Sunday, February 17, 2013

रेल ते ट्रेल

अमेरिकेत सर्व देशभर पसरलेले विस्तृत असे रेल्वेचे जाळे एकेकाळी कार्यरत होते हे बहुतेकाना माहीत आहे. या रेल्वेजाळ्याचा अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीत फार मोठा वाटा होता व एकदेशत्वाची भावना निर्माण करण्यातहि त्याचा वाटा भारताप्रमाणेच मोठाच होता. मात्र, दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकाभर राष्ट्रीय महामार्गांचे, उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम असे प्रचंड जाळेच निर्माण झाले व मोटारीने सर्व देशभर प्रवास सुलभ झाला. व्यक्तिगत प्रवासासाठी रेल्वे ऐवजी स्वतःची कार हीच सर्वांची प्रथम पसंती होऊ लागली. माल-वाहतुकीसाठीहि प्रचंड आकाराचे ट्रक वापरात आले. विमान-सेवांचे जाळे देशभर पसरल्यावर कार-प्रवासाइतकेच विमानप्रवासाचेहि दिवस आले. या सर्वाचा परिणाम रेल्वेसेवांवर होऊन अनेक भागांतील रेल्वे सेवांची उपयुक्तता भराभर कमी होऊन तोट्यात जाऊ लागली व दिवसेंदिवस बंदहि होऊं लागली. आता न्यूयॉर्क-बोस्टन-वॉशिंग्टन हा त्रिकोण सोडला तर इतरत्र चालू रेल्वे सेवा शोधाव्याच लागतील! कोठेकोठे Tourist Attraction या स्वरूपात त्या चालतात. मुंबई लोकलसारखी सेवा सान-फ्रानन्सिस्को शहरात आहे. मेट्रो (जमिनीवरून व खालून) बर्‍याच शहरात आहेत. मात्र लांबपल्ल्याच्या रेल्वेसेवा जवळपास नाहीतच. लॉस-एंजेलिस ते सानफ्रान्सिस्को अशी नवीन रेल्वेलाइन बांधण्याचा प्रकल्प अनेक वर्षे चर्चेत आहे. अमेरिकेत भारतासारखी सरकारी रेल्वेकंपनी कधीच नव्हती, त्यामुळे ‘ही रेल्वे बंद पडू दिली जाणार नाही’अशी पोकळ आश्वासने व घोषणाहि नव्हत्या (बहुतेक!) रेल्वे सेवा बंद पडली मग रेल्वेमार्गाचे काय झाले? मी सॅन-रॅमॉन येथे मुलाकडे अनेकदा राहिलो. हे शहर सॅन्फ्रान्सिस्कोच्या जवळ आहे. या शराच्या शेजारच्या डब्लिन-प्लेझंटन या जोड शहरापर्यंत या भागातील मुंबई-लोकलसदृश B. A. R. T. ही चालू रेल्वे सेवा येते. सॅनरॅमॉन शहरातूनहि पूर्वी एक रेल्वे फाटा जात होता तो बंद पडलेला आहे. त्याचे रूळ व स्लीपरहि काढून नेलेले आहेत. मात्र ट्रॅकवर अतिक्रमण होऊन झोपड्या उठलेल्या नाहीत. रेल्वेच्या मार्गाचे एका बर्‍यापैकी रुंद रस्त्यात रूपांतर झालेले आहे. मात्र हा वाहनांच्या वाहतुकीचा रस्ता नाही. अर्धा रस्ता कॉंक्रीटचा केला आहे. अर्धा खडीचा-डांबराचा आहे. त्यावरून सकाळ-संध्याकाळ, थंडीच्या दिवसात भर दुपारीहि, मुलांच्या-क्वचित मोठ्यांच्याहि-सायकली चालतात वा पादचारी एकेकटे वा घोळक्याने रमतगमत चालतात/धावतात. मीहि या रस्त्यावरून अनेकदा रमतगमत फिरलो आहे. मूळचा रेल्वे रस्ता असल्यामुळे याला Iron Horse Trail असे नाव आहे. (हे बहुधा तेथे पूर्वी धावणार्‍या रेल्वे इंजिनामुळे पडले असावे!) पुण्याच्या लॉ-कॉलेज रस्त्याजवळील जुन्या कालव्याच्या बदललेल्या स्वरूपाची तेथे आठवण येते. आता अमेरिकेतल्या इतरहि अनेक शहरांमध्ये बंद पडलेल्या रेल्वेट्रॅकचा वापर अशा प्रकारे जनतेच्या सुखसोईसाठी करण्याचे काम चालू आहे. अटलांटा शहराबद्दल हल्लीच अशी बातमी माझ्या वाचनात आली. तेथे २२ मैल रेल्वे ट्रॅकचे रूपांतर करण्याचे काम २००० पासून चालू आहे. २-३ मैल तयार झालेल्या ट्रेलला लागूनच एक जुन्या फर्निचरचे मोठे दुकान होते मात्र ट्रेल ही त्याची मागील बाजू होती. ट्रेलवर माणसांची वर्दळ भरपूर सुरू झाल्यामुळे व धंदा दसपट वाढल्यामुळे आता मागल्या बाजूलाहि दरवाजे करून गिर्‍हाइकांची सोय करण्यात येत आहे. कॉफीशॉप उघडले आहे. मालक म्हणतात, ‘हे सारे स्वप्नवत आहे. आम्हाला मागल्या बाजूने चोर्‍या होण्याची भीति वाटे आता तिकडून आम्हाला भरपूर गिर्‍हाइक मिळते!’ ‘योजकस्त्तत्र दुर्लभः’ हे कधीकधी खोटेहि ठरते.

