Tuesday, March 22, 2011

पुन्हा क्रिकेट

वर्ल्डकपच्या मॅचेस पाहताना मला आणखी एक गोष्ट ’खुपली’. (गुप्ते इकडे लक्ष देतील काय?)
बोलरच्या हातातून बॉल सुटेपर्यंत, नियमाप्रमाणे, नॉन-स्ट्राइकरने क्रीझ सोडून पुढे जायचे नसते. मात्र टी.व्ही. पाहताना दिसते कीं सर्व देशांचे बॅट्समन सर्रास नियम पायदळी तुडवून आधीच एक-दोन पावले पुढे निघतात. अंपायर किंवा फील्डिंग साइडचा कॅप्टनही त्याची फारशी दखल घेत नाही. हा गैरप्रकार सर्रास चालवून घेतला जातो. शेवटच्या काही षटकांत उरलेल्या धावा काढण्याच्या दडपणाखाली क्वचित असा प्रकार होताना दिसला असता तर तो फारसा वावगा वाटला नसता. मात्र खेळाच्य कोणत्याही अवस्थेत असे घडताना दिसते.
काही वर्षांपूर्वी, जेव्हां भारताने दक्षिण आफ्रिकेवरचा बहिष्कार उठवून तेथे खेळण्यासाठी गेले होते तेव्हां असा प्रकार झाला होता. मग कप्तान कपिलदेव याने अंपायरच्या ही गोष्ट ध्यानी आणून दिली होती व गुन्हेगार फलंदाजालाहि (नाव लक्षात नाही, बहुधा पीटर कर्स्टन असावा) ताकीद देवविली होती. मात्र तरीहि त्या फलदाजाने सुधारणा न केल्यामुळे, कपिलदेवने त्याची गोलंदाजी असताना स्टंपजवळ पोचल्यावेळी फलंदाज क्रीझबाहेर गेलेला दिसल्यावर बॉल न टाकतां सरळ स्टंपांवर आपटून अपील केले व अंपायरला आउट देणे भाग पडले. काही अतिशिष्ट लोकांनी कपिलदेववर अ-खिलाडीपणाची टीका केली. पण तो प्रकार मग बंद झाला. पाकिस्तानचा कॅप्टन वासिम अक्रम याला कुणीतरी त्याचे मत विचारले तेव्हां त्याने दिलेले मत सरळ होते. त्याने म्हटले कीं साउथ आफ्रिकेच्या अनुभवी फलंदाजाला नियम माहीत असणारच, तरीहि कपिलदेवने त्याला ताकीद देववली होती. त्यानंतर त्याने चेंडू स्टंपला लावून अपील केले व अंपायरने निर्णय दिला. त्याबाबत आणखी काही बोलण्याची गरजच काय?
आतां फलंदाज आणि अंपायर दोघेही नियम विसरले असले तर कपिलदेवला पुन्हा मैदानात उतरवले पाहिजे!

2 comments:

  1. काका, कर्टनी वॉल्श ने पण असे एकदा केले होते. त्याने दोनदा ताकीद दिली होती पण आउट नाही केले त्यामुळे त्याचे कौतुक झाले पण वेस्ट इंडीज तो सामना हरली आणि वर्ल्ड कप मधून बाहेर पडली.

    ReplyDelete
  2. बरोबर आहे. ’मी माझ्या विकेट्स बोलिंग करून मिळवतो’ असेहि वॉल्शने म्हटले होते! पण ’शठाशीं व्हावे शठ, उद्धटाशी उद्धट’ हेच माझ्या मते बरोबर.

    ReplyDelete