Wednesday, April 13, 2011

महिने - पौर्णिमान्त कीं अमान्त?

बहुतेकाना माहीत असते कीं महाराष्ट्रात व दक्षिण भारतात चांद्र महिना अमावास्येला संपतो. उत्तरेत मात्र महिना पौर्णिमेला संपतो व दुसरे दिवशी नवीन सुरू होतो. असें कां हे एक कोडे आहे. श्री. मोहन आपटे यांचे कालनिर्णय नावाचे पुस्तक हल्लीच वाचले त्यात काही (मला) नवीन माहिती मिळाली.
महिन्याची चैत्र-वैशाख ही नावे प्राचीन काळापासून भारतात वापरात आहेत. सूर्यचंद्रांच्या व ग्रहांच्या भ्रमणमार्गावर अनेक तारकापुंज आहेत. त्यांची निश्चित ओळख व चित्रा, विशाखा ही नावेहि प्राचीन कालापासून वापरात आली असली पाहिजेत. या नावांतील साधर्म्य स्पष्ट आहे. मग कोणत्या कारणामुळे चैत्र महिन्याला ’चैत्र’ हे नाव मिळाले आहे? त्याचा खुलासा श्री. आपट्यांच्या पुस्तकात मिळाला. चंद्र साधारणपणे दर दिवशी एका नक्षत्रातून पुढे सरकत जातो. पौर्णिमेचा चंद्र जर चित्रा नक्षत्रात दिसला तर तो महिना चैत्र असे हे प्राचीन साधेसुधे नामकरण आहे व ते प्रत्यक्ष दृक्प्रत्ययाने ठरणारे आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी संपणार्‍या महिन्याचे नाव ठरणे व दुसर्‍या दिवसापासून पुढचा महिना सुरू होणे हे जास्त सयुक्तिक वाटते.
शुक्ल प्रतिपदेपासून महिना सुरू करावयाचा तर ’गेल्या पौर्णिमेला चंद्र हस्त नक्षत्रात होता तेव्हा येणार्‍या पौर्णिमेला तो चित्रा नक्षत्रात असेल(च?) तेव्हा महिन्याचे नाव चैत्र’ असे अनुमानाने ठरवावे लागेल. मी मराठी त्यामुळे अमान्त महिने बाळपणापासून हाडींमासीं खिळलेले आणि उत्तरेत पौर्णिमान्त महिने असतात हे जेव्हां प्रथम कळले तेव्हां ’हा काय अडाणीपणा’ असे वाटले होते! पण तेच तर जास्त तार्किक नव्हे ना?

2 comments:

  1. नवीनच माहिती दिली तुम्ही काका, पण रात्री नंतर दिवस उगवला तर त्या दिवसाचे महत्व चांगले वाटते. चांगले फ्रेश वाटते. त्याप्रमाणे अमावास्याच्या अंधार नंतर आलेली सकाळ जास्त चांगली वाटेल त्यामुळे कदाचित अमान्त महिन्याचा शेवट करण्यासाठी चांगले वाटते.

    मागे तुम्ही महाभारताच्या एका ब्लॉग मध्ये विश्वामित्राने नवीन सृष्टी किंवा प्रतीश्रुष्टी निर्माण कशी केली त्याचे स्पष्टीकरण दिले होते. कदाचित त्यावेळे पासूनच महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अमांत चालू झाले असेल. उत्तर भारतात देवांचे वर्चस्व असल्याने त्यांनी पौर्णिमान्त धरला असेल विश्वामित्रांनी आमंत धरला असेल.
    तुम्हाला काय वाटते?

    ReplyDelete