Thursday, March 15, 2012

त्सुनामी आणि एल्मोअर - दोन वेगळ्याच हकिगती

त्सुनामी
जपानमध्ये प्रचंड त्सुनामीची लाट येऊन अफाट नुकसान झाले त्या घटनेला एक वर्ष झाले. त्सुनामीच्या लाटांनी परत फिरताना असंख्य लहानमोठ्या वस्तू समुद्रात ओढून नेल्या. अशा वाहून गेलेल्या मालमत्तेचे वजन दोन लाख टन असल्याचा अंदाज आहे! यामध्ये घरगुती सामानाबरोबरच गाड्या घरे, बोटी अशा अनेक जड वस्तूंचाहि अंतर्भाव आहे. यातला किती भाग समुद्रात बुडून गेला, किती अजून पाण्यावर फिरतो आहे हे कोणी सांगू शकत नाही पण एक गोष्ट नक्की मान्य आहे की यातील कित्येक वस्तू आता अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर येऊन पोचत आहेत! येथून पुढे दीर्घकाळ लहानमोठ्या वस्तू किनार्‍यावर येत राहातील असा तज्ञांचा अंदाज आहे. यामध्ये प्लास्टिक वस्तूंचे प्रमाण बरेच राहील. प्लास्टिक Buoys अनेक मिळताहेत व त्यांवर त्सुनामीत नाश पावलेल्या जपानी ऑइस्टर कंपन्यांचे नाव असते. येऊ लागलेल्या इतर डेब्रिस वरहि अनेक वेळा जपानी अक्षरात लिहिलेला मजकूर असतो. National Oceanic and Atmospheric Administration ही संस्था या डेब्रिस वर लक्ष ठेवून आहे व पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जात आहे. किनार्‍यावर अशा काही वस्तू मिळाल्या तर त्याची माहिती लोकानी या संस्थेला कळवावी असे तिचे आवाहन आहे व त्याला प्रतिसादहि मिळत आहे. शेकडो ई-मेल संस्थेकडे येताहेत. मात्र चिनी, जपानी किंवा कोरियन भाषेतील अक्षरे असलेल्या अनेक लहानमोठ्या वस्तू यापूर्वीहि अशाच किनार्‍यांवर मिळत असत त्यामुळे आता मिळणार्‍या वस्तू या त्सुनामीने नेलेल्याच किंवा कसे याबद्दल एकवाक्यता नाही!
निर्दोष असणे पुरेसे नाही.
एड्वर्ड ली एल्मोअर जानेवारीत ५३ वर्षांचा झाला. या आफ्रिकन अमेरिकन माणसाचे निम्म्याहून अधिक आयुष्य न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यात गेले. ११,००० दिवस तुरुंगात राहून हल्लीच तो बाहेर पडला. तो अगदी निर्बुद्ध आहे. साउथ कॅरोलिनातील तुरुंगात तो दीर्घकाळ फाशीच्या कोठडीत अडकलेला होता. जो काही पुरावा रेकॉर्डवर आहे त्यावरून तो निर्दोष असण्याचीच जास्त शक्यता आहे. त्याच्या बाजूने ठरेल अशा चौकशीत पुढे आलेल्या गोष्टी लपवण्यात आल्या. गरिबीमुळे त्याला बर्‍यापैकी वकील मिळाला नव्हता. एका वृद्ध गोर्‍या स्त्रीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. सहा दिवसात त्याच्या खटल्याचे कामकाज संपले. त्या बाईच्या घरी तो कधीकधी खिडक्या धुण्या-पुसण्याचे काम करी. एवढाच त्याचा तिच्याशी संबंध आला होता. खुनापूर्वी १५ दिवस त्याने असे काम केले होते. खून झाल्यानंतर केलेया तपासात त्या स्त्रीच्या बिछान्यावर काही केस सापडले होते ते एल्मोरच्या शरीराच्या 'विशिष्ट भागा'वरचे असण्याची शक्यता सिद्ध होत होती एवढा एकुलता एक पुरावा त्याच्या विरुद्ध होता.(बिछान्यावरून जमा केलेल्या केसात एल्मोअरचे केस तपासाचे वेळी उपटून काढून मिसळले गेले असणेहि शक्य होते.)जमा केल्या केसात एक केस न जुळणारा पण होता मात्र ही गोष्ट लपवली गेली! (पुढे दीर्घ काळानंतर तो केस 'गोर्‍या' व्यक्तीचा असल्याचे दिसून आले आणि तो खर्‍या खुन्याचा असण्याची शक्यता नाकारता आली नाही). त्या काळात DNA टेस्ट नव्हती. पोलिस आणि सरकारी वकिलानी खटला एवढ्याच पुराव्यावर रेटून नेला. एल्मोरला फाशीची शिक्षा झाली. अनेक वर्षे अनेक प्रकारानी केलेल्या अपिलांचा उपयोग होत नव्हता. पण अखेर त्याच्या बाजूने लढणार्‍या कार्यकर्त्या वकिलाना यश आले. अखेरच्या अपिलातहि त्याला कोर्टाने निर्दोष ठरवले नाहीच. मात्र त्याने ( न केलेला) गुन्हा कबूल केल्याच्या बदल्यात सरकारपक्षाच्या संमतीने त्याला माफी देऊन तुरुंगातून सोडले. अमेरिकेत असेहि प्रकार घडत असतात.

No comments:

Post a Comment