Monday, January 16, 2012

नोमची सुटका

अमेरिकेच्या अलास्का राज्यात एक नोम नावाचे गाव आहे. ते एक आर्क्टिक समुद्रकाठावरील बंदर आहे. हिवाळ्यामध्ये आर्क्टिक समुद्र गोठला कीं हे गाव एकाकी पडते कारण येथे जाण्यासाठी रस्तेच नाहीत! मग येथे माणसे वा मालाची वाहतूक बंद पडते. थंडीचा काळ संपेपर्यंत पुरेल एवढे खनिज तेल व इतर सर्व माल आधीच भरून ठेवावा लागतो. गावाची वस्ती अर्थातच थोडी आहे. फक्त ३,५००.
यंदा काहीतरी गडबड झाली आणि पेट्रोल-डिझेलचा शेवटचा हप्ता वेळेवर येऊन पोचलाच नाही!पंचाइत झाली!आता थंडीचा काळ कसा काढणार?
काही दिवसांपूर्वी रशियाच्या व्ह्लाडिव्होस्टॉक बंदरातून Renda नावाची एक टॅंकर ‘नोम’ साठी तेल घेऊन निघाली होती पण नोमच्या दक्षिणेला असलेल्या 'डच हार्बर' नावाच्या एका अलास्कातीलच बंदरापर्यंत आल्यावर पुढे समुद्र गोठलेला असल्यामुळे तिला नोमकडे जाताच येईना! मग अमेरिकन कोस्ट-गार्डची एक आइस-ब्रेकर Healy तिच्या मदतीला धावली. मग हीली बर्फ फोडत पुढे आणि तिने बर्फात करून दिलेल्या वाटेवर रेंडा तिच्या मागे असा प्रवास ४ जानेवारी पासून सुरू झाला. मात्र काही वेळा हीली बर्फ फोडून पुढे सरकते तों लगेचच पाठचा बर्फ पुन्हा एकत्र येऊन रेंडाची वाट बंदच असाही प्रकार होत होता.हीलीची ताकद कमी पडत होती. मैला-मैलाने प्रगति चालू होती. काही वेळा पीछेहाटहि होत होती. १४ जानेवारीला अखेर रेंडा नोम बंदरापर्यंत येऊन पोचली अशी बातमी आली आहे. मात्र अजूनहि रेंडा धक्क्याला लागू शकत नाही! दूर समुद्रात बर्फात अडकून उभी आहे. आता तेथूनच एक मैल अंतरावरून भल्यामोठ्या लांबलचक होझपाइपने सर्व तेल नोम ला पोचवले जाणार आहे. ते यशस्वीपणे पार पडले म्हणजे नोम वाचले असे होईल!
१००-१२५ वर्षांपूर्वी असेच एकदा नोम बंदर गोठले व मग तेथे एक साथीचा रोगहि उद्भवला पण औषधे पोचवणे कसे जमणार हा प्रश्न होता. तेव्हाहि रशियाच्या व्ह्लाडिव्हॉस्टॉक मधूनच रेनडियरनी ओढायच्या गाड्यानी बर्फावरून शेकडो मैल प्रवास करून नोम ला वाचवले होते त्याची यावेळी सर्व जण आठवण काढत आहेत. अमेरिकन Coast Guard ने प्रसिद्ध केलेला एक नकाशा व एक-दोन फोटो येथे देत आहे त्यावरून खुलासा होईल.
रेंडा

हीली आणि रेंडा

No comments:

Post a Comment