Monday, February 7, 2011

इच्छापत्र

इकॉनॉमिक टाइम्समध्ये Will या विषयावर एक लेख वाचला. हा बहुचर्चित विषय आहे. मध्यमवर्गाच्या निवासाच्या जागांच्या किमतीहि आता भरमसाठ वाढलेल्या असल्यामुळे पतीच्या किंवा पित्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात बखेडे होण्याचे प्रकारहि वाढीस लागले आहेत. ज्यानेत्याने आपले इच्छापत्र करून ठेवावे असा उपाय त्यावर सुचवला जातो. मात्र कधीकधी रोगापेक्षा उपाय भयंकर असा प्रकार होऊं शकतो. काही माहिती समोर ठेवतो आहे. मात्र मी वकील नाही तेव्हां अचूकपणावर मर्यादा आहेच.
१. पूर्वापार म्हटले जात असे कीं फक्त स्वकष्टार्जित मालमत्तेबद्दलच इच्छापत्र करतां येते आणि स्वकष्टार्जित म्हणजे जी मिळवण्यासाठी स्वत:च्या (निढळाच्या) कमाईचाच उपयोग केलेला आहे अशी मालमत्ता. मग पित्याकडून वा पतीकडून वा इतर कोणाकडून वारसाहक्काने प्राप्त झालेला फ्लॅट किंवा जमीन वा बंगला याचे इच्छापत्र करतां येते काय? हा मला पडणारा प्रष्न मी माहीतगार व्यक्तीकडून सोडवून घेतला आहे. अशी मालमत्ता संपूर्णपणे मालकीची झालेली असल्यास व ताब्यात असल्यास तिचे इच्छापत्र करतां येते. सोसायटीतील ब्लॉकचा यात समावेश आहे. मात्र नुसत्या नॉमिनेशनच्या आधारावर एकाच वारसाचे (उदा. आई व मुलें यापैकी कोणीहि एक), नाव लागले असेल तर मालकी संपूर्ण नसल्य़ामुळे त्या व्यक्तीला इच्छापत्र करता येणार नाही. (स्वत:च्या हिश्शापुरते करतां येईल)
२. इच्छापत्र करणार्‍या व्यक्तीने शक्यतर स्वत:च्या हस्ताक्षरात किंवा सुवाच्य टंकलेखनाने मजकूर प्रथमपुरुषी भाषेत लिहावा. आपण शरीरप्रकृतीने व मानसिक संतुलनाने आपली इच्छा व्यक्त करण्यास पूर्ण सक्षम असल्याचे स्पष्ट लिहावे. कोणाच्याही दडपणाशिवाय, पूर्ण स्वेच्छेने लिहीत असल्याचे स्पष्ट करावे.
३. आपल्या मालमत्तेच्या आपल्या पश्चात करावयाच्या व्यवस्थेबद्दल नि:संदिग्ध लिहावे. त्यापूर्वी अशा मालमत्तेचा सविस्तर खुलासा लिहावा.
४. नैसर्गिक वारसांचे व्यतिरिक्त इतर कोणास काही द्यावयाचे असल्यास त्यामागील कारण वा हेतु लिहिल्यास चांगले. (उदा. - सेवकाने निरपेक्षपणे केलेली उत्तम सेवा)
५. इच्छापत्रावर, नेहेमी वापरत असलेली सही स्पष्टपणे करणे आवश्यक. दोन साक्षीदारांच्या सह्या, नावपत्त्यासह आवश्यक. ’आमचेसमक्ष इच्छापत्रावर सही केली’ असे साक्षीदारांनी नमूद केलेले असावे. सही करतां न येणार्‍या व्यक्तीसाठी काय करणे आवश्यक याचा खुलासा वकील करूं शकतील. साक्षीदार निवडताना काळजी घ्यावी. इच्छापत्राबद्दल भविष्यात कोर्टबाजी होण्याची शक्यता वाटत असल्यास साक्षीदार आवश्यक तर सहीबाबत साक्ष देऊं शकतील असे निवडावे.
६. इच्छापत्रावर सही करणारी व्यक्ति या वेळी शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्ट्या सक्षम असल्याची नोंद डॉक्टरने सहीसह करणे आवश्यक. शक्यतों नेहेमींचा फॅमिली डॉक्टर असल्यास चांगले. नाव व रजिस्टर नं. लिहावा.
७. इच्छापत्राप्रमाणे मालमत्तेची व्यवस्था होण्यासाठी एखाद्या व्यक्तीस वा बॅंक, सॉलिसिटर याना अधिकार देतां येतो. मात्र तशी सक्ति नाही. अशी executer म्हणून निवडलेली व्यक्ति इच्छापत्राद्वारे काही फायदा मिळणारी नसावी आणि तिची executor म्हणून काम करण्याची तयारी असल्याची खात्री करून घ्यावी. कारण हे काम डोकेदुखीचे ठरू शकते.
८. इच्छापत्राची मूळप्रत स्वत:जवळ जपून ठेवावी किंवा बॅंकलॉकरला ठेवावी. एक झेरॉक्स प्रत विश्वसनीय व्यक्तीपाशी ठेवावी.
९. इच्छापत्र केले असल्याचे वारसांना तशी माहिती असणे योग्य मात्र तरतुदी माहीत नसाव्या.
१०. पहिल्यानेच इच्छापत्र करीत असल्यास तसा स्पष्ट उल्लेख असावा. पूर्वी कधी केलेले असल्यास ’पूर्वीची सर्व इच्छापत्रे याद्वारे रद्द करीत आहे’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
११. इच्छापत्र केल्यावर त्यात किरकोळ बदल करावयाचा असल्यास नवीन न करतां दुरुस्तीपत्र (Codicil) करतां येते.
१२. इच्छापत्र रजिस्टर केलेच पाहिजे असा कायदा नाही. मात्र केलेले असेल तर त्याला कायदेशीर मान्यता मिळणे सोपे जाते. रजिस्ट्रेशनचा खर्च डोईजड नसतो. (इस्टेटीची किंमत कितीहि असली तरी) स्टॅंपड्यूटी भरावी लागत नाही.
१३. येवढे सर्व करूनहि इच्छापत्राच्या वारसाला/वारसांना बहुतेक वेळां Probate by Court ची प्रक्रिया करावी लागतेच. ती किचकट, वेळखाऊ व खर्चिकही ठरू शकते. कारण कोर्टफी इस्टेटीच्या किमतीप्रमाणे पडते व वकिली खर्चहि पडतो. इच्छापत्रात नैसर्गिक न्यायाचे तत्व, कोणत्याही योग्य कारणासाठी जरी, कमीजास्त डावलले गेले असेल तर ’अन्याय’ झालेल्या वारसाकडून हरकत घेतली जाऊं शकते व तशी पूर्ण संधि Probate च्या न्यायप्रक्रियेत त्याला मिळतेच. यामुळेच इच्छापत्रामुळे काही कौटुंबिक संघर्ष निर्माण होतात. याचाही विचार इच्छापत्र करताना करावा हे उत्तम.

