Thursday, October 11, 2012

व्याधीपेक्षा इलाज भयंकर

पाठदुखी ही उतार वयात अनेकाना सतावणारी व्याधि. भारतात तिच्यावर फार गंभीरपणे उपाययोजना केली जात नसावी अशी माझी समजूत आहे. ‘असा काही त्रास या वयात व्हायचाच’ असे मानून सोसत रहाणे वा काही किरकोळ इलाज करणे एवढ्यावर भागवले जाते. माझ्या आईची पाठ अनेक वर्षे कमीजास्त दुखत असे. अमेरिकेत तसे नाही. प्रत्येक व्याधीवर उपाय हवाच असे मानले जाते. दरवर्षी येथे ५० लाख व्यक्तींवर पाठ वा मानदुखीवर जालीम इलाज केला जातो. तो म्हणजे पाठीच्या कण्यात मणक्यांमधून सुई घालून Steroid या नावाने ओळखले जाणारे एक ओषध Inject केले जाते. त्याचा उपयोग होत असावा पण कायमचा नव्हेच. वेळोवेळी इंजेक्शन घ्यावे लागत असणार. सध्या या बाबत एक खळबळ जनक बातमी वाचावयास मिळत आहे. हे इंजेक्शन कोणत्याही मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीकडून रेडीमेड मिळत नाही. ते छोट्या फार्मसीमध्ये बनवून मिळते. हल्लीच हे बनवणाऱ्या एका कंपनीच्या डोसेस मध्ये फंगस इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे ज्याना त्यातले इंजेक्शन दिले गेले त्याना काही दिवसातच मेनिंजायाटीसचा गंभीर विकार जडला. आणि त्यातून काही जण दगावले. १७६७६ डोसेस त्या कंपनीने बाजारात पाठवले होते असे आढळून आले. त्यातून १३००० चे वर लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता दिसून आली आहे. १०५ प्रत्यक्ष केसेस आढळल्या आहेत व त्यातील ८ लोक अद्याप दगावले आहेत. आणखी अनेक केसेस होण्याची अपेक्षा आहे. या सर्वांशी संपर्क साधून सावध रहाण्यास व काही लक्षणे आढळल्यास हयगय न करण्यास कळवले आहे. कारण फंगसचा परिणाम दिसून येण्यास ४ आठवडे लागु शकतात. लागण झालेल्यांना उपाययोजनाही दीर्घकाळ घ्यावी लागणार आहे कारण फंगसवर कोणतेच ओषध उपयुक्त ठरत नाही. आता ही कंपनी व तशा इतर फार्मासीजच्या कार्यपद्धतीची चौकशी सुरु आहे. ही विशिष्ट कंपनी आता बंद झाली आहे. चौकशीत नेहेमीचे सर्व आर्थिक व राजकीय दबाव कार्यरत आहेत ! भारतात अशा उपाययोजनांचा फार प्रसार नाही हे चांगलेच आहे म्हणावयाचे.

No comments:

Post a Comment