Monday, August 29, 2011

नद्यांवरील धरणें व पूर नियंत्रण


आजच्या पेपर्समध्ये भातसा, वैतरणा व तानसा नद्यांवरील धरणें पूर्ण भरली आहेत व दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीत सोडून द्यावे लागत असून त्यामुळे धरणाखालच्या प्रदेशांमध्ये पुराचा धोका उद्भवला असून नदीकाठावरच्या गावाना सावधानतेचे इशारे दिलेले आहेत असे वाचावयास मिळाले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवनवी धरणे बांधली जाऊ लागलीं तेव्हां धरणांमुळे पुरांवर नियंत्रण ठेवतां येईल असे म्हटले जाई. ते काही अंशीं खरेंहि आहे. मात्र गेलीं काही वर्षे जरा वेगळी परिस्थिति दिसून येते. पावसाळ्याच्या सुरवातीला धरणे जवळपास रिकामीं असतात. पाऊस सुरू झाला कीं तीं भरूं लागतात. अमुक धरण इतके भरले अशा बातम्या छापून येऊं लागतात. धरणाच्या भिंतीच्या उंचीपर्यंत पाणी पोचले म्हणजे धरण भरले असे होत नाही! कारण बहुतेक सर्व धरणांवर दरवाजे बसवलेले असतात. ते बंद केले कीं पाणी धरणाच्या भिंतीच्या, दरवाजे असलेल्या भागाच्या उंचीपर्यंत, भरलेले असले तरी आता आणखी अडवून ठेवले जाऊ शकते. जास्तीत जास्त म्हणजे दरवाजांच्या वरच्या धारेपर्यंत पाणी अडवतां येते. या उंचीपर्यंत जेवढे पाणी धरणात तुंबवतां येईल ती धरणाची पाणी साठवण्याची क्षमता मानली जाते. धरणावर नियंत्रण ठेवणार्‍या अधिकारी वर्गाने, अर्थात पुरेसा पाऊस झाला तर, धरण पूर्ण भरेल असे पहावे अशी साहजिकच अपेक्षा असते. यात एक गोम आहे!
पाऊस कोणत्या काळात किती पडेल हे नक्की कोणीच सांगूं शकत नाही! त्यामुळे दरवाजे सुरवातीपासून बंद ठेवावे व लौकरांत लौकर धरण पूर्ण भरून घ्यावे हेच धोरण ठेवावे लागते. प्रश्न उभा राहतो केव्हां? धरण जवळपास पूर्ण भरले आहे अशा वेळी पुन्हा जोराचा पाउस धरणाच्या वरच्या अंगाला पडू लागला तर वाहून येत असलेल्या पाण्याला जागा मिळण्यासाठी दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागते, जसे आजच्या बातम्यात म्हटले आहे. अर्थात जसा धरणाच्या वरच्या अंगाला जोराचा पाउस पडत असेल तसाच खालच्या अंगालाही बहुतेक वेळा पडत असतो व त्यामुळे नदीमध्ये मोठा प्रवाह असतोच. त्यातच, धरणाचे दरवाजे उघडून मोठा विसर्ग पात्रात सोडला तर नदीतल्या पुराची मोठ्या प्रमाणावर वाढ होणारच! धरण बांधलेलेच नसते तर शा वेळी पूर नक्कीच कमी राहिला असता! त्यामुळे पावसाळ्याच्या पूर्वकालात धरणें कमीजास्त रिकामी असताना ती पाणी तुंबवून पुरावर नियंत्रण ठेवतात हे खरे पण उत्तरकालात तीं पुरात भरच घालतात असें म्हणावे लागते.
दरवाजे आधीपासून थोडेथोडे उघडे ठेवावे व पाणी सोडत रहावे म्हणजे उत्तर पावसाळ्यात पाण्याला जागा राहील हे या समस्येचे उत्तर नाहीं!. कारण तसे केले आणि शेवटी शेवटी पाउस थोडाच पडला किंवा नाहीच पडला आणि मग आधी जमलेले पाणी सोडून दिल्यामुळे धरण पावसाळ्या अखेर पूर्ण भरले नाहीं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे निर्णय धरण नियंत्रकावरच सोडणे भाग आहे.
त्यामुळे केव्हाकेव्हां धरणे पूर नियंत्रण करण्या ऐवजी पूर वाढवतात असें म्हणावे लागते!

4 comments:

  1. असहमत. हे म्हणजे सिग्नल यंत्रणेत (कधीतरी) होणाऱ्या बिघाडामुळे सिग्नल यंत्रणा अपघात कमी करण्याऐवजी अपघात वाढवायला मदत करतात असं म्हणण्यासारखं झालं !!

    ReplyDelete
  2. आपण फारसे विचारपूर्वक मत दिलेले दिसत नाही. सिग्नल यंत्रणा ’बिघडते’ कोणी मुद्दाम बिघडवत नाही! (घातपात सोडल्यास. धरणातून पाणी मुद्दाम, धरणाच्या सुरक्षिततेसाठी, सोडले जाते. सिग्नल बिघडल्याने वेळेचा खोळंबा होऊ शकतो, अपघात नव्हे. अपघात होतात ते लाल सिग्नल न मानल्यामुळे! (सिग्नलमध्ये बिघाड झाल्यास सिग्नल आपोआप लाल होतो.) धरणातून पाणी सोडण्याला पर्याय नाही पण त्यामुळे मोठा पूर येतो हे सहसा न जाणवणारे सत्य मी मांडले आहे. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर आज पाणी सोडले आहे व त्यामुळे कोयनेला मोठा पूर आला आहे, पूल पाण्याखाली गेले आहेत (जें सर्वसाधारण पुरामुळे होत नाही) ही बातमी आजच आली आहे.

    ReplyDelete
  3. नक्कीच. योग्य पूर नियंत्रणासाठी पावसाचा अचूक् अंदाज संपुर्ण पावसाळ्यासाठी असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच धरणाच्या पुढील टप्प्यात बंधारयांची श्रृंखला असणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  4. आपण माझी प्रतिक्रिया व्यवस्थित वाचल्याचे दिसत नाही. आपण म्हणालात "त्यामुळे केव्हाकेव्हां धरणे पूर नियंत्रण करण्या ऐवजी पूर वाढवतात असें म्हणावे लागते!" जे मला मान्य नाही आणि ते कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी मी सिग्नल यंत्रणेचं उदाहरण दिलं.
    असो.. माझ्या मताशी तुम्ही सहमत असावतच असा माझा मुळीच आग्रह नाही !

    ReplyDelete