Friday, October 26, 2012

अल्पवयीन गुन्हेगार.

अल्पवयीन गुन्हेगाराकडून गंभीर गुन्हा घडला असला तर त्याला काय शिक्षा व्हावी? अशा एका अमेरिकन गुन्हेगाराची कहाणी विचार करायला लावणारी आहे. मॉरिस बेले नावाच्या एका १५ वर्षांच्या मुलाचे हातून त्याच्याच एका वर्गभगिनीचा १९९३ मध्ये खून झाला. त्यांचे परस्परांवर प्रेम होते व ती गर्भवती झाली होती. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा म्हणजे आयुष्यभराची, भारताप्रमाणे १४ वर्षांची नव्हे! तीहि without parole म्हणजे तात्पुरती सुटका देखील मिळत नाही! अनेक वर्षे तुरुंगात राहून झाली. अजूनहि त्याला प्रष्न पडतो कीं आपल्या हातून तो गुन्हा घडलाच कसा? जून महिन्यामध्ये येथील सुप्रीम कोर्टाने १८ वर्षांखालील गुन्हेगाराना मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देणे बंद केले आहे. मॉरिसे बेले सारखे इतर २००० पेक्षां जास्त अशी शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. जरी हा निर्णय ‘पूर्वलक्षी प्रभावाने’ लागू झालेला नसला तरीहि या निर्णयामुळे त्याना थोडी आशा निर्माण झाली आहे. मात्र दयेचा विचार करावयाचा तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. बेलेची केसच पहा. त्याने मारलेल्या आपल्या मैत्रिणीचे नाव क्रिस्तिना. बेले आफ्रिकन अमेरिकन, क्रिस्तिना गोरी. दोघेहि सर्वांना आवडणारीं. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम. क्रिस्तिनाला मूल हवे होते पण बेलेला नको होते. बेलेचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर, त्यांचे गोर्‍या सहकार्‍यांशी पटत नसे. त्याना आपल्या मुलाने गोर्‍या मुलीवर प्रेम करणे मान्य नव्हते. एकदा त्याने अचानक घरी आला असता त्या दोघाना बेडवर पाहिले. त्याने मुलीला हाकलून दिले आणि आपल्या मुलाला बडवले. बेलेच्या आईला क्रिस्तिना पसंत होती. तीहि सुशिक्षित होती. मुलांचे चाळे तिला पसंत नव्हते पण क्रिस्तिना गरोदर झाल्यावर बेलेच्या आईने तिला धीर दिला होता. खुनाच्या आदल्या दिवशी क्रिस्तिनाने मैत्रिणीला म्हटले कीं तिने आपल्या आईवडिलाना आपण गर्भवती असल्याचे सांगायचे ठरवले आहे. आणि ती बेलेला दुसर्‍या दिवशी भेटून पुढचे ठरवणार होती. दुसर्‍या दिवशी मॉरिस तिला भेटला पण त्याने तिच्यावर सुर्‍याचे अनेक वार करून तिला मारले, सुरा झुडपात लपवला आणि घरी निघून गेला. घरी वडील भेटल्यावर त्यांच्या रागाचे कारण आता संपले हे त्याला जाणवले. परिसरातील इतर मुलाना क्रिस्तिनाचे प्रेत मिळाल्यावर पोलिसांना बोलावले गेले. क्रिस्तिनाच्या घरी तिच्या डायरीतून तिच्या व बेलेच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस बेलेच्या घरीं पोचले. त्याचे उद्गार – ‘तुम्ही येणार असे वाटलेच होते.’ कोर्टातील खटल्यामध्ये बेलेच्या वतीने बचावाचा भर त्याच्यावर आलेल्या प्रचंड ददपणाचा होता. त्याच्या वडिलानी साक्ष दिली कीं ‘मुलगी नासवलीस तरी मी तुला ठार मारीन’ असे मी मॉरिसला धमकावले होते. त्यामुले मॉरिस कैचीत सापडला होता. तो क्रिस्तिनापासुन दूर जाऊ पहात होता पण तेहि शक्य नव्हते. तो गांगरला होता. मात्र त्याला कायद्याप्रमाणे बंधनकारक असलेली आजन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अशा अनेक केसेस मध्ये अपिले करण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यात वेगळा दृष्टिकोन आहे. काही ठिकाणी ६० वर्षे शिक्षा भोगल्यावर सोडावे असे ठरले आहे! मॉरिसच्या केसमध्येहि अपिले होणार आहे. त्याचे अल्पवय, त्याच्यावरचे प्रचंड दडपण व अगतिकता यावर भर दिला जाईल. दुसरी बाजू अशी. क्रिस्तिना मारली गेली. मूलहि गेलेच. तिची आई काही महिन्यात गेली आजीहि गेली. क्रिस्तिनाची बहीण २२ वर्षांची होती ती म्हणते ‘एका वर्षात माझ्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यु झाला. माझ्यावर प्रचंड आघात झाला.’ आता मॉरिसच्या शिक्षेचा फेरविचार करायचा तर ते तिला अजिबात मान्य नाही. एक संपलेला विषय पुन्हा उकरून काढावयाचा व कालांतराने कां होईना चारांच्या मृत्यूला कारण झालेला मॉरिस पुन्हा मोकळा व्हावयाचा हे तिला सहन होत नाहीं! कोणाचे चूक, कोणाचे बरोबर? उत्तर नाहीच. मला प्रश्न एकच. अमेरिकेसारख्या सुधारलेल्या राष्ट्रात अल्पवयीन गुन्हेगाराला, गंभीर गुन्ह्यासाठी कां होईना, आजन्म कारावासाची अघोरी शिक्षा कां दिली जात होती? भारतामध्ये जन्मठेप म्हणजे १४ वर्षे शिक्षा. सावरकरांचे एक अपवादात्मक उदाहरण कीं त्याना दोन जन्मठेपी सुनावल्या व त्या एकत्र नव्हे तर एकामागून एक सोसावयाच्या होत्या. भारतावर अमेरिकनांचे राज्य असते तर ‘आजन्म कारावास!’ सुधारलेले राष्ट्र?

