Wednesday, January 11, 2012

अडवणूक

अमेरिकेतील राजकारण परक्या देशातील माणसाला कळणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्षच प्रेसिडेंट ओबामाची प्रत्येक गोष्टीत अडवणूक करतो असे नाही. हल्लीच एक बातमी वाचली ती अशी कीं प्रेसिडेंट ओबामा यानी एका वरिष्ठ कोर्टावर जज्ज म्हणून एका स्त्रीची केलेली नेमणूक एका डेमोक्रॅटिक सिनेटरने अडवून ठेवली आहे!
या सिनेटरचे नाव आहे रॉबर्ट मेनेंडेझ व त्या स्त्रीचे नाव आहे पॅटी श्वार्झ. ऑक्टोबर महिन्यात ही नेमणूक केली गेली. या स्त्रीला वकिलीचा व जज्ज म्हणून कां करण्याचा दीर्घ अनुभव आहे. अमेरिकन बार असोसिएशनने तिच्या नेमणुकीचे स्वागत केले आहे. मात्र प्रेसिडेंटने केलेल्या अशा नेमणुकीला सिनेटच्या ज्युडीशिअरी कमिटीची नियमाप्रमाणे मान्यता लागते. त्यासाठी कमिटीच्या चेअरमन (सिनेटर पत्रिक लिहे) ने सभाच बोलावलेली नाही. सिनेटच्या एका प्रथेप्रमाणे संबंधित राज्याच्या दोन्ही सिनेटर्सनी लेखी मान्यता दिल्याशिवाय ही सभा होणार नाही. एका सिनेटरने मान्यता कळवली आहे मात्र मेनेम्देझ याची मान्यता मिळालेली नाही.
मान्यता न देण्याचे कारण वैयक्तिक आहे असे बातमीत म्हटले आहे. श्वार्झ यांचे एक ‘मित्र’ जेम्स नोबेल यांनी २००६ साली मेनेदेझ यांचे विरुद्ध एका भ्रष्टाचार संबंधी तक्रारीच्या संदर्भात त्याना समन्स बजावले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यावेळची सिनेटची निवडणूक मेनेदेझ याना जड गेली. नोबेल यांच्यावरचा राग श्रीमती श्वार्झ याना भोवतो आहे. अर्थात मेनेदेझ यांनी हे कारण नाकारले आहे हे सांगणे नलगे!
असे येथील राजकारण चालते!

No comments:

Post a Comment