Saturday, March 19, 2011

क्रिकेट

क्रिकेट
सध्या सर्वत्र क्रिकेट फीव्हर आहे. क्रिकेट हा खेळ इतका जीर्णमतवादी लोकांचा खेळ आहे कीं बोलायची सोय नाही. क्रिकेटमध्ये काहीहि नवीन नियम वा बदल हा लवकर होत नाही. एकमत मुळीच होत नाही. नवीन टेक्नॉलॉजी सहज स्वीकारली जात नाही.
खेळ पाहताना नेहेमी दिसणारे एक दृष्य म्हणजे नवा फलंदाज क्रीझवर आला कीं तो स्टंपांपुढे बॅट उभी धरून अंपायर कडे पाहतो. मग अंपायर कमीजास्त खुणा करून त्याला मिडल स्टंप वा लेगस्टंप गार्ड देतो. मग फलंदाज पायातील बुटाच्या टोकाने वा त्यातील खिळ्याने जमीन खरड खरड खरडतो व एक रेघ ओढतो. अर्थातच प्रत्येक वेळेला नवा फलदाज आला कीं हा विनोदी प्रकार पुन्हापुन्हा घडतो. ’प्रत्येकाची रेघ वेगळी’ पण ’प्रिय हो ज्याची त्याला!’ मला कधीच कळलेले नाही कीं क्रीझवर तीन स्टंपांच्या लाइनींत तीन छोट्या, चुन्याच्या, सफेत रेषा आधीच, इतर रेघा आखतात तेव्हाच, कां आखल्या जात नाहींत?
वेस्ट इंडीजचे चंद्रपॉल वगैरे फलंदाज अंपायरने लाइन दिली कीं सरळ विटी (Bail) उचलून ती बॅटने ठोकून एक भोक पाडतात. बुटाने रेघ खरडण्यापेक्षा हा पर्याय बरा असला तरी इतर देशांच्या फलंदाजांनी तो पत्करलेला दिसत नाही. मला रेषा खरडण्याचा हा एकूण प्रकारच हास्यास्पद वाटतो. ’१०० वर्षांपूर्वी असेच करीत असत.’ एवढेच त्याचे कारण

10 comments:

 1. काय करणार, ह्या "धर्माचे" "कर्मकांड" आहे ते!!!!!!

  ReplyDelete
 2. तुमचा हा लेख ही निव्वळ टीकेसाठी टीका झाली. तिच्यात तथ्यदेखील नाहीच. क्रिकेटमधे रस नसलेला माझ्यासारखा जीर्णमतवादी जेव्हा बघतो तेव्हा अत्यंत आधुनिक आणि अत्यंत उथळ असे लोक क्रिकेटपायी वेडे दिसतात. क्रिकेट ओळखू न येण्याइतका बदललेला खेळ आहे अशी टीका जॉन वूडकॉक सतत करतो, आणि माझंही तेच मत आहे. आज कोणी शेम्बडा बोलर बाद झाला तरी मैदानावर नाचगाणी, मिठ्या, चुंबाचुंबी हे कॅबेरे बारमधे शोभावेत असे प्रकार होतात. त्यावरून हा खेळ खेळणारेही मूर्ख आहेत आणि पाहणारे त्याहून मूर्ख आहेत, असं मला वाटल्याशिवाय रहात नाही. जेव्हा जिम लेकरनी १९५६ साली सामन्यातला एकोणीसावा बळी घेतला, तेव्हा काहीही भावना न दाखवता, मर्कटउड्या न मारता, त्यानी आपली टोपी पंचाकडून घेतली आणि तो परतला. ते दिवस कधीच गेलेत. श्री ना पेंडसे यांनी 'लव्हाळी' पुस्तकात अनेकदा १९४०-च्या काळच्या पंचरंगी सामन्यांचे उल्लेख केले आहेत, त्या खेळाची लय कधीच बदलली.

  फलंदाज़ स्टान्स-गार्ड का घेतो, गायक हळूहळू सूर लावत का सुरवात करतात, या तांत्रिक बाबी माझ्यासारख्याला कळू शकत नाहीत, आणि तुम्हालाही ते कळत नसावं अशी मला शंका आहे.

  नवीन तंत्रज्ञानाच्या वापरात क्रिकेट हा तथाकथित आधुनिक अमेरिकनांच्या बेसबॉलपेक्षा पुढे आहे.

  शिवाय 'जीर्णमतवादी' शब्द शिवी म्हणून वापरणे हा अगदीच मायावती-छाप प्रकार झाला. सध्याची आधुनिकता ही केशवसुतांना अभिप्रेत असलेली नक्कीच नाही. तिच्यापेक्षा जीर्णमतवाद परवडला. शास्त्रीय संगीताबद्दल काडीचीही माहिती नसलेले 'हे शंभर वर्षांपूर्वीचंच संगीत आहेत, राग शेकडो वर्षं ज़ुने आहेत' अशी टीका करतात. एखादी गोष्ट '१०० वर्षं ज़ुनी आहे' यातून इष्टानिष्टतेचे निष्कर्ष निघू शकत नाहीत. आणि गार्ड घेणे हा प्रकार निरर्थक असलाच तरी तो क्रिकेटचा इतका क्षुल्लक भाग आहे की तो आधार धरून खेळावर टीका करण्यात मला अर्थ दिसत नाही. 'Conclusion in search of evidence' या धर्तीची ही टीका आहे.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 3. आपला ’पोवाडा’ वाचून त्या जुन्या नानिवडेकरांची आठवण झाली. खूपच जोरदार!
  मीहि क्रिकेट अनेक वर्षे ऐकतो वाचतो आणि आता पाहतोहि आहे. तुम्ही वर्णिलेले हास्यास्पद प्रकार मलाही ’खुपतात’. मी गार्ड घेण्यावर टीका केलेली नाही हे तुम्ही लक्षात घेतलेले नाही. जाऊद्या. मतस्वातंत्र्य सर्वानाच हवे.

