Sunday, January 22, 2012

नाव्हा नाकोर्न

जग आता किती एकत्र जोडले गेले आहे आणि किती परस्परावलंबीहि झाले आहे याचा एक नमुना आज वाचला. गेल्या वर्षी पावसाळ्यात थायलंडमध्ये फार मोठे पूर आले. याच्या बातम्या व फोटो आपण पाहिल्या होत्या. त्याच्या भीषणतेची पुरेशई कल्पना आपल्याला नुसते फोटो पाहून आलेली नसणार. त्या पुराचा एक परिणाम आजच्या एका बातमीत दिसला. थायलंडची राजधानी बॅंकॉक. या शहराच्या जवळ एक खास इंडस्ट्रियल झोन आहे. त्याचे नाव Nava Nakorn. या झोनमध्ये अनेक कारखाने आहेत. जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी येथे उत्पादन चालवले आहे. या झोनला गेल्या पावसाळ्यातील या भीषण पुराचा फार मोठा फटका बसला व येथील कारखान्यांची अपरिमित हानि झाली. पूर संपून महिने लोटले मात्र तरीहि या झोनमध्ये परिस्थिति सुधारलेली नाही. रस्ते उखडलेले आहेत. कारखान्यांमधील फुकट गेलेली यंत्रसामग्री, फर्निचर, कागदपत्रे, रस्त्यांवर टाकलेलीं आहेत. या झोनमधील २२७ कारखान्यांपैकी फक्त १५% ठिकाणी काम सुरू झाले आहे. कॅंबोडियातून आलेले मजूर चिखल उपसणे कचर्‍याची विल्हेवाट लावणे यांत मग्न आहेत.
विषेश गोष्ट म्हणजे, या झोनमध्ये जगाच्या एकूणपैकी ४० ते ४५ टक्के Hard Disk Drives बनत होते! त्यांचे उत्पादन बंद पडले आहे व पूर्वपदावर येण्यास आणखी किती काळ लागेल हे सांगता येत नाही. कदाचित सप्टेंबर उजाडेल! परिणामी HDD च्या किमती अमेरिकेत ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
या झोनमधील कारखान्यांपुढे दुसरी चिंता आहे कीं असेच महापूर या झोनमध्ये पुन्हा-पुन्हा येणार का? सरकारी प्लॅन असा आहे कीं सप्टेंबरपर्यंत या झोनभोवती प्रचंड अशी पुरनियंत्रक भिंत बांधायची!. तिचे दरवाजेहि पाण्याचा थेंबहि आत येणार नाही असे सीलबंद असणार.
कारखाने जीव मुठीत धरून पुन्हा नव्याने उभे राहतीलच. HDD पुन्हा बनू लागतीलच. कारण कॉम्प्यूटरवर चालणारे जग HDD शिवाय कसे चालणार?

No comments:

Post a Comment