Saturday, May 21, 2011

बोअरवेल आणि बालकें.

आज पुन्हा एकदा उघड्या बोअरवेलमध्ये पडून मृत्यु पावलेल्या बालकाची बातमी वाचली. गेली काही वर्षे अशा बातम्या वारंवार छापून येत असतात. मूल विहिरीत पडते मग त्याला वाचवण्याची खटपट पोलिस, सैनिक, फायरब्रिगेड, जनता सर्वांनी मिळून केली जाते. विहिरीच्या जवळ यंत्रांच्या सहाय्याने मोठा खड्डा खणून, मग विहिरीपर्यंत बोगदा करून बालकापर्यंत पोचण्याचे भगीरथ प्रयत्न होतात. TV Channels वाले धावतात. आईवडिलांच्या शोकाचे सार्वजनिक प्रदर्शन मांडले जाते. विहिरीभोवती ही.. गर्दी जमते. मुलाचे नशीब बलवत्तर असले तर ते वाचते, मग पुन्हा TV Channels वर पोलिस, सैनिक, पुढारी, सरकारी अधिकारी यांचे रीतसर दर्शन घडते. दुसर्‍या दिवशी हे सर्व आपण सगळेच विसरून जातो ते पुन्हा एखादे मूल विहिरीत पडेपर्यंत!
अशी किती मुले विहिरीत पडेपर्यंत हे असे चालणार? विहीर काही अचानक वा आपोआप बनत नाही. कोणाच्या तरी शेतात भरपूर पैसे खर्च करून, मोठे यंत्र उभे करून, काही दिवसांच्या श्रमाने ती खणली जाते. विहिरीला पाणी लागले नाही तर ती तशीच टाकून दिलेली असते. अशा टाकून दिलेल्या विहिरीतच जवळपास खेळणारी मुले पडतात. याची जबाबदारी, जमीनमालक किंवा विहीर खणणारी कंपनी यांचेपैकीच कुणाची तरी असते ना? विहिरीवर यंत्र काम करत असताना असे अपघात होणार नाहीत. काम सोडून यंत्र काढून घेऊन कंपनीचे लोक निघून गेले कीं त्यांची जबाबदारी म्हणता येणार नाही. मग विहिरीचा मालक हाच जबाबदार ठरतो. विहीर भरून टाकणे किंवा सभोवती मजबूत कुंपण वा भिंत घालणे वा विहिरीवर मजबूत झाकण टाकणे हे त्याचे काम असते. त्यात कुचराई केल्यामुळेच बालक बोअरवेलमध्ये पडण्याची वेळ येते.
आजपर्यंतच्या एकाही अशा घटनेमध्ये शेताचा वा विहिरीचा मालक पकडला गेला व त्याचेवर Criminal Negligence चा आरोप ठेवला गेला वा मेलेल्या बालकाच्या पालकांना त्याने नुकसानभरपाई दिली वा बालक वाचवण्याच्या खटपटीचा खर्च त्याचेकडून वसूल केला गेला असे काही कधीहि माझ्या वाचनात आले नाही! तुम्ही कोणी वाचले असेल तर चूकभूल द्यावीघ्यावी. भारतात मरण्यासाठी गरिबांची लेकरे हवीतेवढी आहेत मग कशाला चिंता करावी?

4 comments:

 1. मुळात हि बोरवेल्स पूर्वी कधी तरी काढलेली असतात पण तेथे कदाचित कमी पाणी लागल्या मुळे वा त्यात फक्त सिझनल पाणी असल्या कारणाने स्थानिक गावकरी ते बुजविण्याचा विचार करीत नाही तसेच आपण लोक शहरी असल्याने आपणास त्याची ती किंमत लक्षात येत नाही पण त्यांच्या दृष्टीने ते अनमोल असते. खरोखरचे जीवन... त्यामुळे नंतर त्या वर माती ढकलून ते बंद करीत नाही किंवा ते सिझनल असल्याने तसेच विजेचा वा इतर खर्च नको,कोण बसविणार म्हणून पंप बसविला जात नाही तसेच गावातून किती वेळ असते ते हि आपण सर्व जाणता व त्यातून सोयीने सुरुवातीला छोटी बादली घालून त्यातील पाणी काढावयास सुरुवात होते.व कालांतराने त्याचे तोंड मोठे होत जाते व नजर चुकीने किंवा अनावधानाने लहान मुले तेथे खेळत गेल्यास ती चुकून आत पडतात. हि सर्व वस्तीस्थिती आहे. त्यां मुळे "आईवडिलांच्या शोकाचे सार्वजनिक प्रदर्शन मांडले जाते. विहिरीभोवती ही.. गर्दी जमते. TV Channels वाले धावतात." वगैरे आपण जे म्हणता ते किती बरोबर आहे हे आता आपण नि वाचकांनी ठरवावे. हि बोअरवेल्स बर्याच वेळेला कुठल्या ना कुठल्या सरकारी योजनेतून घेतलेली असतात त्या मुळे ती कोणा एकाच्या मालकीची नसतात नि जरी त्यात ते काढल्या वर जरी त्वरित पाणी लागले नाही तरी एखाद दुसर्या सिझन नंतर त्यात वर सांगितल्या प्रमाणे कदाचित गावकर्यांना पाणी लागायची आशा सुद्धा असते हो...त्या मुळे स्वातंत्र्या नंतर ६३ वर्षांनी सुद्धा ह्या भीषण समस्येला नक्की कोण कोण जबाबदार आहे ते प्रथम विचारात घ्यावे.फडणीस साहेब आमचा आपल्या वर राग बिलकुल नाही पण ज्याचे जळते ना त्यालाच कळते. त्या मुळे अशी एकदम टोकाची प्रतिक्रियां देऊ नकाहो... एवढीच ह्या प्रसंगी आपणास विनंती...

  ReplyDelete
 2. मी काही वेगळे म्हणत नाही. कोणीतरी या दुर्घटनाना जबाबदार धरले गेले पाहिजे ना? कोणाला तरी शिक्षा व्हावयाला हवी ना? त्याशिवाय अशा घटना थांबणार कशा? सरकार याबाबत काही करताना दिसत नाही आणि कोणी आवाजहि उठवत नाही हीच तर माझी खंत आहे.

  ReplyDelete
 3. मला पडणारा प्रश्र्न या मुलांच्या आई-वडिलानी या मुलाना सुरक्षिततेचे प्राथमिक नियम का शिकविले नाहीत असा आहे.

  ReplyDelete
 4. मला वाटते कीं लहान बालके, त्यांचे आईवडील यांचे दोष काढण्यापेक्षा विहीर असुरक्षित अवस्थेत ठेवणारावर सर्व दोष ठेवला पाहिजे. जोवर त्याना जबाबदार धरून शिक्षा होत नाही तोवर अशा घटना होतच रहातील.

  ReplyDelete