Saturday, March 12, 2011

आत्महत्या

श्रीमती गुप्ता यांनी दोन चिमुकल्या मुलांसह केलेल्या आत्महत्येची बातमी वाचून मन विषण्ण झाले. त्याबरोबर रागहि उफाळून आला. त्यांच्या घरच्यांबद्दल व तिच्याबद्दलहि.
भारतात इंग्रजांचे राज्य नांदून लयालाहि गेले. त्यानी लावलेल्या आधुनिक शिक्षणाच्या रोपाची अफाट वाढ झाली. महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाचा पाया महात्मा फुलेनी रोविला. महर्षि कर्वे यांनी या कार्याला आयुष्य वाहून घेतले. पश्चिम भारतात स्त्रीशिक्षणाचा प्रसार जोरात झाला. इतरत्रहि आता कमीजास्त तशीच परिस्थिति आहे. स्त्रिया शिकून अनेक क्षेत्रात अत्युच्च पदापर्यंत सर्रास प्रगति करीत आहेत.
श्रीमती गुप्ता चार्टर्ड अकाउंटंट होत्या असे वाचले. इतक्या उच्च शिक्षणानंतरहि सासरच्या माणसांच्या मागण्यांना वा शारीरिक/मानसिक छळाला तोंड देता येत नसेल व मुलांसह आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत असेल तर स्त्री शिक्षणाने स्त्रीचा काय फायदा? अशा परिस्थितीत माहेरच्या माणसांचाहि आधार मिळत नसेल तर समाजाची अगतिकता बदलणार तरी कधीं? अशाच स्वरूपाच्या बातम्या भारताच्या इतर भागातूनहि येत असतात, अगदी परदेशात गेलेल्या कुटुंबांतूनहि! मग शिक्षणाने स्त्रीचे सबलीकरण होत नाही असे म्हणावयाचे काय?

5 comments:

 1. एका बाईच्या छळाची आणि आत्महत्येची बातमी आधार धरून तुम्ही शिक्षणापासून फायदा झालेल्या लाखो स्त्रिया डोळ्यांआड करून 'शिक्षणाने स्त्रीचे सबलीकरण होत नाही काय?' असा सवाल कसा करू शकता?

  थोडेफार अपवाद राहिले तर ती फार आश्चर्याची गोष्ट ठरू नये. या बातमीचं एखाद्‌याला दु:ख वाटू शकेल, पण त्यापासून ढोबळ निष्कर्ष काढता येणार नाहीत.

  ReplyDelete
 2. आत्महत्येचे कारण स्वभिमानाच्या खोट्या कल्पना हे आहे. शिक्षणाने यांत बदल घडू शकतो पण संबंधित व्यक्तीने त्यासाठी प्रयत्न केले तरच.

  ReplyDelete
 3. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर स्त्रियांची प्रगति झाली आहे याबाबत वादच नाही. बातमीतील व्यक्ति उच्चबिद्याविभूषित असूनहि तिच्यावर मुलांसह आत्महत्या करण्याची पाळी कां यावी याचाच मला उद्वेग वाटतो. अर्थात स्त्रियांनी शिकूंच नये असे मलामुळीच सुचवावयाचे नाही!
  ’स्वाभिमानाच्या खोट्या कल्पना’ हे आत्महत्येचे कारण खासच नाही.

  ReplyDelete
 4. >>तक्या उच्च शिक्षणानंतरहि सासरच्या माणसांच्या मागण्यांना वा शारीरिक/मानसिक छळाला तोंड देता येत नसेल व मुलांसह आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत असेल तर स्त्री शिक्षणाने स्त्रीचा काय फायदा?>>

  काका, तुमच्या या वाक्यावर मला आक्षेप आहे. शारीरिक/मानसिक छळाला तोंड देणं हे सर्वस्वी प्रत्येकावर ओढवलेल्या परिस्थितीवर अवलंबून असतं. जर तिच्या मुलांनाच इजा करण्याचं भय दाखवून तिचा छळ केला जात असेल, तर ती स्त्री कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी तोंड द्यायला कमीच पडणार. हा मी फक्त अंदाज बांधला. समाज स्त्री-पुरूष अशा दोन जातीच्या माणसांनी बनतो. ज्यात गुन्हेगार व पोलिस असे दोन प्रकारदेखील असतात. "डोमेस्टीक कम्प्लेन्ट्स" म्हणजेच घरगुती तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याची पोलिसांची जुनी सवय आहे.

  त्या स्त्रीच्या बाबतीत काय घडलं हे फक्त तीच सांगू शकली असती. दुर्दैवाने ती आता नाही. पण स्वत:सोबतच स्वत:च्या मुलांचे आयुष्य संपविण्याचा कठोर निर्णय घेण्याची वेळ तिच्यावर आली याचाच अर्थ मदतीचे सर्व दरवाजे तिच्यासाठी बंद झाले असावेत, असं मला वाटतं. एका स्त्रीने उच्चविद्याविभूषित असल्याने फरक पडतो असं मला वाटत नाही. तिच्या अवतीभोवतीचं जे जग असतं तेही सुशिक्षितत आणि सुसंस्कृतही असायला हवं. अन्यायाला वाचा फोडणार्‍यासोबतच त्याची कैफीयत ऐकून घेणार्‍यालाही त्या घटनेचं गांभिर्य समजायला हवं असं मला वाटतं.

  ReplyDelete
 5. उच्च शिक्षणामुळे स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता मिळवलेल्या स्त्रीला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता याचेच मला नवल वाटते. आता ही चर्चा संपवलेली बरी. एका दुर्दैवी स्त्रीच्या आत्महत्येबद्दल आणखी काही बोलणे उचित नव्हे.

  ReplyDelete