Friday, January 6, 2012

नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड

अमेरिकेत एक नॅशनल लेबर रिलेशन बोर्ड आहे. कामगारांच्या प्रश्नांसंबंधीं त्याला अनेक अधिकार आहेत. त्याचे पांच सभासद असतात व प्रेसिडेंट त्यांची नेमणूक करतो पण अमेरिकेच्या घटनेप्रमाणे त्या नेमणुकीला सिनेटची मान्यता लागते. तीच तर गोची आहे. गेल्या वर्षी या बोर्डाववर दोनच सभासद उरले होते व म्हणून प्रेसिडेंट ओबामाने Craig Becker या तिसर्‍या सभासदाची नेमणूक केली होती. सिनेटचे सेशन चालू नसेल तेव्हा अशी नेमणूक प्रेसिडेंटला आपल्या अधिकारात करता येते. त्या मेंबरची मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती.
इथल्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय पूर्वी केला आहे कीं पांच सभासदाच्या या बोर्डाचे निदान तीन सभासद उपस्थित असल्याशिवाय त्याला कामगारविषयक विवादांवर निर्णय घेता येणार नाही. या नियमामुळे १ जानेवारी २०१२ पासून बोर्डाचे काम ठप्प होणार होते. कामगारांचे प्रश्न अडकून रहाणार होते. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्ष अल्पमतात आहे तरीही कामकाजाच्या नियमांमुळे प्रेसिडेंटने केलेली नेमणूक नाकारण्याचा त्या पक्षाला अधिकार मिळतो! सध्या येथील राजकारण असे चाललेले आहे कीं प्रेसिडेंट ओबामाला काहीही करू द्यायचे नाही हे रिपब्लिकन पक्षाचे निश्चित धोरण आहे!! त्यामुळे ओबामा याना नवीन मेंबर नेमताच येणार नव्हता!
हीच परिस्थिती ग्राहक हितरक्षक अशा एका नवीन बोर्डाचीही होती. एक वर्षापूर्वी कायदा होऊन बोर्ड अस्तित्वात येऊनही डायरेक्टर नेमला गेलेला नसल्यामुळे बोर्ड काम करू शकत नव्हते. आणि ओबामांना ज्याची नेमणूक करायची होती तिला रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळणार नव्हती!
आता २०१२ साली अध्यक्षाची निवडणूक व्हावयाची आहे. त्यामुळे ओबामांची अडवणूक करणे हा एक कलमी कार्यक्रम रिपब्लिकन पक्ष चालवत आहे. या पेचप्रसंगातून प्रेसिडेंट ओबामांनी मार्ग काढला तो असा.
नववर्षाच्या सुरवातीलाच सिनेट Adjourn झालेले आहे असे पाहून आपल्याला घटनेप्रमाणे अशा काळात असलेले खास अधिकार वापरून अध्यक्षाने तीन लेबर बोर्ड मेंबर व एक ग्राहक हितरक्षक बोर्डाचा डायरेक्टर यांची सरळ नेमणूकच करून टाकली आणि रिपब्लिकन पक्षाच्या अडवणुकीच्या धोरणावर जोरदार टीकाही केली. आता यावर काही करता येत नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा जळफळाट झाला आहे!
निवडणूक वर्षात आता असे अनेक झगडे होणार आहेत.

No comments:

Post a Comment