Saturday, October 20, 2012

व्याधीपेक्षा इलाज भयंकर - पुढे चालू

पाठ वा मानदुखीवर इलाज म्हणून पाठीच्या कण्यात द्यावयाच्या इंजेक्शनमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे अनेकाना मेनिंजायटीसची बाधा झाल्याची बातमी छापून आल्याचे लिहिले होते. आता तशा अनेक केसेस उघडकीस येत आहेत. अद्यापपर्यंत २४७ केसेस झाल्या आहेत व १९ पेशंट दगावले आहेत. १७००० पेक्षा जास्त त्या इंजेक्शनचे डोसेस त्या फार्मसीने पाठवले असल्याचे उघडकीस आले आहे. यातल्या किती डोसेसमध्ये इन्फेक्शन झाले होते ते निश्चित नाही. यातले इंजेक्शन ज्या कोणाला दिले गेले असेल त्या सर्वांशी संपर्क साधून सावध रहाण्यास कळवले जात आहे. फंगस इन्फेक्शन झालेल्यांना फंगसविरोधी औषधे दीर्घकाळ द्यावी लागतील. त्यांचेही काही दुष्परिणाम होतील. सध्यातरी ज्याना प्रत्यक्ष इन्फेक्शन झालेले उघडकीस आले नसेल त्याना Preventive म्हणून लगेच ही औषधे दिली जाणार नाहीत कारण इन्फेक्शन नसेलच तर त्या औषधांचे पेशंटच्या किडनी हृदय व लीव्हरवर वाईट परिणाम होतील! ही औषधे पुरेशी उपलब्धही नाहीत. एवढ्याने भागले नाही. ही इंजेक्षने बनवणाऱ्या कंपनीच्या इतर अनेक औषधांच्या लक्षावधी डोसेस मध्येही इन्फेक्शन असण्याची शक्यता आणि धास्ती वाटते आहे. त्यांची अशी इतर इंजेक्शन्स ओपन हार्ट सर्जरी, नेत्र शस्त्रक्रिया अशासाठी वापरली जातात. त्यामुळे त्या कंपनीने पुरवठा केलेल्या इतर औषधांच्या लाखों डोसेसबद्दलही शंका निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा सर्व औषधांचा पाठपुरावा चालू आहे. या कंपनीबद्दल पूर्वीही तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची पुरेशा गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती असेही उघडकीस आले आहे. आता काही कोंग्रेसमेन या सगळ्या घोटाळ्याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र किती लोकांच्या जीवाशी खेळ होणार आहे ते पहावयाचे. भारतात असे काही झाले असते तर इतका पाठपुरावा झाला असता काय ही शंकाच आहे. कसेही करून प्रकरण मिटवले जाण्याची शक्यताच जास्त!

