Monday, April 4, 2011

गुढीपाडवा

आज चैत्र शु. प्रतिपदा. नववर्षप्रारंभ. आज अनेक वृत्तपत्रातून विषेश लेख आलेले आहेत. गुढ्या उभारण्याच्या प्रथेमागील कारणाचा उलगडा करताना बहुतेक ठिकाणी ’रामाने या दिवशी रावण्वध केल्यानंतर सीतेसह अयोध्येत प्रवेश केला आणि त्याच्या स्वागतार्थ नागरिकानी गुढ्या तोरणे उभारली’ असा उल्लेख केलेला दिसला. आपले काही गोड गैरसमज असतात त्यातलाच हाहि एक आहे.
विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेल्या रामायणाच्या भाषांतराचे खंड माझे संग्रही आहेत. त्यात दुसर्‍या व तिसर्‍या खंडांचे अखेरीस असलेल्या टीपांमध्ये काही प्रमुख घटनांच्या तिथि-मास दिलेल्या आहेत. खुद्द रामायणाच्या मजकुरात तसे उल्लेख मला आढळलेले नाहीत पण ज्याअर्थी हे उल्लेख केलेले आहेत त्या अर्थी त्याना काही ना काही आधार असला पाहिजे.
रामाबरोबरच्या युद्धासाठी रावण खूप उशीरा स्वत: आला. माघ आणि फाल्गुन दोन महिने युद्ध चालून अनेक वीरांचा वध झाला. फाल्गुन वद्य १३ ला इंद्रजिताचा वध झाला. चैत्र शुद्ध ८ ला महापार्श्वाचा वध होऊन दुसर्‍या दिवशी प्रथमच खुद्द रावण युद्धाला आला. चैत्र शुद्ध नवमीला रावणाची शक्ति लागून लक्ष्मण जबर जखमी झाला. मात्र त्यानंतर रामापुढे टिकाव धरतां न आल्यामुळे दिवस अखेर रावण पळून गेला. रात्री हनुमानाने दुर्मिळ वनस्पति आणून लक्ष्मणाला शुद्ध आणली. दुसर्‍या दिवशी म्हणजे दशमीला दिवसभर राम-रावण युद्ध चालून रात्रीहि चालू राहिले (युद्धकांड सर्ग १०७ -५८/६७) व दुसरे दिवशी मात्र रामाने रावणवध केला असा घटनाक्रम खुद्द रामायणात वर्णिलेला आहे. मग चैत्र शु.१ ला राम अयोध्येत पोचला असेलच कसा? पण घट्ट धरून बसलेल्या कल्पना सोडून देण्यास कोण तयार होणार. विजयादशमीला रावण-कुंभकर्ण-इंद्रजित यांचे पुतळे कां जाळतात याचेहि मला कोडेच आहे.
शालिवाहन शक कालगणना शालिवाहनाने शक राजाचा पराभव केला तेव्हांपासून सुरू झाली हीपण अशीच एक चुकीची कल्पना आहे. शक राजा नहपान याचे राज्य महाराष्ट्रात होते. त्या नहपानाने नवीन कालगणना सुरू केली म्हणून त्याला ’शकनृपकाळ’ असे म्हटले जाते. हा उल्लेख डॉ. भांडारकरांच्या पुस्तकात मी वाचलेला आहे. शालिवाहन हा महाराष्ट्रातील नाही. त्याला आंध्रभृत्य असे म्हणतात. मात्र त्याने नहपानाचा पराभव केला व शकांची सत्ता उखडून टाकली हे खरे. शकनृपकाल हे नाव बदलत, शककाल व पुढे शालिवाहन शक असे झाले तरीही अजून आपण शकाचे स्मरण ठेवले आहे! मग शिवाजीमहाराजांनी नवीन कालगणना सुरू केली तिलाहि ’राज्याभिषेक शक’ असेच नाव पडले. व खुद्द शिवाजीमहाराजांना आपण शककर्ता म्हणतों. पण शालिवाहन याने ’शक’ कालगणना सुरू केली हा समज कायमच आहे!

6 comments:

  1. matra ravanacha vadha kely nanatr,tyanna pushpak viman bhet milate(nav lakshat nahi shamaswa)tya vimanane te ayodhyala parat yetat.thats why gudi tya divashich ubharatat.

    ReplyDelete
  2. विमानकल्पनेवर ज्याना विश्वास ठेवावयाचा असेल त्यानी खुशाल ठेवावा. माझ्या मते राम रावणाचा वेगवान रथ घेऊन अयोध्येला पावसाळा सुरू होण्यापूर्वी (जेमतेम) पोचला असावा. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेला तो लंकेत युद्ध करीत होता हे नक्की.

    ReplyDelete
  3. सर्व रामायण ऐकल्यावरहि ’रानाची सीता कोण?’ असा प्रश्न काहीना पडतो! राम चैत्र शु. प्रतिपदेला लंकेत असताना रावणवधानंतर जरी तो पुष्पकविमानाने गेला असे मानले तरी चैत्र शु. प्रतिपदेला तो अयोध्येला कसा पोचणार? पुष्पक विमान हे काय ’टाइम मशीन’ होते का?

    ReplyDelete
  4. काका, तुमच्या या पोस्ट चा उल्लेख "प्रहार" च्या ब्लोगार्क सदरात १७ एप्रिल रोजी, अगदी अखेरच्या परिच्छेदात केला गेला आहे.

    ReplyDelete
  5. Well , We can assume that Ram kills Ravan on dasara. So we can say that , to reach ayodhya he took 4-5 months, considering he didn't uses the Pushpak !!! ( This sounds logical.)
    After all, there must be some information in old documents which have different dates than mention here !!!
    well , Its debatable issue like SriLanka is
    Lanka of Ramayan or not... Or Ramayana is myth or true story ? :)

    ReplyDelete
  6. गृहीतच धरावयाचे तर काहीहि चालेल पण खुद्द रामायणातील उल्लेख बाजूला ठेवणे चूकच म्हटले पाहिजे.

    ReplyDelete