3 comments:

  1. सध्या तरी कुठल्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाकरता नेमके आणि एकमेव पर्याय असणारे उपाय नमूद करून ठेवण्याची सोय हल्लीच्या कायद्यात नाही. अशा हस्तांतरणाकरता मालमत्तेच्या काही टक्के रक्कम व्यर्थच खर्ची पडते.

    तुम्ही म्हणता तशा इच्छापत्रानेही ती वाचेल अशी शाश्वती नाही.

    यू आय डी च्या प्रस्थापनेनंतर हा प्रश्न सोपा होऊ शकेल. मग प्रत्येकाची संपदा किती आहे? त्याचे वारस किती आहेत? कोण आहेत? ही माहिती एकदा का निश्चितस्वरूपाने नमूद झाली की मग, त्यांपैकी कुणाला काय द्यायचे याबद्दलची इच्छा नोंदवणेही सहज संभव होऊ शकेल.

    नरेंद्र गोळे

    ReplyDelete
  2. U. I. D. आल्यानंतरहि कायद्याच्या गुंतागुंती कमी होतील का याबद्दल शंकाच आहे. मालमत्ता एकाच व्यक्तीच्या नावावर असेल तर ठीक. मात्र जास्त हक्कदार असतील तर शेवटी कोर्टच!

    ReplyDelete