Saturday, April 30, 2011

हा ब्लॉग बंद करीन!

हा ब्लॉग बंद करीन!
राजकारणात, समाजकारणात, सत्तेवर असलेल्या अनेकांवर वेळोवेळी अनेक प्रकारचे खरे वा खोटे आरोप होत असतात. सर्व आरोप नाकारलेहि जातात. ’माझ्यावरचा आरोप सिद्ध झाला तर मी हे सत्तास्थान सोडून देईन, राजकारण सन्यास घेईन राजीनामा देईन’ असे काहीबाही बोलले जाते. गंभीर आरोप सिद्ध झाला तर सत्तास्थान सोडून देणे हीच पुरेशी शिक्षा असे जनतेने समजावयाचे काय? ’आरोप सिद्ध झाला तर कायद्याने दिली जाणारी शिक्षा मी तक्रार न करता स्वीकारीन’ असे कोणी म्हणत नाही! मग तो पुडुचेरीचा लेफ्टनंट गव्हर्नर असो वा आणखी कोणी. बदनामीचा वा नुकसानभरपाईचा दावाही फार क्वचित लावला जातो.
मीहि म्हणतो माझ्यावर कोणी आरोप केला तर मला म्हणतां येईल कीं ’माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते सिद्ध झाले तर मी हा ब्लॉग लिहिण्याचे बंद करीन!’

Friday, April 29, 2011

जैतापुर पॅकेज

जैतापुर प्रकरण अनेक कारणांमुळे गाजत आहे. प्रकल्पग्रस्तांचा विरोध शमविण्यासाठी सरकारने एक नवीन पॅकेज बनवले आहे असे आज पेपर्समध्ये छापून आले आहे. ज्यांचा ’अणुविद्युत नकोच’ किंवा ’जैतापुर काही झाले तरि नकोच’ असा आग्रह आहे त्यांच्यावर कोणत्याच पॅकेजचा प्रभाव पडणार नाही. प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी सम्पादित केल्या आहेत किंवा केल्या जाणार आहेत ते किंवा तेथील शेती-बागायतीवरच ज्यांची उपजीविका अवलंबून आहे किंवा मासेमारीवर विपरीत परिणाम होईल अशी सार्थ वा निराधार समजूत आहे त्यांच्या मतपरिवर्तनासाठी पॅकेज कदाचित उपयुक्त ठरेल. फिशिंग जेट्टी, कोल्ड स्टोरएज वा मत्स्यप्रक्रिया, बोटींसाठी अर्थसहाय्य अशा कल्पना योग्य आहेत. त्यासाठी खर्च होणारा पैसा कारणीं लागूं शकतो. प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या वा तत्सम गोष्टीहि योग्यच. संपादित जमिनीना भरमसाठ भावाने किंमत मोजणे हे मात्र बरोबर नाही. सरकारने कितीहि कंठशोष करून सांगितले कीं this will not be trated as a precedent तरी तें खरे नाही. पुन्हा पुढे केव्हाही सरकार जमीन संपादन करील तेव्हां याच भावाने किंमत मिळाली पाहिजे अशी मागणी नक्कीच उभी राहील आणि ती अयोग्य कशी म्हणतां येईल? मामला कोर्टात गेला तर तेथेहि सरकारचा निभाव लागणार नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावरहि सरकारचा असा दावा टिकणार नाही. प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्यासाठी असे Ad Hoc निर्णय करणे चूक आहे. याबाबत एखादे कमिशन नेमून निश्चित नियमावलि ठरवणे श्रेयस्कर.

