Friday, July 15, 2011

मुंबईतील बॉंबस्फोट आणि नंतर.

मुंबईत झालेल्या स्फोटांनंतर नेहेमींचे सर्व सोपस्कार पार पडले. घटनास्थळाला सर्व लवाजम्यासकट भेटी, मग इस्पितळांना भेटी मग नेहेमीचे सर्व राजकारण, एकमेकांवर दोषारोप, राजीनाम्यांच्या मागण्या, मृत व जखमीना आर्थिक मदत जाहीर करणे वगैरे सर्व यथासांग पार पडले. या नेहेमींच्या सर्व प्रकारातून उघड झाले कीं अशा प्रसंगी कोणी कसे वागावे, काय बोलावे कोठे भेटी द्याव्या याबद्दल कोणतीहि विचारपूर्वक बनवलेली आचारसंहिता तयार करण्यात व अमलात आणण्यात कोणालाहि रस नाहीं!
मुख्यमंत्री म्हणतात १५-२० मिनिटे त्यांचा कोणाशीहि फोनवर संपर्क होऊ शकला नाही तेव्हा आता सॅटेलाइट फोन हवेत! कोणाकोणाला देणार? प्रथम मंत्री, पोलीस वरिष्ठ, सरकारी अधिकार्यांयपैकी वरिष्ठ, जिल्ह्याचे कलेक्टर वगैरे पासून सुरवात होईल, मग यादी वाढत जाईल, मग या यादीत आपले नाव असणे हा Status Symbol बनेल. मग सर्व मंत्रिमडळाबरोबरच त्यांचे सेक्रेटरी, मग त्यांचे सहायक, मग सर्व आमदार खासदार, राजकीय पक्षांचे पुढारी, पहिल्या दर्जाचे व नंतर इतर अनेक, मग नगरसेवक अशी मारुतीच्या शेपटाप्रमाणे यादी भराभर वाढत जाईल आणि मग पुढे प्रसंग येईल तेव्हा सॅटेलाइट फोनहि बंद होतील!
सर्व मंत्री, केंद्रीय मंत्री, पुढारी, विरोधी पक्ष नेते सर्वांनी जनतेवर एक मोठा उपकार करा! घटनास्थळाला भेट कृपया देऊं नका. जखमींना मुळीच भेटू नका. इस्पितळांना, पोलिस यंत्रणेला आपली कामे करूंद्या तुमच्या मागे नाचावयास लावू नका. CM किंवा PM भेटले म्हणजे जखमा बऱ्या होतात काय? कीं ते उपाययोजना सुचवतात? इस्पितळाच्या वरिष्ठ डॉक्टरांना काम सोडून यांच्यामागे धावावे लागते. हे सर्व टाळा. इस्पितळाना काही कमी पडत असेल किंवा मदत हवी असेल तर त्याची तजवीज करा. इतर ठिकाणांहून डॉक्टर रक्त वा इतर मदत हवी असेल तर त्याची व्यवस्था करा. जखमी व त्यांचे मदतनीस धन्यवादच देतील.
VIPs च्या सुरक्षा पथकांकडून जखमींना इस्पितळात भरती होण्यासही प्रतिबंध केला जातो (राहुल गांधींच्या उत्तर प्रदेश मधील रेल्वे अपघाताच्या भेटीचे वेळी एका जखमी सैनिकाला रोखण्यात आले व तो प्रवेश न मिळतांच मरून गेला!) हे लज्जास्पद आहे.
हे सर्व तुम्हा आम्हाला कळते मग त्याना कां कळत नाहीं ?

4 comments:

  1. > राहुल गांधींच्या उत्तर प्रदेश मधील रेल्वे अपघाताच्या भेटीचे वेळी एका जखमी सैनिकाला रोखण्यात आले व तो प्रवेश न मिळतांच मरून गेला! हे लज्जास्पद आहे.
    >----

    काही प्रमाणात याला इलाज़ नाही. 'लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो' ही म्हण आहेच. कोणाला आवडो, न आवडो, राहुल गांधींच्या नांवे करोडो लोक (ज्यांच्यातले १०-२० मेल्यावरही आपण गळे काढतो) त्यांच्या पक्षाला मते देतात, आणि ती एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे.

    > अशा प्रसंगी कोणी कसे वागावे, काय बोलावे कोठे भेटी द्याव्या याबद्दल कोणतीहि विचारपूर्वक बनवलेली आचारसंहिता तयार करण्यात व अमलात आणण्यात कोणालाहि रस नाहीं!
    >----

    पूर्णपणे सहमत. पण मनमोहन सिंग, अडवाणी ही मंडळी शक्य तितक्या प्रगल्भतेनी वागतांतच, आणि तरीही राजकारणाच्या रेट्यापुढे त्यांचा अनेकदा इलाज़ नसतो.

    ReplyDelete
  2. मला बिलकुल मान्य नाहीं. राहुल गांधी हा लाखांचा पोशिंदाहि नाहीं. आणि त्याच्या जीवनमरणाचा येथे प्रश्न नव्हता. राजकारण्यांची भलामण करण्याचे काही कारण नाहीं.

    ReplyDelete
  3. राष्ट्रपती वा पंतप्रधान प्रवास करतात तेव्हा रस्ते बन्द ठेवले ज़ातात. एके काळी हा प्रकार नव्हता, पण आता ही खबरदारी आवश्यकच आहे. अशा वेळी ५-१० मिनिटे उशीर झाल्यामुळे कोणाचे प्राण ज़ाण्याच्या घटना घडतही असतील. प्रसारमाध्यमांना अशा प्रसंगी आरडाओरडा करायची संधीच मिळते. मात्र ज़र अपघातप्रसंगी विशेष व्यक्तीच्या भेटीमुळे खोळंबा होणार असेल तर अशी भेट न देण्याबद्दल आचारसंहिता अवश्य हवी. राहुल गांधी अपघातानन्तर किती वेळानी गेला होता? लगेच? रविवार १० जुलैला अपघात झाला आणि राहुलची भेट होती मंगळवारी, अशी माहिती दिसते आहे. हा प्रसंग तुम्हाला अपेक्षित आहे का? रविवारच्या अपघातातला माणूस मंगळवार-पर्यंत बाहेर असेल आणि अचानक प्रकृती ढासळली असेल तर त्याला इलाज़ नाही.

    गांधीजी, सावरकर यांना कुठलंही घटनात्मक पद नव्हतं. म्हणून ते बिनमहत्त्वाचे ठरत नाहीत. जयप्रकाश १९७७-च्या विजयाचे शिल्पकार होते, तसेच सोनिया-राहुल गेल्या दोन निवडणुकांचे आहेत. लाखो लोक ज्यांच्याकडे डोळे लावून असतात ते 'लाखांचे पोशिंदे' सदराखाली यायला हरकत नाही. ज़र एकाच वेळी तुम्ही-आम्ही दवाखान्यात भरती असू आणि तेव्हाच तिथे पु ल, रामदेव बाबा, कसाब, बिल्ला-रंगा, कुसुमाग्रज यांपैकी कोणीही उपचारासाठी किंवा साधे भेटायला आले तरी त्यांच्यावर जास्त लक्ष दिलं ज़ाणारच. गांधी घराण्याबद्दल मला आकस आहे, पण त्या आकसापायी त्यांच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीचा बागुलबुवा करावा हे माझ्या मते अयोग्य आहे.

    ReplyDelete
  4. मूळ लेखातील वाक्यच थोडे बदलून म्हणतो, 'हे सर्व तुम्हा-आम्हाला कळते मग श्री. नानिवडेकर याना कां कळत नाहीं?'

    ReplyDelete