Monday, August 20, 2012

अमेरिकेतील बेकायदेशीर रहिवासी आणि अमेरिकेतील दुष्काळ

अमेरिकेतील बेकायदेशीर रहिवासी

इच्छुकांची गर्दी (न्यूयॉर्क टाइम्समधील फोटो)
अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर (लाखोंनी) परदेशी (मुख्यत्वे मेक्सिकन) घुसखोर रहिवासी आहेत. त्यातील अनेक व्यक्ति अगदी लहान वयात, आपल्या आईवडिलांबरोबर, अमेरिकेत पोचलेले होते. अनेक वर्षे तीं मुले अमेरिकेत राहिलीं, शालेय शिक्षण घेतले, कित्येक जण नोकर्‍या-व्यवसायहि करत असतात. मात्र तरीहि ते बेकायदा रहिवासीच ठरतात व त्यांचे काय करायचे हा एक वादाचा मुद्दा येथे आहे.
११ वर्षांपूर्वी एक कायदा करण्याचा प्रयत्न झाला ज्यामुळे अशा व्यक्तीना अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल. तो कायदा पास होऊ शकला नाही. प्रेसिडेंट ओबामाने आपल्या ‘प्रेसिडेंट’ पदाच्या अधिकारात हल्लीच असा हुकूम काढला आहे कीं अशा व्यक्तीनी सर्व कागदपत्रांसह अर्ज केल्यास व त्या व्यक्तींच्या विरोधी काही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसल्यास त्याना दोन वर्षे पर्यंत ‘रहिवासी’पणाचा कायदेशीर हक्क दिला जाईल व त्याना तोपर्यंत उजळ माथ्याने शिक्षण नोकरी वा व्यवसाय करतां येईल. रिपब्लिकन पक्षाचा अर्थातच याला कडवा विरोध आहे. ओबामा निवडून न आल्यास हा कायदा केराच्या टोपलीत जाण्याची जवळपास खात्री आहे! त्यामुळे या नियमाचा फायदा घेण्यास कोणी पुढे येईल काय अशी शंकाच होती. कारण अर्ज करणे म्हणजे आपण ‘घुसखोर’ असल्याचे स्वतःच जाहीर करणे ठरणार! ओबामाने मेक्सिकनांच्या मतांवर डोळा ठेवून हे केले आहे अशी टीका झालीच.
नवलाची गोष्ट म्हणजे, अर्ज करण्याचा दिवस उजाडल्याबरोबर अनेक शहरांतून हजारोंच्या संख्येने अशा ‘घुसखोर’ व्यक्तीनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्याना मदत करण्यासाठी अनेक व्यक्ति व संस्थानी टेबल-खुर्च्या मांडल्या आहेत. अर्ज करणार्‍या इच्छुकांच्या मुलाखती वर्तमानपत्रे छापताहेत!
दोन वर्षांनंतर, यांतील ज्या हजारोंना, नियमानुसार, तात्पुरती माफी मिळालेली असेल त्यांचे काय होईल? ओबामा प्रेसिडेंट राहिल्यास त्याना देशाबाहेर हाकलले जाईल काय? रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आला तर त्याला तरी तसे करता येईल का? सर्व अनिश्चित आहे.
अमेरिकेतील दुष्काळ
अमेरिकेत यंदा बर्‍याच भागात पाऊस खूप कमी पडला आहे त्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम झाला असल्याच्या बातम्या वाचावयास मिळतात. ज्या राज्यांमध्ये मका (Corn) हे महत्वाचे पीक आहे त्या राज्यांत जेव्हां कणसें धरण्यासाठी पाऊस आवश्यक होता तेव्हांच नेमकी पावसाने दडी मारल्याने मक्याच्या पिकावर फार परिणाम झाला आहे. गेली काही वर्षे मका पिकवणारांना फार चांगलीं गेलीं. त्याचे कारण जरा वेगळेच आहे. सरकारी कायद्यामुळे पेट्रोल उत्पादने विकणारांवर बंधन घातलेले आहे कीं पेट्रोलमध्ये ठराविक प्रमाणात एथेनॉल मिसळलेच पाहिजे. हे एथेनॉल येथे मक्यापासूनच बनते त्यामुळे मक्याला मागणी फार वाढली व मका पिकवणारांची चांदी झाली. आता मक्याचे पीक बुडाल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.
मात्र आजची बातमी वेगळीच आहे. दुष्काळी भागात (Navajo Reservation) चार्‍याची व पाण्याची एवढी टंचायी निर्माण झाली आहे कीं तेथे घोडे बाळ्गणारांना व त्यांची निपज करणारांना त्याना संभाळतां येत नाहींसे झाले आहे. त्यामुळे घोड्यांना मोकळे सोडून देणे भाग पडत आहे व असे शेकडो-हजारो घोडे मरत आहेत! त्याशिवाय काही विशिष्ट भागात नैसर्गिकपणे मुक्त जन्मणारे व वाढणारे घोडे चार्‍या-पाणासाठी घोडे बाळगणार्‍या-वाढवणार्‍या लोकांच्या तबेल्यांमध्ये घुसूं पाहतात!
समाजकार्य करणार्या काही व्यक्ति वा संस्था घोड्यांवरच्या संकटात त्याना मदत करण्यासाठी सरसावल्या आहेत पण पैसे खर्चूनहि त्यांना चाराच मिळत नाहीं!
बातमी खूप खुलासेवार होती. सर्व हकिगत लिहितां येत नाहीं पण वाचून मन विषण्ण झाले. अमेरिकेतहि भारतासारखेच?

No comments:

Post a Comment