Thursday, April 28, 2011

एअर इंडिया

हे एक कायमचे आणि बरे न होणारे दुखणे झाले आहे. मिनिस्टर बदलले, मॅनेजिंग डायरेक्टर बदलले, एअर – इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स एकत्र केले वा वेगळेवेगळे केले तरी कोणतेही प्रष्न सुटत नाहीत. प्रचंड तोटा वर्षानुवर्षे होतोच आहे. दैनंदिन चालू खर्चाला पुरेल इतकेही उत्पन्न होत नाही. भारत सरकारला वेळोवेळी कोट्यावधि रुपये झोळीत टाकावे लागतात. झोळी ’दुबळी आणि फाटकी’ असल्यामुळे 'पोटापुरता पसा'हि पिकत नाही. तेव्हा 'पोळी' पिकण्याचा प्रष्नच नाही.
हे असेच कां चालू द्यायचे? त्यांत वर पगार- भत्ते वाढीसाठी हवें तेव्हां संप आहेतच. प्रवाशांची कोणालाच पर्वा नाही. आता तर नापास होणार्‍याना पायलट बनवण्याचा खेळ उघडा पडला आहे. तेव्हा जिवाची पण शाश्वति नाही. भारत सरकारने हा खेळ कशासाठी चालू ठेवावा? एकदाच एअर-इंडिया बंद करावी, विमाने फुकून टाकावी, स्टाफची व इतरांचीं जी काय देणी असतील ती द्यावीं आणि खेळ खलास करावा. मग देशातील वा परदेशातील खासगी कंपन्यांना विमाने परवडली तर चालवूं दे, परवडेल तेवढा पगार देऊंदे. राष्ट्रपति, मुख्यमंत्री, या दोघांचसाठी सरकारी विमान असावे. इतरानी जी सेवा जनतेला मिळत असेल तीच घ्यावी. नाहीतर बलवासारख्या कंपनी मालकांची खासगी विमाने आहेतच!
अमेरिकेकडे वा इंग्लंडकडे कुठे सरकारी मालकीच्या विमान कंपन्या आहेत? पुढील निवडणुकीत एअर-इंडिया बंद करण्यास तयार असलेल्यानाच मते द्या!

Monday, April 25, 2011

विद्युत निर्मितीसाठी पाणी

विद्युत निर्मितीसाठी पाणी
फक्त सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा सोडली तर कोळसा, तेल, गॅस किंवा कोणताही बायो-मास (उदा. उसाचा चोथा) जाळून वीज निर्माण करावयाची तर पाणी लागते. अणु-ऊर्जेसाठीहि लागते. ते कशासाठी हे सामान्य माणसाला पुरेसे माहीत नसते.
इंधन जाळून जी उष्ण्ता निर्माण होते ती उष्ण गॅसच्या स्वरूपात असते. तो वायु बॉयलर मधून गेला कीं त्यातिल ऊष्ण्ता बॉयलर ट्यूब्समधील पाण्याला मिळून त्याची वाफ होते व ती वाफहि आणखी खूप तापवली जाते. बॉयलर मधून बाहेर येणारी उच्च दाबाची व अति ऊष्ण वाफ Steam Turbine फिरवते व त्याला जोडलेले जनित्र फिरून वीज निर्माण होते. मग त्या वाफेचे पुढे काय होते? आणि त्या अजूनहि काहीशा गरम गॅसचे पण काय होते?
गॅसचे तपमान व दाब खूप खालीं आलेले असतात पण तरीहि त्यात पुष्कळ उष्णता बाकी असते. तो गॅस Economizer and Pre-heater नावाच्या यंत्रणेतून जातो व जास्तीत जास्त उष्णता काढून घेतली जाते. नंतर तो गॅस चिमणीमधून वर हवेत सोडून देतात मात्र त्यापूर्वी त्यातील राखेचे सूक्ष्म कण शक्य तेवढे वेगळे केले जातात. या यंत्रणेमध्ये दिवसेदिवस सुधारणा होत आहेत.
वाफेचे काय होते? ती पण थंड करून तिचे पाण्यात रूपांतर करून ते पाणी साचवून पुन्हा बॉयलरमध्ये पाठवले जाते. असे कां बुवा? हे पाणी सोडून कां देत नाहीत? परवडत नाही! बॉयलरमध्ये साधे पाणी वापरले तर थोड्याच दिवसात त्यातील विरघळलेले क्षार वा इतर संयुगे बॉयलरच्या ट्यूबांत साचून त्या फुटतात. त्यामुळे कोणत्याही बॉयलरमध्ये Demineralised Waterच वापरावे लागते. साध्या पाण्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करून ते मिळवावे लागते व अर्थातच खूप महाग असते त्यामुळे तेच पुन्हा पुन्हा वापरणे भाग पडते.
Turbine मधून बाहेर आलेल्या वाफेचे पाण्यात रूपांतर करण्यासाठी ’ट्यूब्जमधून वाफ व बाहेरून पाणी खेळवलेले’ अशी यंत्रणा असते. वाफ थंड होते व तिचे पाणी होते. पण बाहेरचे पाणी गरम होते! त्याचे काय करायचे?
जर हे खेळवलेले पाणी समुद्रातून उचललेले असले (उदा. डहाणू किंवा जैतापूर - होईल तेव्हा आणि झाले तर) तर ते सरळ समुद्रात सोडले जाते. समुद्राच्या पाण्यापेक्षा ते किंचितसेच गरम असते (५-६ डिग्री) आणि समुद्रात मिसळून थंड होते.
मात्र जेव्हा विद्युतनिर्मिति केंद्र समुद्राजवळ नसेल तेव्हां काय? तेथे मात्र नदी किंवा धरणातून पाणी उचलावे लागते. समुद्राचे पाणी समुद्रात सोडतात पण नदीचे पाणी मात्र नदीत न सोडता थंड करून पुन्हापुन्हा वापरले जाते. यासाठी Cooling Towers नावाची यंत्रणा वापरली जाते. या टॉवर्स मध्ये गरम पाणी उंचावर नेऊन खाली सोडले जाते ते खाली घरंगळत येताना हवेशी संबंध येऊन खाली पोंचेपर्यंत थंड होते व मग पुन्हा वाफेला थंड करण्याच्या कामाला जाते.
मात्र या प्रवासात कोठेकोठे थोडे पाणी वाफेच्या रूपाने उडून जाते. Power Stations मध्ये जे उंच Cooling Towers असतात त्यातून वर जाणारी ही वाफ दिसते (तो धूर नसतो!) अशा ’हरवलेल्या’ पाण्याची रोजच्या रोज थोडीथोडी भरपाई करावी लागते. Power साठी पाणी लागते ते हे आणि Power Station (सरकारी वा खासगी) हवे तर हे पाणीहि लागणारच त्याला इलाज नाही. गेल्य वर्षी पाणी संपल्यामुळे चंद्रपुर येथील जनित्रे बंद ठेवावी लागली होती हे आठवत असेल.
’जैतापुर’ नको पण जैतापुरसाठी गोडे पाणी लागणार नाही हेहि विचारात घेतले पाहिजे.
अर्थात काहीच नको असेल तर मग आनंदच आहे.

