Monday, February 20, 2012

अमेरिकन युद्ध

अमेरिका आणि युद्ध या संदर्भात दोन बातम्या हल्ली वाचनात आल्या.
पहिली बातमी वा हकीगत होती ती खूप जुनी. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील. जपानने पर्ल हार्बर वर अचानक विमानहल्ला केला व अमेरिकन नौदलाचे खूप नुकसान केले. हे करण्यापूर्वी जपानने रीतसर युद्ध पुकारले नव्हते. हा हल्ला झल्याबरोबर अमेरिकेने जपानबरोबर युद्ध पुकारले व पाठोपाठ जर्मनी व इटालीबरोबर्हि युद्ध जाहीर केले. जपानबरोबर युद्ध जाहीर केल्यापाठोपाठ अमेरिकेने खास कायदा करून अमेरिकेतील सर्व जपानी वंशाच्या लोकांना (एक लाखाचे वर) युद्धबंदी ठरवून त्यांची उचलबांगडी करून त्याना अनेक ठिकाणी कॅंपांत हलवले व युद्ध संपेपर्यंत कोंडून ठेवले होते. यातील बहुतेक सर्व शाळकरी वा तरुण वर्ग खुद्द अमेरिकेतच जन्माला आलेला होता व अमेरिकेच्याच नियमानुसार तीं सर्वजणे अमेरिकेचीं नागरिक होतीं. त्यांचा कोणताही अपराध नसताना अमेरिकेने आपल्याच नागरिकाना खुशाल दीर्घकाळ चौकशीविना तुरुंगात डांबले होते. ही मंडळी कदाचित फितुरी करतील या भीतीने हा अन्याय त्यांचेवर केला गेला. या गोष्टीला आता साठ वर्षे होऊन गेलीं. त्यावेळी शाळेत असलेले लोक आता आजोबा-आजी झाले आहेत आणि त्यानी हा दुःखद विषय विस्मृतीत लोटला आहे. त्यांच्या पैकी एकाच्या नातीला शाळेत अमेरिकेन राष्ट्राच्या या अन्यायाचे समर्थन करणारा लेख लिहावा लागला व भाषण करावे लागले अशी बातमी होती!आजोबांकडून जुन्या हकिगती ऐकलेल्या त्या मुलीने हे कसे केले असेल याची कल्पना करवत नाही.
दुसरी बातमी सध्या चालू असलेल्या अफगाण युद्धासंदर्भात होती. युद्ध हे सैन्य, आरमार, नौदल, विमानदळ, तोफखाने यांचे काम असे आपण समजतो व युद्धभूमीवर सर्व कामे सैन्यदलेच करतात व इतराना (वृत्तप्रतिनिधी सोडून)प्रवेश नसतो अशीहि आपली समजूत असते. अमेरिका हे युद्ध असे लढत नाही! युद्धभूमीवरील अनेक कामे कॉण्ट्रॅक्ट पद्धतीने चालली आहेत! सैन्यदलाकडून कंत्राटे घेणार्‍या कंपन्या, अमेरिकन, इतरदेशीय वा अफघाणी लोकाना नोकरीवर ठेवून कामे करवून घेताहेत! यामध्ये दळणवळण, जेवणखाण, सुरक्षा अशा अनेक कामांचा समावेश आहे. काही उच्च दर्जाच्या अधिकार्‍यानी स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेसाठीहि Contracts दिली आहेत. बातमीत लिहिले होते कीं युद्धभूमीवर प्रत्यक्ष सैन्यदलाच्या माणसांपेक्षाहि अशा कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांची माणसे जास्त प्रमाणावर आहेत! साहजिकच युद्धात प्राणांला मुकणारांमध्येहि सैनिकांपेक्षा त्यांचेच प्रमाण जास्त आहे! कंत्राटी नोकराचा मृत्यु झाला तर अमेरिकन नोकराला कायद्याप्रमाणे आवश्यक ती नुकसानभरपायी मिळते. तो अफघाणी असला तर मात्र त्याची थोडक्यावरच बोळवण होते. अशाच एका अफगाणी ड्रायव्हर बाबत बातमी होती कीं त्याचा मृत्यु झाला तेव्हा आई-वडिलांना कायद्याप्रमाणे भरपाई मिळाली नाही. त्या कंपनीने हे अर्थात नाकारले होते व आम्ही दीर्घकाळपर्यंत त्याना ठराविक रक्कम दर पंधरवड्याला देणार आहोत असे जाहीर केले. युद्ध संपून अमेरिकन सैन्य व कंत्राटदार परग गेल्यावर हे पेन्शन चालू राहील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिका आता Drones चा वापर सर्रास करते आहे हेहि आपणास माहीत आहे. अमेरिकेचे अफघाण युद्ध हे असे outsourcing ने चालले आहे.

5 comments:

  1. ithehi outsourcing... great idea aahe ... baki "tya" japanyanch vait vatat. pan parl harbour var US nech halla kela hota mhane ?

    ReplyDelete
  2. हे आपण कोठे वाचले? माझ्या हे कोठेहि वाचनात आलेले नाही.

    ReplyDelete
  3. विजय देशमुखांच्या या मताच्या संदर्भात माझ्याकडेही काही माहिती आहे. तुमचा gmil ID असेल, आणि तुम्हाला वेळ असेल तर या विषयावर एकदा बोलूयात.

    ReplyDelete
  4. जरूर बोलूं. मी सध्या अमेरिकेत आहे. skype वर बोलता येईल. माझा ई-मेल पत्ता pkphadnis@yahoo.com हा आहे. याहू मेसेंजरवरहि बोलता येईल

    ReplyDelete
  5. पर्ल हार्बरवर अमेरिकेनेच हल्ला केला ही निव्वळ भाकडकथा आहे.

    ReplyDelete