Tuesday, March 27, 2012

त्सुनामी आणि सायकल-सहकार्य


यापूर्वीच्या एका लेखात लिहिले होते कीं त्सुनामीमुळे जपानमधून अनन्वित प्रमाणावर कचरा, अजमासे ८० लाख टन, – त्यात घरे, गाड्या, बोटी अशा मोठ्या वस्तूंचाहि समावेश आहे – समुद्रात ओढला गेला. वर्षानंतर आता त्यातील अनेक वस्तू हळूहळू अमेरिकेच्या किनार्‍यावर येऊन थडकूं लागल्या आहेत.
त्यातलाच एक प्रकार म्हणजे १५० फूट लांबीचे एक मासेमारीचे (होकॅडो स्क्विड फिशिंग कंपनीचे) जहाज कॅनडाच्या किनार्‍याजवळ आढळले आहे. त्यावर कोणीहि नव्हते त्यामुळे कोणी मरण्याचा प्रश्न नव्हता. सुदैवाने हे जहाज सागरातील नेहेमीच्या ये-जा करण्याच्या वाटेवर नसल्यामुळे त्याच्यापासून इतर जहाजाना धोका नाही तसेच त्यावर तेल वा इतर अनिष्ट वस्तू नसल्यामुळे पर्यावरणालाहि धोका नाही. त्यामुळे जहाज तोडण्याचा वा बुडवण्याचा सध्यातरी बेत नाही.
सायकल सहकार्य
न्यूयॉर्क शहरामध्ये मुंबईप्रमाणेच वाहतुकीचा प्रश्न ज्वलंत आहे. या उन्हाळ्यामध्ये त्यावर इलाज म्हणून सायकल सहकार्याचा एक अफलातून कार्यक्रम सुरू व्हावयाचा आहे. या कार्यक्रमा-अंतर्गत शहरामध्ये ६०० ठिकाणी सायकल भाड्याने मिळेल व त्यापैकी कोणत्याही ठिकाणी ती परत करता येईल. एकूण १०,००० सायकली यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्या अशा ठिकाणावरून सायकल घ्यावी व कामाच्या ठिकाणाजवळ वा रेल्वे स्टेशनजवळ ती परत करावी. घरी परततानाहि असेच करावे, म्हणजे सायकल विकत घ्यायला नको, ठेवावी कुठे, सुरक्षित कशी राहणार हे प्रश्न नाहीत. यामुळे ही योजना लोकप्रिय होईल अशी योजना सुरू करणार्‍या खात्याची अपेक्षा आहे. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये गेली दोन वर्षे अशी योजना, अर्थात लहान प्रमाणावर, (तीस सायकली आणि १० स्टेशने), चालवली जात आहे आणि तिला विद्यार्थी, प्रोफेसर व इतर यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी आणखी ४५ सायकली वाढवल्या जाणार आहेत. सायकली चोरीला जाण्याचे वा अपघाताचे प्रकार आढळले नाहीत त्यामुळे शहरात सुरू होणार्‍या मोठ्या कार्यक्रमालाहि यश येईल अशी आशा आहे.
मुम्बई शहरात असे काही कां होत नाही?

No comments:

Post a Comment