Wednesday, April 20, 2011

डॉक्टरानो खेड्याकडे चला!

गेल्या काही वर्षांपासून सरकारी मेडिकल कॉलेजांतून वैद्यकीय शिक्षण घेणार्याझ विद्यार्थ्यांकडून सरकार बॉंड घेते कीं त्यानी M. B. B. S. झाल्यावर दोन वर्षे ग्रामीण भागात सरकारी नोकरी केली पाहिजे. मात्र एक वर्षानंतर M. D. ला प्रवेश मिळाला तर उरलेले एक वर्ष M. D. झाल्यावर पुरे करायचे असते.
बॉंडच्या रकमा वाढत वाढत आतां कोटींच्या घरात गेल्या आहेत. मुख्य उद्देश ग्रामीण भागाला वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा हा आहे असें आपण समजतो. खरे तर नव्या कोरया M. B. B. S. चा ग्रामीण भागातील जनतेला कितपत फायदा मिळेल याबद्दल शंकाच आहे. कोणीच नसण्यापेक्षा बरे! ग्रामीण भागात नाईलाजाने वर्ष पुरे केलेल्या Doctors शी बोलून पहा म्हणजे यातील फोलपणा सहज कळून येईल. बरेचसे विद्यार्थी/विद्यार्थिनी अनेक खटपटी – लटपटी करून, खोट्या उपस्थिती लावून घेऊन, पैसे खर्च करून, सरकारी वेठबिगार पुरी केल्याचे पत्र मिळवतात हे उघडे गुपित आहे.
सध्या, सरकारी नोकरीची अट पूर्ण न केलेल्या ड़ॉक्टरांमागे सरकार दंड वसुलीसाठी लागले आहे असें बातमीत म्हटले होते. किती रुपये दंड वसूल केला हेही अभिमानाने छापले आहे!
खरा कळीचा मुद्दा हा आहे कीं M. B. B. S. आणि M. D. –M. S. चे रिझल्ट लागल्याबरोबर, त्यांतील ज्यांची सरकारी नोकरीची अट पुरी झालेली नसेल त्याना योग्य ते पद देऊन, लगेच ग्रामीण भागात नोकरीवर बोलावण्याची व्यवस्था सरकारने केली आहे काय? तशी नोकरी देऊ केली आणि ती नाकारली तरच सरकारला दंड मागण्याचा अधिकार पोचतो. प्रत्यक्षात तसे होत नाही अशी माझी माहिती आहे.
अखेर, दंड वसूल झाला म्हणजे ग्रामीण जनतेला उच्च वैद्यकीय सेवा मिळाली असें समजावयाचे?

