Thursday, May 26, 2011

बालगंधर्व

हा सिनेमा मी पाहिला. बर्‍याच जणानी पाहिला असेल. सिनेमा चांगला बनवला आहे आणि बालगंधर्व म्हणून सुबोध भावे शोभून दिसले आहेत. हनुवटीवरील खळी आणि गोल चेहेरा हे साम्य उपयुक्त ठरले आहे. मात्र गंधर्वांचे मानाने भावे उंच आहेत. अर्थात सर्वच जमणे शक्य नाही. भावेनी कामहि चांगले केले आहे. आनंद भाटे यांनी गंधर्व संगीत उत्तमच गाइले आहे.
माझ्या वयाच्या माणसानी बालगंधर्वांच्या कारकीर्दीची अखेरच पाहिली, उमेदीचा काळ नव्हे. मात्र ’मखमालीचा पडदा’ या पुस्तकामुळे बालगंधर्वांच्या कारकीर्दीची बरीच माहिती मी वाचलेली होती. त्यामुळे पुन:प्रत्ययाचा अनुभव पुष्कळ मिळाला.
बालगंधर्वांचे उत्तरायुष्य फार खडतर गेले. अव्यवहारीपणा, बदलता काळ आणि त्याच्याशी जमवून घेता न येणे या कारणांमुळे त्यांच्या समकालीनांपैकी अनेकांचे असेच झाले.
बालगंधर्वांच्या काळात ते एकटेच मान्यवर स्त्री-भूमिका करणारे व उत्तम गायक होते अशी समजूत सिनेमा पाहून नवीन पिढीची कदाचित होईल. तसे अर्थातच नव्हते. गंधर्व हे best among equals म्हणता येतील. स्त्री-भूमिका व गायन या दोन्ही बाबतीत त्यांच्या उमेदीच्या काळातहि त्याना अनेक प्रतिस्पर्धी होते व त्या प्रत्येकाचे स्वतंत्र चाहतेहि होते! अनेक नाटक कंपन्यांचा तो उत्कर्षाचा काल होता.
बालगंधर्वांबरोबर प्रमुख पुरुषभूमिका करणारांना सिनेमात फारसा वाव मिळालेला नाही. गंधर्व कंपनीच्या उत्कर्षाच्या काळात, जोगळेकर, गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, मास्टर कृष्णराव, लोंढे वगरे अनेकांचा यशात मोठा वाटा होता. थिरकवा व कादरबक्ष यांचाहि होता. त्यांचा उल्लेख हवा होता.
मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक सोहळ्याला बालगंधर्व सन्मानाने उपस्थित होते. त्याचा उल्लेख आला नाही. त्यातील त्यांच्या भाषणाच्या प्रसंगावर सिनेमा संपवायला हरकत नव्हती.

1 comment:

  1. कै. बाळ सामंत यांनी कै. बालगंधर्व यांच्यावर दोन चरित्रवजा पुस्तके लिहिली आहेत, असे मला स्मरते. त्यातून बालगंधर्वांच्या एकूण चरित्रावर मोठा प्रकाश पडलेला आहे. तरी या चित्रपटाने नवीन पिढीला बाल गंधर्व कसे दिसत होते, ते कसे बोलत होते, आणि शेवटी ते कसे गायचे, याचे यथार्थ दर्शन झाले, असे वाटते. मी तो चित्रपट अजून पाहायचा आहे. तुमच्या अभिप्रायाने मला पहाण्याचा आणखी हुरूप आलेला आहे. अन्यथा आमच्या वडलांकडून नुसत्या कथा ऐकल्या होत्या.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete