Thursday, February 3, 2011

कोयनेचे पाणी मुंबईला?

पुन्हा एकदां बातमी छापली गेली कीं कोयनेचे पाणी मुंबईसाठी आणण्याचा विचार आहे. हे आपण किती वर्षे व किती वेळां ऐकणार आहोत? हा शुद्ध आचरटपणा आहे. कोयना प्रकल्पाबद्दल थोडी माहिती आपणासमोर ठेवतो.
कोयनेचे पाणी पूर्वेकडे वाहून कृष्णेतून पुढे समुद्राला मिळते. कोयना धरण बांधले गेले तेव्हा साठवले जाणारे पाणी पश्चिमेकडे (पर्वताच्या पोटातून) नेऊन अरबी समुद्रात सोडावयाचे व त्यातून वीजनिर्मित करावयाची असा प्लॅन होता. तेव्हांपासूनच असे कृष्णाखोर्‍यातील पाणी अरबी समुद्राला सोडण्यास विरोध व बंधने होती. स्टेज १ व २ बरोबरच पुरीं झालीं. त्यातून बाहेर पडणारे पाणी वासिष्ठी नदीत चिपळूण जवळ सोडले जाऊं लागले. तेव्हां सुरवातीला येथील जनरेटर्स २४ तास चालवले जात होते.
मग स्टेज ३ चा विचार झाला. स्टेज १ व २ चे पाणी पर्वताच्या कड्यामधून बाहेर पडत होते तेथून समुद्रसपाटीपर्यंत १२० मीटर उतार होता. त्याचा फायदा घेऊन अधिक वीजनिर्मिति करण्यासाठी योजना बनवली गेली. त्या अन्वये, हे पाणी अडवण्यासाठी सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर कोळकेवाडी येथे एक धरण बांधण्यात आले. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता थोडीच आहे. या धरणाचे जवळच पर्वताच्या पोटात एक हॉल खोदून तेथे नवे जनरेटर बसवले गेले. धरणातील पाणी बोगद्याने त्या जनरेटरना मिळते व नंतर ते पाणी दुसर्‍या बोगद्याने व पुढे कालव्याने वासिष्ठीच्या पात्राच्याही खालच्या पातळीला उतरऊन मग पात्रात सोडले जाते व मग ते पात्रातून वाहत जाऊन समुद्राला मिळते. जेथे हे पाणी नदीत शिरते तेथे जवळपास समुद्रसपाटी आहे. हे सर्व काम ३० वर्षांपूर्वीच पुरे झाले आहे.
पाणी वापरावर बंधन असल्यामुळे स्टेज १ व २ दिवसाचे ठराविक तासच चालवतां येतात. ते चालतील तेव्हांच कोळकेवाडीला पाणी जमते व तेव्हांच स्टेज ३ चे जनरेटर चालतात.
सन २००० च्या सुमारास स्टेज ४ कार्यान्वित झाली. त्यासाठी कोयना पाणीसाठ्याच्या तळाशी सुरू होणारा बोगदा बनवून पाणी पुन्हा नवीन बनवलेल्या पर्वताच्या पोटातील मोठ्या हॉलमध्ये बसवलेल्या चार २५० मेगावॉटच्या जनरेटरना दिले जाते व नंतर हे पाणीहि कोळकेवाडी येथे जमा होते. स्टेज १-२ वा स्टेज ४ चालवण्यावर पाण्याची उपलब्धता हे बंधन समान आहे. हे सर्व जनरेटर दिवसातून फक्त ४ ते ५ तासच, जेव्हां विजेची मागणी जास्त असते त्यावेळीच चालवले जातात व फक्त तेव्हाच कोळकेवाडीत पाणी जमून स्टेज ३ चेहि जनरेटर चालतात व सर्व पाणी अखेर जवळपास समुद्रसपाटीला वासिष्ठीत जाते. हे पाणी मुंबईच्या गरजेच्या मानाने थोडेच आहे.
मुख्य अडचण ही कीं हे समद्रसपाटीवरचे पाणी एवढ्या दूरवर मुंबईला नेण्यासाठी भांडवली व दैनंदिन दोन्ही खर्च डोईजड होतील. मुंबईला लागणारे पाणी ठाणेजिल्ह्यातील नद्यांमधूनच मिळवावें लागेल व हे स्त्रोत संपले म्हणजे खारे पाणी गोड करणे किंवा वापरलेले पाणी पुन्हा शुद्ध करणे हे पर्याय शोधावे लागतील.
कशाचाही विचार न करतां व पुरेशी माहिती करून घेण्याच्या भानगडीत न पडतां अशा घोषणा केल्या जातात व वृत्तपत्रे त्याना प्रसिद्धि देतात.
हे असेच चालणार काय?

2 comments:

  1. ही योजना सध्या तरी अव्यवहार्य आहे हे तुमचे म्हणणे खरे आहे. मात्र ती असंभव नाही. गंगा कावेरी योजना जितपत संभव आहे तितपतच तीही आहे.

    ReplyDelete
  2. माझ्या मते गंगा-कावेरी योजना पूर्णपणे अव्यवहार्य़ आहे. एका नदीच्या खोर्‍यातील पा्णी दुसर्‍या नदीत वळवण्याचा यापुढे प्रयत्न झाला तर मारामार्‍या होतील, मुडदे पडतील. आताच ठाने जिल्यातील पाणी मुंबईला आणण्याच्या प्रकल्पांना विरोध होऊ लागला आहे.

    ReplyDelete