Sunday, April 17, 2011

जैतापुरला विरोध

सध्या जैतापुरला विरोध चालू आहे. जपानमधल्या भूकंपामुळे त्याला जोर आला आहे. कोणाही जाणकाराने कितीहि समजावून सांगितले तरी फरक पडत नाही. भूकंपाचे निमित्त पुढे येण्यापूर्वीहि विरोध होता तो मुख्यत्वे विस्थापिताना पुरेसा मोबदला व पुनर्वसन या मुद्द्यांवर होत होता व तो योग्यहि होता. मात्र ’कोकण उजाड होईल, सर्व फळ उद्योग नष्ट होईल’ वगैरे भरमसाठ घोषणाही होत्याच.
एन्रॉन च्या वेळीहि अशाच घोषणा होत्या. डहाणू प्रकल्पालाहि याच कारणांवरून विरोध होता. अर्थात एका रात्रीत एन्रॉन चा विरोध नष्ट झालेला आठवत असेलच. तसाच जैतापुरचाहि होऊं शकेल!
एन्रॉन व डहाणू दोन्ही प्रकल्प कही वर्षे चालू आहेत. या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर व स्थानिक शेती, बागायती, फलोद्याने, मासेमारी यांचेवर काय परिणाम प्रत्यक्षात झाला आहे याची नि:पक्षपातीपणे पाहणी झाली आहे काय? कोण करणार? याउलट डहाणू प्रकल्पाला उत्तम व कार्यक्षम असल्याबद्दल अनेकवार अवॉर्ड मिळालेले वाचले आहेत. तरीहि डहाणूच्या प्रकल्पाची वाढ करण्याला परवानगी मिळत नाही. ती कोर्टदरबारी अडकली आहे. हे असेच चालणार का?

Thursday, April 14, 2011

सोनु

एक सोन्यासारखी मुलगी दुर्दैवाने पाय गमावून बसली आणि जीवितही अनिश्चित आहे. खेळ तर दूरच राहिला. आता तिला मदत कोणी करायची याबद्दल ’माया’ आणि ’ममता’ दोघीहि उदासीन आहेत असे दिसते.
कोण तिच्या मदतीला सरसावेल? क्रिकेटरांवर कोट्यावधि रुपये उधळणारी सरकारे वा कंपन्या? कीं BCCI कीं खुद्द कोट्याधीश झालेले क्रिकेटर?
कोणी (प्रामाणिक) आर्थिक मदत जमा करणार असेल तर मी मला शक्य ते जरूर करीन. तुम्हीहि करा. तुम्हाला कळले तर मला pkphadnis@yahoo.com वर कळवा

Wednesday, April 13, 2011

महिने - पौर्णिमान्त कीं अमान्त?

बहुतेकाना माहीत असते कीं महाराष्ट्रात व दक्षिण भारतात चांद्र महिना अमावास्येला संपतो. उत्तरेत मात्र महिना पौर्णिमेला संपतो व दुसरे दिवशी नवीन सुरू होतो. असें कां हे एक कोडे आहे. श्री. मोहन आपटे यांचे कालनिर्णय नावाचे पुस्तक हल्लीच वाचले त्यात काही (मला) नवीन माहिती मिळाली.
महिन्याची चैत्र-वैशाख ही नावे प्राचीन काळापासून भारतात वापरात आहेत. सूर्यचंद्रांच्या व ग्रहांच्या भ्रमणमार्गावर अनेक तारकापुंज आहेत. त्यांची निश्चित ओळख व चित्रा, विशाखा ही नावेहि प्राचीन कालापासून वापरात आली असली पाहिजेत. या नावांतील साधर्म्य स्पष्ट आहे. मग कोणत्या कारणामुळे चैत्र महिन्याला ’चैत्र’ हे नाव मिळाले आहे? त्याचा खुलासा श्री. आपट्यांच्या पुस्तकात मिळाला. चंद्र साधारणपणे दर दिवशी एका नक्षत्रातून पुढे सरकत जातो. पौर्णिमेचा चंद्र जर चित्रा नक्षत्रात दिसला तर तो महिना चैत्र असे हे प्राचीन साधेसुधे नामकरण आहे व ते प्रत्यक्ष दृक्प्रत्ययाने ठरणारे आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी संपणार्‍या महिन्याचे नाव ठरणे व दुसर्‍या दिवसापासून पुढचा महिना सुरू होणे हे जास्त सयुक्तिक वाटते.
शुक्ल प्रतिपदेपासून महिना सुरू करावयाचा तर ’गेल्या पौर्णिमेला चंद्र हस्त नक्षत्रात होता तेव्हा येणार्‍या पौर्णिमेला तो चित्रा नक्षत्रात असेल(च?) तेव्हा महिन्याचे नाव चैत्र’ असे अनुमानाने ठरवावे लागेल. मी मराठी त्यामुळे अमान्त महिने बाळपणापासून हाडींमासीं खिळलेले आणि उत्तरेत पौर्णिमान्त महिने असतात हे जेव्हां प्रथम कळले तेव्हां ’हा काय अडाणीपणा’ असे वाटले होते! पण तेच तर जास्त तार्किक नव्हे ना?

