडणे हे त्यांचेच काम आहे. ४. खालच्या धरणातील पाण्याचे लाभार्थी आणि वरच्या धरणाचे लाभार्थी यांचेपैकी कोणाचे हक्क अधिक हे कसे ठरवणार? एकाचे बाजूने कोर्टाचा निर्णय झाल्यास दुसर्‍या पक्षाने वरिष्ठ कोर्टाकडे धाव घ्यायची काय? कोणत्या कायद्यांचे आधारावर हक्कांची क्रमवारी ठरणार? आधी बांधलेल्या धरणाच्या लाभार्थींचे हक्क आधी निर्माण झाले तेव्हां त्यांचा क्रम वरचा मानावयाचा? ५. हल्लीच पाणी सोडण्याबद्दल जे दोन आदेश दिले गेले ते या अनेक प्रश्नांचा विचार करून दिले गेले काय? कायद्याचे ज्ञान हेच ज्यांचे मुख्य बळ त्या वकील आणि न्यायाधीशांनी असे निर्णय घेणे कितपत युक्त? प्रत्यक्षात सोडलेल्या पाण्यापैकी निम्मेच पाणी खालच्या धरणापर्यंत पोचू शकणार आहे हेहि स्पष्ट दिसत होते. मग या पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार कोण? ६. अशा तांत्रिक विषयांबाबत कोर्टाने बंधनकारक आदेश देण्यापेक्षा प्रश्न सरकारी वा खासगी तंत्रज्ञांवर सोपवणे उचित नव्हे काय? देशाचे शासन कोण चालवतो आहे असा कधीकधी प्रश्न पडतो? आपणाला काय वाटते?