Tuesday, March 20, 2012

शैक्षणिक कर्ज आणि पावसाचे पाणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज.
अमेरिकेतल्या जीवनपद्धतीत आणि शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यानी शिक्षणासाठी कर्ज काढणे हे सर्वमान्य आहे. सरकारी शैक्षणिक कर्जावर व्याजदर माफक असतो आणि शिक्षण पुरे होऊन नोकरी-व्यवसायाला लागल्यावर साधारणपणे २-३ वर्षात विद्यार्थी कर्जमुक्त होतात. अर्थात ज्यांच्या पालकांकडे भरपूर पैसा असेल त्यांची गोष्ट वेगळी. फेडरल कंझ्यूमर फिनान्शियल प्रोटेक्शन ब्यूरो अशी एक सरकारी संस्था आहे. विद्यार्थ्याना कर्जफेडीबाबत वा कर्ज देणार्‍या धनको कडून वसुली तगादा याबद्दल काही गैरवाजवी त्रास होऊ नये याबद्दल ही संस्था मदत करते. शाळा-कॉलेजे व कर्ज देणार्‍या बॅंका विद्यार्थ्याना सरकारी कमी व्याजदराच्या योजनांबाबत अंधारात ठेवून भरमसाठ जास्त दराने कर्ज घेण्यास प्रवृत्त करतात असे आढळून आले आहे. विद्यार्थी असे चुकीने गृहीत धरतात कीं खाजगी व सरकारी कर्जाच्या अटी सारख्याच असतील. प्रत्यक्षात सरकारी शिक्षणकर्जाचे व्याजदर ६.८ % पेक्षा कमी असतात. खाजगी कर्जाचा व्याजदर १५% वा त्याहूनहि जास्त असल्याचे दिसून येते. सरकारी कर्ज शिक्षण संपल्यावर परत फेडताना काही अडचणी आल्यास, उदा. नोकरी जाणे, सवलतीचे धोरण असते. त्यामुळे काही काळ हप्ता थांबवणे वा कमी करून मिळणे शक्य असते. खाजगी कर्जाची वसुली पठाणी धोरणाने होते. अर्थात सरकारी कर्ज किती मिळेल याच्यावर मर्यादा असतेच. विद्यार्थ्याला सरकारी लोन मिळणे शक्य आहे कीं नाही हे कळणे आवश्यक आहे त्यामुळे वर उल्लेखिलेल्या ब्यूरोने असे नियम केले आहेत कीं खाजगी कर्जे देणारे वा शैक्षणिक संस्था यानी याबद्दल विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. अशा काही योजना व नियम भारतातहि हवेत.
विश्वास ठेवा!
हल्लीच एक बातमी वाचली आणि विश्वासच बसेना! पण न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहिले आहे तेव्हा खरेच असणार. न्यूयॉर्क हे जुने शहर आहे येथे Sewerage System आहे पण पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारेच नाहीत म्हणे! पावसाचे पाणी Sewerage मध्येच जाते! नवल वाटले ना? मुंबईमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारे फार पूर्वीपासून आहेत. पूर्वी शहरात तीं बंद व उपनगरात उघडी असत. त्यामुले उपनगरात डांस असत! आता बहुतेक उपनगरातहि तीं बंद केली गेली आहेत. फार मोठा पाऊस जास्त काळ पडला तर त्यांची क्षमता कमी पडते व मग पावसाचे पाणी तुंबते, पूर येतो हे सर्व वेळोवेळी आपण अनुभवलेले आहे. त्यावर उपाय म्हणून कोट्यावधि रुपये खर्चून पावसाचे पाणी पंपांनी खेचून समुद्रात फेकण्याच्या योजना (Brimstowad Project) अमलात आल्या आहेत.
पण न्यूयॉर्कची व्यथा वेगळीच आहे! पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइनच नाहीत. ते पाणी Sewerage च्या सिस्टिम मध्येच जाते! त्यामुळे जोराचा पाऊस झाला कीं Sewage बरोबर पावसाचे पाणी येऊन जेथे Treated Sewage नेहेमी सोडला जातो तेथेच सर्व प्रवाह बाहेर पडतो अर्थातच सर्वावर Treatment ची प्रक्रिया पुरी झालेली नसते. त्यामुळे त्या नद्या-नाल्यांमध्ये Polution होते. स्वतंत्र पाऊस-गटारे शहरभर यापुढे बांधणे अति खर्चाचे असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाणे कसे कमी करता येईल यासाठीच काही योजना अमलात येत आहेत. गच्च्यांवर बागा करणे, पार्किंग लॉट्समध्ये पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारचे Paving करणे, रस्त्यांच्या कडेला हिरवळ लावणे असे या योजनांचे स्वरूप आहे. अर्थात अशा 'फाटलेल्या आकाशाला ठिगळ लावणे' पद्धतीच्या योजनांमुळे प्रश्न कितपत सुटेल याची शंकाच आहे.

No comments:

Post a Comment