Saturday, April 9, 2011

पुन्हा अण्णा हजारे.

माझं चुकलंच! अण्णांना येवढा प्रतिसाद जनतेकडून मिळेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं! काहीतरी साध्य झालं याचा आपण सारे आनंद मानूंया. आता लोकपाल बिल बनेल, मग ते लोकसभेत मांडलं जाईल तिथे त्याला कोणाचा व किती विरोध होईल ते पहावयाचे. लोकसत्तेमध्ये अण्णांच्या विरोधात जरा कडक भाषेत लिहिलेला लेख वाचनात आला. लोकपालाला अनियंत्रित सत्ता दिली गेली तर तेहि योग्य होईल काय? प्रष्नाला सोपे उत्तर नाही. ज्याचेवर आरोप होईल वा लोकपालाकडून शिक्षा होईल त्याला न्यायसंस्थेकडे जाण्याचे स्वातंत्र्य नसेल तर तसा कायदा झाल्यास त्याला कोर्टात आव्हान दिले जाईल हे नक्की. प्रत्यक्ष बरावाईट कायदा होऊन त्याखाली गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचे कधी वाचावयास मिळेल काय?
तोंवर इतर काही बदल विचारात घेण्यासारखे आहेत. सरकारी अधिकार्‍यांना ब्रिटिश काळापासून संरक्षण देणार्‍या तरतुदी आहेत. त्या कमी करणे सहज शक्य आहे. अधिकार्‍य़ांविरुद्ध कारवाई करण्यासाठी परवानगी लागते ती वरिष्ठानी देण्याचा/नाकारण्याचा काळ कमी व निष्चित ठेवावा. परवानगी नाकारावयाची असल्यास त्याचे कारण नि:संदिग्धपणे नोंदवण्याची जबाबदारी मंत्र्यावर वा वरिष्ठावर ठेवावी. ते कारण अयोग्य वा अपुरे असल्यास त्याबद्दल त्या मंत्र्याला वा अधिकार्‍याला व्यक्तिश: जबाबदार धरले जावे. राज्याच्या सेवेत असताना अधिकार्‍याने केलेल्या कृतीबाबत कारवाई करण्यासाठी, तो अधिकारी नंतर केंद्रसरकारकडे गेला असला तरीहि, केंद्रसरकारची परवानगी लागूं नये (उदा. जयराज फाटक) असे अनेक बदल विचारात घ्यावयास पाहिजेत. त्याबद्दलहि दबाव निर्माण व्हायला हवा आहे.
सुरवात झाली आहे. कायकाय होते पाहूंया.

Wednesday, April 6, 2011

अण्णा हजारे

हा सज्जन माणूस आपली प्रतिष्ठा पणाला लावून दिल्लीत आमरण उपोषणाला बसला आहे. दिल्ली ही लबाड राजकारणी आणि चमचे यानी भरलेली आहे. तिथे या खर्‍या सज्जन माणसाचा निभाव लागणे कठीण वाटते. वृत्तपत्रे आणि वाहिन्या दोन दिवस त्यांचेमागे राहतील आणि नवीन विषय मिळाला कीं त्याना सोडून दुसरीकडे धावतील. करप्शन सर्वानाच हवे आहे. सत्ताधार्‍याना व सत्तेच्या मागे धावणाराना पैसा मिळवण्यासाठी, उद्योजकाना बरेवाईट व्यवसाय करण्यासाठी राजकारण्यांची मदत हवी म्हणून, सामान्य माणसालाही साध्यासाध्या सरळ कामासाठीहि ते लागतेच. चुटकीसरशी करप्शन बंद झाले तर सरकारी नोकर बरेवाईट सर्वच काम करणे बंद करतील!मला ’सिंहासन’ या गाजलेल्या सिनेमातील, सीमाप्रष्न सोडवण्यासाठी उपासाला बसलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची व त्याला चुटकीसरशी गुंडाळून ठेवणाऱ्या मुख्य मंत्र्याची आठवण येते.चार दिवसांनी अण्णाना इस्पितळात पाठवले जाईल व लोक त्याना विसरून जातील अशी मला भीती वाटते.

