Tuesday, September 6, 2011

केजरीवाल आणि प्राप्तिकर

आजच्या टाईम्स मध्ये एक आश्चर्यकारक बातमी वाचली. श्री. अरविंद केजरीवाल यांना प्राप्तीकर खात्याने ९.४ लक्ष रुपयांची नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर हा केजरीवाल यांचा वैयक्तिक मामला आहे. कर देय असेल तर दिला पाहिजे. मागणी अन्यायाची असेल तर त्याविरुद्ध योग्य ती कारवाई ते करुं शकतात. जनतेचा त्याच्याशी उघडच काडीचाही संबंध नाहीं. ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी स्टडी लिव्ह घेतली होती. नंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला पण तो स्वीकारलेला नाहीं. हे सर्व त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत. त्यांचेशीही जनतेचा, तुमचा आमचा काहीही संबंध नाहीं.
बातमी अशी कीं India Against Corruption नावाची (त्यांच्याच पुढाकाराने चालणारी?) एक संस्था वा चळवळ आतां शाळा, कॉलेजे, देवळे, गणपती-उत्सव मंडप, अशा अनेक ठिकाणी जनतेकडून केजरीवाल याना मदत (कर भरण्यासाठी!) म्हणून पैसे गोळा करणार आहे! श्री. केजरीवाल याना हे ठाऊक आहे काय आणि असल्यास त्याना हे पसंत आहे काय याबद्दल बातमीत काही खुलासा नाहीं. कारण असें दिले आहे कीं श्री केजरीवाल यांनी जनतेची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली आहे! तेव्हा जनतेने त्याना मदत केली पाहिजे.
हे सर्व काय चालले आहे? हे श्री. अण्णा हजारे यांना पसंत आहे काय? मला शंका आहे. असें प्रकार सर्रास चालू झाले तर लोकपाल चळवळ बदनाम होईल आणि बदनामी श्री. अण्णा हजारेनाही येऊन चिकटेल. ‘देवा श्री. अण्णा हजारेना त्यांच्या मित्रांपासून वाचव’ असें म्हणण्याची वेळ आली आहे.

3 comments:

  1. अगदी योग्य आहे तुमचे विचार. त्यांचा कर त्यांनी भरायला हवा..

    ReplyDelete
  2. कर असेल तर तो त्यानीच भरायला पाहिजे! कर आहे मग भरायचा डर कशाला?:-)

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर आहे जर कर असेल तर तो भरलाच पाहिजे..

    ReplyDelete