Thursday, August 18, 2011

मुत्सद्दीपणाचा अभाव आणि भ्रष्टाचाराचा प्रभाव

दोन दिवसांच्या दिल्लीतील घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट दिसून आली कीं दिल्लीत आता सगळे राजकारणी आहेत, मुत्सद्दी कोणी उरलेला नाही! अण्णा हजारेना केलेली अटक अंगाशी येऊ लागल्यावर लोकक्षोभ हाताबाहेर जाण्यापूर्वीच प्रकरण सन्मानाने मिटवण्याचे कोणालाच सुचले वा जमले नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यानी दुबळेपणाचे केविलवाणे दर्शन घडवले. यशस्वी माघार घ्यावी व सन्माननीय तडजोड घडवून आणावी हे काम पोलिस अधिकारी लोकांवर ढकलून राजकारणी फक्त राजकारण करत बसले. जन्मभर नेहेरु, इंदिरा, राजीव, सोनिया यांच्या आदेशांची वाट पाहणारे! त्यांच्या हातून दुसरे काय होणार?
अण्णा हजारे आग्रह धरताहेत त्या प्रकारचा लोकपाल भ्रष्ट राजकारणी सोडून समाजातील इतर सर्वांना मान्य आहे असेही मुळीच नाही पण ज्या प्रकारचा मिळमिळीत वा बुळबुळीत लोकपाल सरकार आणू पाहत आहे तो आणुन, न आणून, सारखाच! खरी गोम ही आहे कीं कठोर लोकपाल विरोधी पक्षांना तरी कोठे हवा आहे?
पंतप्रधान व सरन्यायाधीश सुरवातीला लोकपालाच्या कक्षेबाहेर ठेवले म्हणून फार कांही बिघडणार नाही. लोकपाल नेमला गेला, त्याने २०-२५ प्रकरणे तपासून निकालात काढली व दोषी उच्चपदस्थांना कठोर शिक्षा झाल्या तर त्याचा परिणाम नक्कीच दिसूं लागेल. वरिष्ठ पातळीवरचा भ्रष्टाचार थांबला म्हणजे सामान्य नागरिकाला रोज छळणारा सामान्य पातळीवरचा भ्रष्टाचार कमी होऊं लागेल. पण ‘दुष्काळ सर्वांना हवा असतो’ असें म्हटले जात असे तसेच भ्रष्टाचार सर्वांनाच हवा आहे असें म्हणावेसे वाटते मग कठोर लोकपाल कोणाला हवा असणार?
तरीही आशेने म्हणावेसे वाटते 'अण्णा हजारे तुम् आगे बढो हम तुम्हारे साथ है'

2 comments:

 1. नमस्कार
  बरोबर लिहिलत अगदी सामान्य व्यक्ती च्या भावना आहेत ह्या ,कृपया मी हे फेसबुक वर शेअर करू शकतो का
  परवानगी असल्यास करीन --
  http://sanjaykelaskar.blogspot.com/

  sanjaykelaskar@gmail.com

  ReplyDelete
 2. जरूर करा. हे फेसबुक वर कसे टाकायचे मला माहीत नाहीं!

  ReplyDelete