Friday, January 20, 2012

कथा डेट्रॉइट आणि विचिटा ची

अमेरिका ही कारखानदारीबद्दल प्रख्यात. मोटरगाड्या आणि विमाने बनवणारे प्रचंड कारखाने येथे आहेत. डेट्रॉइट हे शहर मोटरगाड्यांच्या कारखान्यांचे आगर अशी त्याची ख्याति. येथील नागरिक पिढ्यानपिढ्या याच व्यवसायात गुंतलेले. मध्यमवर्ग खूप वाढलेला कारण या व्यवसायातील पगार चांगले. शहराची वर्षानुवर्षे भरभराट होत होती. मात्र गेली काही वर्षे अमेरिकन मोटरव्यवसायाला उतरती कळा लागलेली आहे. परिणामी डेट्रॉइटमधील अनेक लहानमोठे कारखाने बंद पडले आहेत. शहरावर एक औदासीन्याची अवकळा पसरली आहे. शहराची लोकवस्ती झपाट्याने कमी झाली आहे. या व अशाच अनेक बातम्या वाचनात आलेल्या होत्या. आज एक वाचावयास मिळाले कीं डेट्रॉइटमध्ये स्क्रॅप जमवण्याचा व विकण्याचा व्यवसाय जोरात आहे. बंद पडलेले व रिकामे टाकून दिलेले अनेक लहानमोठे कारखाने या शहरात आहेत. त्यांची छ्परे वा कॉलम/बीम्स पाडून व कापून स्क्रॅप जमा करून विकणार्‍या काही तरुणांच्या टोळ्या हे काम रात्रंदिवस पद्धतशीरपणे करत आहेत. इतर ठिकाणांहूनहि बेकारीने गांजलेली माणसे त्यात सामील होत आहेत. टेलिफोनच्या तारा पाडून आणि कापून तांब्याचे स्क्रॅप विकण्याचेहि काम जोरात चालले होते व टेलिफोन बंद पडण्याच्या तक्रारी फार झाल्यामुळे पोलिसाना खास कारवाई करावी लागली. मुंबईच्या रस्त्यांवरून व वस्त्यांमधून स्क्रॅप जमवणारी अनेक माणसे फिरत असतात व त्यातून थोडेफार पोटाला मिळवतात. रस्त्यावर पडलेली कॉन्क्रीटची तुटकी मॅनहोल कव्हर्स व पाइप दिवसभर फोडत बसून आतील लहानसे लोखण्डी वायरचे वा बारचे तुकडे जमवून नेणारी मुलेहि दिसतात त्यांची मला आठवण आली.
त्यातच, कान्सास राज्यातील विचिटा या शहरातील बोइंग कंपनीचा मोठा कारखाना एक वर्षानंतर बंद होणार आहे अशीहि बातमी दिसली. गेल्या वर्षी बोइंग कंपनी, लढाऊ विमानाना हवेतच इंधन पुरवठा करण्याचे काम करणार्‍या नवीन प्रकारच्या विमानांच्या बांधणीचे खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या खटपटीत होती. त्या वेळेला अशी अपेक्षा होती कीं यामुळे विचिटातील कारखान्यात अनेक नवे जॉब निर्माण होतील. या कारणास्तव कंपनीला राजकीय पाठिंबाही मिळत होता. आता कंपनीला ते काम मिळाले आहे पण ते विचिटातील कारखान्यात होणार नाही. हा कारखाना चालवणे परवडत नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. विचिटा हे विमान कारखान्यांचे शहर आहे. मात्र बोइंगशिवाय इतर कंपन्यांचे कारखाने लहान आहेत. गेली ८० वर्षे बोइंगच्या कारखान्यात काही घराण्यांच्या २-३ पिढ्यांनी नोकर्‍या केल्या व हा आपला कारखाना असे मानले. त्यांच्यात नैराश्य पसरले आहे व कंपनीने आपणाला फसवले अशी भावना आहे. विचीटा शहर डेट्रॉइटच्या मार्गाने चालले आहे कीं काय असे वाटते.
मुंबईतील कापडगिरण्या, जवळपास सर्वच, २०-३० वर्षांमध्ये बंद पडलेल्या पाहिलेल्या माझ्यासारख्याला यात नवीन काही नाही. मात्र ‘एकहि कारखाना बंद होऊ दिला जाणार नाही’ अशी खोटी व पोकळ आश्वासने येथे कोणी देत नाही!

1 comment:

  1. साडेचार वर्षे डेट्रॉईटच्या जवळच्या गावात राहील्यामुळे हे सारे नैराश्य जवळून पाहीले आहे. फॉर लिज चे रस्तोरस्ती लागलेले बोर्ड आणि घरांघरांवरील फ़ॉर सेल च्या पाट्या ( दीड दोन वर्ष गेले तरीही घर विकले जात नाही तेव्हां मालकाची मनस्थिती काय असेल... :( ). फार वाताहात झाली आहे मिशिगनची. वाईट वाटते.

    ReplyDelete