Sunday, October 14, 2012

कोळसा आणि तेल

अमेरिकेत कोळसा खूप उपलब्ध आहे. कोळशाचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र अलीकडे पर्यावरणावर कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव झाल्यामुळे कोळसा जाळून विद्युतनिर्मिती करणे योग्य नाही हा विचार बळावला आहे. काही कोळशावर चालणारी विद्युतकेंद्रे बंद झाली आहेत. कोळशाची मागणी झपाट्याने कमी होत आहे. कोळसा उत्पादकांवर घटत्या मागणीचा दबाव पडत आहे. त्या बरोबरच अमेरिकेत नैसर्गिक वायूचे उत्पादन भराभर वाढत आहे. Hydraulic Fracturing or Fracting या पद्धतीने नैसर्गिक वायू भरपूर मिळू लागला आहे. त्याचाही कोळशाच्या विद्युतउत्पादनासाठी होणाऱ्या वापरावर परिणाम होत आहे. मग आता कोळशाच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांनी कोळशाचे करायचे तरी काय असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर उपाय म्हणजे कोळशाची निर्यात! कोळसा अमेरिकेत जाळला गेला नाही म्हणजे झाले मग तो चीनमध्ये जाळला गेला तर पर्यावरण हानीला चीन जबाबदार, अमिरेका नव्हे! अमेरिकेचा पश्चिम भाग सोडला तर इतर भागातून कोळशाची निर्यात झपाट्याने वाढत आहे. पश्चिम भाग मागे राहू नये यासाठी पश्चिम किनाऱ्यावर नवीन कोळसा-निर्यात बंदरे बांधली जात आहेत. खाणीपासून बंदरापर्यंत कोळशाच्या वाहतुकीसाठी नवीन रेल्वे लाईन बनते आहे. मात्र या भागातील मूळ अमेरिकन इंडियन लोकांचा या बंदराना विरोध होतो आहे. कोळशाचा माशांवर विपरीत परिणाम होईल अशी साधार भीती त्याना वाटते. कोणे एके काळी या इंडीयन लोकांशी काही करार केले गेले होते. त्या अन्वये त्यांचा परंपरागत मासेमारीचा या भागातील हक्क मान्य केलेला आहे. पर्यावरणवाद्यांचाही या कोळसा बंदराना जोरदार विरोध आहे. इंडियन लोकांच्या सहभागामुळे विरोधाची धार तीव्र होत आहे. तरी शेवटी भांडवलशाही यातून मार्ग काढीलच हे नक्की! याच संदर्भात आणखी एक बातमी वाचली. कॅनडा मध्ये तेलात भिजलेली रेती असलेले काही प्रचंड भूभाग आहेत. तेथे अक्षरश: ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडून’ ते तेल मिळवले जाते. इतर ठिकाणी तेलाच्या विहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलापेक्षा हे खूप दाट व घट्ट असते. हे तेल कॅनडापासून अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत वाहून नेले तर तिथल्या शुद्धीकरण कारखान्यात त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल, डीझेल वगैरे मिळवता येईल. त्यासाठी एक मोठी पाइपलाइन उत्तर-दक्षिण, कॅनडापासून गल्फ ऑफ मेक्सिको पर्यंत टाकण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. त्याला अनेकांचा अनेक कारणांसाठी विरोध आहे. प्रेसिडेंट ओबामा यांनी सध्यातरी दक्षिणेच्या काही भागाला परवानगी दिली आहे व उरलेल्या पाइपलाइनच्या मार्गामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता विचाराधीन आहे. निवडणुकीनंतर ओबामा अध्यक्ष राहिले तर ही पाइपलाइन नक्कीच मार्गाला लागेल. परवानगी मिळालेल्या भागाचे काम हल्लीच सुरु झाले आहे. त्यासाठी ५० फुट रुंदीचा जमिनीचा पट्टा त्या कंपनीला मोकळा करावा लागणार आहे. झाडे तुटणार आहेत. काही लोकांच्या जमिनीतून मध्येच लाईन गेल्यामुळे दोन तुकडे होणार आहेत. या कारणांमुळे स्थानिकांचा जोरदार विरोध चालला आहे. भारतातल्या चिपको चळवळीच्या धर्तीवर निदर्शने होताहेत आणि तीं मोडूनही काढली जात आहेत. शेवटी भांडवलशाही आपला मार्ग शोधतेच!

