Tuesday, June 19, 2012

दोन कुत्र्यांच्या कथा.

रानटी कुत्रा
ऑस्ट्रेलियातील एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी आहे. उलुरु नावाच्या मध्य ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागातील गावामध्ये १७ ऑगस्ट १९८० रोजीं ऍझेरिया चेंबरलेन नावाची एक बालिका कुटुंबाच्या तंबूतून एका जंगली कुत्र्याने ओढून नेली. आईबाप शेकोटीभोवती बसले होते त्याना पत्ता लागण्यापूर्वी ही घटना घडली. दुर्दैवाची गोष्ट अशी कीं मुलीचा पत्ता लागला नाहीच उलट मुलीला मारल्याचा आरोप तिच्या आईवरच ठेवला गेला! सर्व न्यायाचे सोपस्कार पुरे होऊन आरोप सिद्ध झाल्याचे ठरून तिला तुरुंगात जावे लागले. पार्क रेंजरनी व स्थानिक माग काढणारानी मुलीला ओढून नेल्याच्या खाणाखुणा दिसत असल्याचे म्हटले पण तिकडे दुर्लक्ष केले गेले. गाडीच्या पुढील भागात रक्ताचे डाग आढळले होते. (पुढे ते केमिकल स्प्रे चे होते असे आढळून आले!) आई लिंडी चेंबरलेन हिला शिक्षा होऊन तिने तीन वर्षे तुरुंगात काढली. तिथेच तिच्या मुलाचा जन्महि झाला.
मात्र अनेकाना अन्याय जाणवत होता. अपिले झाली. एक चौकशी कमिशन नेमले गेले होते त्याने पुराव्यात फार गोंधळ झाल्याचा निष्कर्ष काढला. तीन वर्षांनंतर आईला निर्दोष सोडण्यात आले. या कथेवर एक सिनेमा निघाला व त्यानेहि जनमत ढवळून निघाले.
आता इतक्या वर्षांनंतर व अनेक तपासण्यांनंतर कॉरोनरने बालिकेच्या मृत्यूचा बदललेला दाखला दिला आहे व त्यात मृत्यूचे कारण जंगली कुत्र्याचा हल्ला असे दाखवले आहे. पालकांवरचा डाग अखेर पुसला गेला आहे.
ही दुसरी कथाही एका कुत्र्याची आहे.
Elephant Butte या गावात Blue या नावाचा एक कुत्रा गेली अकरा वर्षे आहे. हा कोणाच्याच मालकीचा नाही म्हणून सर्वांचाच आहे! Australian Cattle Dog जातीचा हा कुत्रा आहे. आता तो म्हातारा झालेला आहे, त्याला चालवत नाही. पूर्वी तो कोठेहि गाड्यांमधूनच पळत रस्ता ओलांडत असे. गावात सर्वांच्या तो ओळखीचा व आवडता असल्यामुळे आता लोक त्याला रस्ता ओलांडू देण्यासाठी गाड्या थांबवतात. काहीना हे आवडत नाही!
गावातल्या Butte General Stores and Marine या दुकानात आता तो पडून असतो. मात्र त्याच्यासाठी अनेक जण देणग्या देतात त्या त्याच्या नावाने असलेल्या बॅंक खात्यात जमा होतात! $ 1,800 जमा आहेत! त्याच्या नावाने फेसबुक पान आहे! गावात लोकवस्ती १४३१ आहे तर फेसबुक पानाला २९०० लोक फॉलो करतात!
कोणीतरी तक्रार केली कीं आमच्या कुत्र्यांना बांधून ठेवावे लागते तसेच ब्ल्यूलाहि बांधून ठेवले पाहिजे. स्टोअरचा मालक ओवेन्स याला ताकीद मिळाली कीं ब्ल्यू ला बांधून ठेवा. खरा तो काही ब्ल्यू चा मालक नाही. ब्ल्यू ला बांधण्याची काही गरज नाही असे अनेक नागरिकाना वाटते. ब्ल्यू ला नियमातून सूट द्यावी काय याचा विचार करण्यासाठी अखेर एक सभा भरली. अनेक नागरिक ब्ल्यू च्या बाजूचे होते. मात्र कायदा मोडू नये म्हणून अखेर मेयरने निर्णय दिला कीं ब्ल्यू ला मोकळे ठेवायचे तर स्टोअर मालकाने स्टोअरभोवती विजेचे कुंपण घालावे.
दुसरे दिवशी नाइलाजाने ब्ल्यू ला leash लावली गेली!

Monday, June 11, 2012

१) ग्लास ब्लोइंग व २) जपानमधील जुना आतंक

ग्लास- ब्लोइंग
ही एक अद्भुत कला आहे पण ती आपणा सर्वसामान्यांच्या फारशी परिचयाची नसते. आजच्या पेपरमध्ये फोर्ड नावाच्या एका अशा कलाकाराची माहिती वाचली. दिवसा तो काचेची शास्त्रीय उपकरणे – उच्च दर्जाचीं व गुंतागुंतीच्या रचनेचीं – बनवणार्‍या कारखान्यात ग्लास-ब्लोइंगचे काम करतो व रात्री स्वतःच्या गॅरेजमध्ये आपल्या कलेचा वापर करून सुंदरसुंदर बस्तू बनवतो. त्याना कलात्मक मूल्य असतेच पण उत्तम किंमतही मिळते. त्याच्या कारखान्यातील कामाचे व कलेचे नमुने पहा.





औम शिनरिक्यो

१९९५ सालची जपानच्या टोकियो शहरातील एक भीषण बातमी अजून अनेकांच्या स्मरणात असेल. वर नाव दिलेल्या एका विचित्र व अघोर पंथाच्या काही लोकानी टोकियोच्या सबवे मध्ये मृत्युवायु सोडून हाहाःकार माजवला होता. १२ प्रवासी व एक स्टेशन कामगार त्यात मेले आणि इतर हजारोना यातना सोसाव्या लागल्या. त्या पंथाचे काही पुढारी व मुख्य गुरु ‘शोको आसाहारा’ तेव्हाच पकडले गेले पण काही आरोपी सापडले नव्हतेच. त्यातील एक स्त्री –नाव ‘किकुचि’ - टोकियोच्या परिसरात गरीब वस्तीत नाव बदलून एका सुतारकाम करणाराबरोबर 'तशीच'रहात होती व कोणाच्याही नजरेत येऊ नये अशा प्रकारे ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ असे दिवस काढत होती. ओळखण्याचा धोका टाळण्यासाठी त्यानी लग्नहि केले नव्हते! अचानक कोणीतरी तिला जुन्या काळातील पोलिसांच्या फोटोवरून अखेर ओळखलेच व ती पकडली गेली.





जुन्या व नव्या फोटोंमध्ये साम्य आहे पण ओळख पटणे सोपे नाही. ओळखणाराला पोलिसांकडून १,२५००० डॉलर बक्षीस मिळाले. आता तिच्याकडून मिळवलेल्या माहितीवरून एक अखेरचा फरारी आरोपीहि – नाव ‘टाकाहाशि’ - पकडता येईल अशी पोलिसाना आशा आहे. जपानमधील जनतेने ते सर्व प्रकरण विसरून जाण्याचे ठरवले होते पण पुन्हा एकदा त्या भीषण स्मृति जाग्या झाल्या आहेत.