  ReplyDelete
 4. आधीच तीन रेषा आखण्याचा साधा मार्ग न वापरता सगळेच उगीच गार्ड घेतात, वेळ दवडतात, आणि कारण काय तर १०० वर्षांपूर्वी असेच करीत -- ही टीका नाही असा दावा तुम्ही कसा करता?

  ज्या प्रमाणात आज़ खेळ पाहिल्या ज़ातात तो प्रकार मला न समज़णारा आहे. मी स्वत: बेसबॉलचे स्कोअर पाहिल्याशिवाय झोपत नाही, पण हा सगळा मूर्खपणा आहे. कोणी १५-२० लोक खेळतात, त्यांना तुमच्याशी काहीही देणंघेणं नसतं, तरीही आपण पाहतो. या मागे काय कारण असू शकेल? माणसाच्या स्वभावात खोल कुठेतरी ज़ुगारी दडला असतो, आणि प्रत्यक्ष ज़ुगार खेळण्याची हिंमत नसलेले डरपोक लोक 'पुढल्या क्षणी काय होणार' हा ज़ुगार खेळाच्या माध्यमातून खेळतात, असा तर्क मी सध्या बांधला आहे. मी धार्मिक नाही, पण सगळेच धर्म अशा ज़ुगारांत लक्ष ज़ाऊ नये म्हणून भक्तांच्या नैतिकतेची काळजी घ्यायला पूजाअर्चा वगैरे तोच-तो पणा असलेल्या गोष्टी अंगीकारत असावेत. शिवाय एकेकाळी आयुष्याला आवश्यक अंगमेहनतीच्या गोष्टी करण्यात (पाणी भरणे, कपडे शिवणे, रांधणे) इतका वेळ ज़ाई की या क्रिकेट वगैरे थेरांसाठी वेळच रहात नसे. 'हाताशी नको तितका वेळ असणे' हे कारण यामागे आहे, असं ब्रायन वॉल्डन (Brian Walden) हा विचारवंत म्हणतो.

  जिम लेकरचा पराक्रम तर माझ्या जन्माआधीचा आहे. पण मी प्रत्यक्ष खेळ पाहिलेले लॉईड-ब्रियर्ली किंवा शिवलकर-गावस्कर-मांकड हे लोक ओल्ड स्कूलचे वाटत. कॉनर्स, मॅकेन्‌रो यांनी त्या जगातल्या सभ्यतेवर पहिले हल्ले केले, आणि नन्तर एकूण समाज़च बिघडला. महाराष्ट्रात सवंगपणा १९९०-च्या सुमारास वाढला. भारतात जन्म होऊन १९४७ साली पाकिस्तानात पळालेले माझे मित्र सांगतात की पंजाब १९७० कडे बिघडला, पण १९५०-च्या सुमारासच बडे ग़ुलाम अली पाकिस्तानातल्या उथळपणाला कंटाळले होते. आता मात्र भारतानी उथळपणात पाकिस्तानची निदान बरोबरी केली आहे आणि अमेरिकेची बरोबरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  ReplyDelete
 5. या माणसाला खरेच काही काम नाहीये बहुधा.... म्हणून असले कॉमेंट कारण सुटतो सगळीकडे...'हाताशी नको तितका वेळ असणे' हे कारण यामागे आहे' हे मात्र स्वतः सिद्ध करतो आहे.

  ReplyDelete
 6. 'नानिवडेकर'च्या विषयाशी संबंधित असलेल्या प्रतिक्रिया दाखवा (कुठल्याही ब्लॉगवर) आणि १०१ रुपये मिळवा !!!

  ReplyDelete
 7. अरे हेरंब, नानिवडेकर हे वयस्कर गृहस्थ आहे. आपल्यासारखे तुर्क नाहीत तर अनुभवसंपन्न आहेत. इथेच कुठेतरी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर राहतात बहुधा. त्यामुळे जग आणि लोक पण खूप पाहिलेले असावेत असा अंदाज बांधायला हरकत नाहीत. तेव्हा आपण त्यांच्यावर टीका करताना त्यांना आदरार्थी संबोधायला हरकत नाही...:)

  ReplyDelete
 8. निखिल, नुसत्या वाढत्या वयाने आदर मिळत असता तर लोकांनी कपिल, सुनील, सचिन, अमिताभ, (विश्वनाथन) आनंद यासारख्यांचा उल्लेख एकेरीत कशाला केला असता? ;)

  ReplyDelete
 9. तुम्ही तरुण मंडळी फारच रागावले आहात! जाऊद्याहो! माझ्या मूळ सूचनेवर, ( चुन्याच्या रेषा काढा, खरडपट्टी नको) कोणीच बोलला नाहीत!

  ReplyDelete
 10. > चुन्याच्या रेषा काढा, खरडपट्टी नको
  >
  ज़ो विचारपूर्वक बोलू शकतो, अशा कोणाला विचारता येईल.

  'शास्त्रीय संगीत मांडी घालून का गातात' हा प्रश्न अनेक गोरे लोक विचारतात. त्याचं समाधानकारक उत्तर मला कधीही वाचायला मिळालेलं नाही. क्रिकेटवाले दिवसभर उभे राहतात, दीनानाथ-बालगंधर्व नाटकांत उभे असतात, तर शास्त्रीय गाणारे का नाही? पण उभं राहण्यात फार शक्ती ज़ात असेल, किंवा 'शंभर वर्षांपूर्वी करत म्हणून' असंही (गमतीत बोलायचं झाल्यास) जीर्णमतवादी कारण असू शकेल.

  ReplyDelete