Thursday, October 11, 2012

व्याधीपेक्षा इलाज भयंकर

पाठदुखी ही उतार वयात अनेकाना सतावणारी व्याधि. भारतात तिच्यावर फार गंभीरपणे उपाययोजना केली जात नसावी अशी माझी समजूत आहे. ‘असा काही त्रास या वयात व्हायचाच’ असे मानून सोसत रहाणे वा काही किरकोळ इलाज करणे एवढ्यावर भागवले जाते. माझ्या आईची पाठ अनेक वर्षे कमीजास्त दुखत असे. अमेरिकेत तसे नाही. प्रत्येक व्याधीवर उपाय हवाच असे मानले जाते. दरवर्षी येथे ५० लाख व्यक्तींवर पाठ वा मानदुखीवर जालीम इलाज केला जातो. तो म्हणजे पाठीच्या कण्यात मणक्यांमधून सुई घालून Steroid या नावाने ओळखले जाणारे एक ओषध Inject केले जाते. त्याचा उपयोग होत असावा पण कायमचा नव्हेच. वेळोवेळी इंजेक्शन घ्यावे लागत असणार. सध्या या बाबत एक खळबळ जनक बातमी वाचावयास मिळत आहे. हे इंजेक्शन कोणत्याही मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीकडून रेडीमेड मिळत नाही. ते छोट्या फार्मसीमध्ये बनवून मिळते. हल्लीच हे बनवणाऱ्या एका कंपनीच्या डोसेस मध्ये फंगस इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे ज्याना त्यातले इंजेक्शन दिले गेले त्याना काही दिवसातच मेनिंजायाटीसचा गंभीर विकार जडला. आणि त्यातून काही जण दगावले. १७६७६ डोसेस त्या कंपनीने बाजारात पाठवले होते असे आढळून आले. त्यातून १३००० चे वर लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता दिसून आली आहे. १०५ प्रत्यक्ष केसेस आढळल्या आहेत व त्यातील ८ लोक अद्याप दगावले आहेत. आणखी अनेक केसेस होण्याची अपेक्षा आहे. या सर्वांशी संपर्क साधून सावध रहाण्यास व काही लक्षणे आढळल्यास हयगय न करण्यास कळवले आहे. कारण फंगसचा परिणाम दिसून येण्यास ४ आठवडे लागु शकतात. लागण झालेल्यांना उपाययोजनाही दीर्घकाळ घ्यावी लागणार आहे कारण फंगसवर कोणतेच ओषध उपयुक्त ठरत नाही. आता ही कंपनी व तशा इतर फार्मासीजच्या कार्यपद्धतीची चौकशी सुरु आहे. ही विशिष्ट कंपनी आता बंद झाली आहे. चौकशीत नेहेमीचे सर्व आर्थिक व राजकीय दबाव कार्यरत आहेत ! भारतात अशा उपाययोजनांचा फार प्रसार नाही हे चांगलेच आहे म्हणावयाचे.