Saturday, February 9, 2013

फाशीची शिक्षा

दिल्लीतील भयानक बलात्कार प्रकरणानंतर फाशीच्या शिक्षेबद्दल बरीच चर्चा झाली. आता काही विशिष्ट स्वरूपाच्या बलात्कार गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद वटहुकुमाने झाली आहे. जगात अनेक देशात फाशीची शिक्षा कायद्यांतून काढून टाकण्यात आली आहे. अमेरिकेतहि काही राज्यात ती बंद झाली आहे व इतरत्र तशी जोरदार मागणी आहे. त्याबाबतची तात्विक चर्चा नेहेमी चालतेच पण या विषयाला आणखीहि एक बाजू आहे व ती्हि वेळोवेळी पुढे येत असते. ती म्हणजे काही वेळेला निर्दोष व्यक्तीलाहि अशी शिक्षा होऊ शकते व निव्वळ अपीले चालू असल्यामुळे शिक्षा अमलात आलेली नसतानाच काही नवीन पुरावा उघडकीस येऊन ती व्यक्ति निर्दोष असल्याचे सिद्ध होऊन तिची सुटका होते. अशी उदाहरणे अगदीं किरकोळ असलीं तरी असे होऊ शकते ही गोष्ट फाशीच्या शिक्षेबद्दल चर्चा करताना विचारात घ्यावीच लागते. DNA तंत्रज्ञान वापरात आल्यानंतर अशा घटना अनेकवार उघडकीस येऊ लागल्या आहेत. अमेरिकेतील कर्क नोबल ब्लडवर्थ नावाच्या माणसाची हकीगत विलक्षण आहे. फाशीची शिक्षा झालेला पण DNA चाचणीमुळे निर्दोषत्व सिद्ध होऊन तुरुंगाबाहेर आलेला हा अमेरिकेतील पहिला माणूस! १९८४ साली हा मनुष्य कसलाही गुन्हा न केलेला एक निवृत्त मरीन सोल्जर होता व मेरीलॅंड राज्यात तो प्रामाणिकपण जगत होता. त्याच्या शेजारणीने टी व्ही वर एका संशयित फरारी आरोपीचे पोलिस-रचित चित्र पाहिले व तिला ते ब्लडवर्थचेच वाटले व तिने पोलिसांस कळवले. त्या व्यक्तीवर ९ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार व तिचा खून केल्याचा संशय होता. कसे कोणास ठाऊक पण ब्लडवर्थला पकडून नेल्यावर त्याच्यावर झटपट खटला चालून त्याने मुळीच न केलेल्या गुन्ह्यांबद्दल फाशीची शिक्षाहि झाली. त्याने व त्याच्या वकिलानी अपील प्रक्रिया जोरात चालू ठेवली. ९ वर्षे तुरुंगात गेली. मग DNA तंत्रज्ञान उपलब्ध झाले. बर्‍याच प्रयत्नांनंतर त्याच्या केसमध्ये ते तंत्रज्ञान वापरले गेले व १९९३ मध्ये तो निर्दोष ठरून तुरुंगातून बाहेर आला! अनेक वकिलांची तरीहि त्याच्या निर्दोषित्वाबद्दल खात्री पटली नव्हतीच. त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी चाललेल्या देशभरच्या चळवळींमध्ये त्याने नेहेमीच पुढाकार घेतला. व अजूनहि घेत असतो. आपले निर्दोषित्व सिद्ध झाले एवढ्यावरहि त्याचे समाधान झाले नाही. त्या बालिकेला न्याय मिळण्यासाठी खरा गुन्हेगारहि सापडणे आवश्यक होते. देशभर अनेक कारणांनी अनेक गुन्हेगारांची व संशयितांची DNA चाचणी होऊन हळूहळू एक मोठी राष्ट्रीय DNA DATABASE तयार होऊ लागली होती. तिच्याशी तुलना करण्याचा आग्रह ब्लडवर्थ व त्याच्या वकिलानी धरला होता. अखेर त्याप्रमाणे शोध घेतल्यावर खरा गुन्हेगारहि ओळखला गेला व त्याच्यावर गुन्हा शाबित झाला. मला नवल वाटते वाटते कीं अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात निर्दोष माणसाला फाशीसारखी शिक्षा होऊंच कशी शकते? भारतामध्ये असा प्रकार होत असेल काय? आपल्या येथे ज्यूरी पद्धत नाहीं. आपल्या सेशन कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट अशा तीनहि ठिकाणी असे होणे असंभव वाटते. संशयाचा फायदा मिळून आरोपी सुटण्याची शक्यताच जास्त. फाशीची शिक्षा ही तर Rarest of Rare Case मध्येच द्यावयाची असल्यामुळे गुन्हा निस्संदिग्धपणे सिद्ध झाल्याशिवाय फाशीची शिक्षा दिली जाणार नाहीच. त्यामुळे असा घोर अन्याय भारतात होणार नाही असे वाटते. अमेरिकेत मात्र गेल्या ४० वर्षात विना-अपराध शिक्षा झालेल्या व नंतर सुटलेल्या व्यक्तींच्या अशा १४२ केसेस झाल्या आहेत व सुटकेसाठी त्यातील तील फक्त १८ केसेस मध्ये DNA टेस्ट्चा उपयोग झाला असे ब्लडवर्थ संबंधीच्या बातमीत म्हटले होते. म्हणजे इतर केसेस मध्ये पुराव्यातील इतर त्रुटीच उघडकीस आणल्या गेल्या असाव्यात, ज्या सर्व कोर्टांच्या नजरेतून सुटल्या होत्या! न्यायदेवता सगळीकडे आंधळीच!