Monday, April 4, 2011

गुढीपाडवा

आज चैत्र शु. प्रतिपदा. नववर्षप्रारंभ. आज अनेक वृत्तपत्रातून विषेश लेख आलेले आहेत. गुढ्या उभारण्याच्या प्रथेमागील कारणाचा उलगडा करताना बहुतेक ठिकाणी ’रामाने या दिवशी रावण्वध केल्यानंतर सीतेसह अयोध्येत प्रवेश केला आणि त्याच्या स्वागतार्थ नागरिकानी गुढ्या तोरणे उभारली’ असा उल्लेख केलेला दिसला. आपले काही गोड गैरसमज असतात त्यातलाच हाहि एक आहे.
विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेल्या रामायणाच्या भाषांतराचे खंड माझे संग्रही आहेत. त्यात दुसर्‍या व तिसर्‍या खंडांचे अखेरीस असलेल्या टीपांमध्ये काही प्रमुख घटनांच्या तिथि-मास दिलेल्या आहेत. खुद्द रामायणाच्या मजकुरात तसे उल्लेख मला आढळलेले नाहीत पण ज्याअर्थी हे उल्लेख केलेले आहेत त्या अर्थी त्याना काही ना काही आधार असला पाहिजे.
रामाबरोबरच्या युद्धासाठी रावण खूप उशीरा स्वत: आला. माघ आणि फाल्गुन दोन महिने युद्ध चालून अनेक वीरांचा वध झाला. फाल्गुन वद्य १३ ला इंद्रजिताचा वध झाला. चैत्र शुद्ध ८ ला महापार्श्वाचा वध होऊन दुसर्‍या दिवशी प्रथमच खुद्द रावण युद्धाला आला. चैत्र शुद्ध नवमीला रावणाची शक्ति लागून लक्ष्मण जबर जखमी झाला. मात्र त्यानंतर रामापुढे टिकाव धरतां न आल्यामुळे दिवस अखेर रावण पळून गेला. रात्री हनुमानाने दुर्मिळ वनस्पति आणून लक्ष्मणाला शुद्ध आणली. दुसर्‍या दिवशी म्हणजे दशमीला दिवसभर राम-रावण युद्ध चालून रात्रीहि चालू राहिले (युद्धकांड सर्ग १०७ -५८/६७) व दुसरे दिवशी मात्र रामाने रावणवध केला असा घटनाक्रम खुद्द रामायणात वर्णिलेला आहे. मग चैत्र शु.१ ला राम अयोध्येत पोचला असेलच कसा? पण घट्ट धरून बसलेल्या कल्पना सोडून देण्यास कोण तयार होणार. विजयादशमीला रावण-कुंभकर्ण-इंद्रजित यांचे पुतळे कां जाळतात याचेहि मला कोडेच आहे.
शालिवाहन शक कालगणना शालिवाहनाने शक राजाचा पराभव केला तेव्हांपासून सुरू झाली हीपण अशीच एक चुकीची कल्पना आहे. शक राजा नहपान याचे राज्य महाराष्ट्रात होते. त्या नहपानाने नवीन कालगणना सुरू केली म्हणून त्याला ’शकनृपकाळ’ असे म्हटले जाते. हा उल्लेख डॉ. भांडारकरांच्या पुस्तकात मी वाचलेला आहे. शालिवाहन हा महाराष्ट्रातील नाही. त्याला आंध्रभृत्य असे म्हणतात. मात्र त्याने नहपानाचा पराभव केला व शकांची सत्ता उखडून टाकली हे खरे. शकनृपकाल हे नाव बदलत, शककाल व पुढे शालिवाहन शक असे झाले तरीही अजून आपण शकाचे स्मरण ठेवले आहे! मग शिवाजीमहाराजांनी नवीन कालगणना सुरू केली तिलाहि ’राज्याभिषेक शक’ असेच नाव पडले. व खुद्द शिवाजीमहाराजांना आपण शककर्ता म्हणतों. पण शालिवाहन याने ’शक’ कालगणना सुरू केली हा समज कायमच आहे!