Monday, February 4, 2013

पुन्हा दाभोळ प्रकल्प.

बातमी वाचली असेलच आपण कीं रिलायन्सचा स्वस्त गॅस दाभोळच्या विद्युतप्रकल्पाला अतिशय अल्प प्रमाणात मिळतो आहे आणि रिलायन्सचे गॅस उत्पादन दिवसेदिवस कमीच होत चालले आहे त्यामुळे हे प्रमाण वाढण्याची मुळीच शक्यता नाही. रिलायन्सचा गॅस सध्या स्वस्त आहे पण हे आणखी एखादे वर्षच खरे राहणार आहे. २०१४ पासून रिलायन्सच्या गॅसची किंमशि भरपूर वाढणार आहे. जादा किंमत देऊनहि गॅस मिळण्याचे प्रमाण वाढणार नाहीच कारण उत्पादन कमीच राहील असे दिसत आहे. दाभोळची जेटी तयार झाली आहे व परदेशतून द्रवरूप गॅस आयात करण्याची सर्व सोय झाली आहे मात्र त्या गॅसचे काय होणार आहे याबद्दल यापूर्वी दोनवेळा लिहिलेच होते. या गॅसची किंमतहि कमी नाहीच त्यामुळे हा गॅस वीजनिर्मितीसाठी मिळाला तरी वीज महागच पडणार आहे. त्यामुळे दाभोळचा विद्युत आणि गॅस आयात प्रकल्प महाराष्ट्रात असला तरी, एक तर पडेल त्या भावाने वीज घेण्याची महाराष्ट्राची तयारी असेल तरच ती मिळेल, नाही तर इतर जो कोणी पैसे मोजण्यास तयार असेल तिकडे वीज जाईल. गॅसचा वापर करण्यावर आधारित खत वा इतर कोणताही प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला राज्यात झालेल्या या पूर्ण दाभोळ प्रकल्पाचा काहीहि उपयोग यापुढे होणार नाही असे स्पष्ट दिसत आहे. ‘एन्रॉन नकोच’ म्हणणारांचा विजय असो!! आता हा प्रकल्प समुद्रात बुडवण्यास हरकत नाही!