Monday, February 6, 2012

अमेरिका आणि परदेशी विद्यार्थी

अमेरिका आणि परदेशी विद्यार्थी
अमेरिकन कॉलेजांत शिकण्यासाठी अनेक देशांतून विद्यार्थी येतात. तसेच Cultural Exchange नावाखाली अनेक विद्यार्थी सुटीच्या कालात अमेरिकेत येतात. याबाबत दोन बातम्या वाचनात आल्या.
Cultural Exchange Program नावाखाली अनेक देशांचे विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत अमेरिकेत येतात. त्यानी सुट्टीत येथे काही काम करावे, चार पैसे मिळवावे, देश पहावा, इतर भाषा बोलणार्‍या, इतर देशातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध यावा व अनुभव-विश्व संपन्न करावे असा स्तुत्य हेतु या उपक्रमामागे सुरवातीला तरी होता. मात्र हे स्वरूप कायम रहातेच असे नाही असे हल्लीच दिसून आले. देशाचे नाव बातमीत दिसले नाही पण त्या देशातून अनेक विद्यार्थी या उपक्रमा-अंतर्गत अमेरिकेत आले होते. त्यासाठी त्यानी हजारो डॉलर रक्कम आगाऊ भरली होती. मात्र अमेरिकेत आल्यावर त्याना हर्शे नावाच्या प्रसिद्ध चॉकोलेट कंपनीच्या कारखान्यात भरती करण्यात आले. पगार खूप कमी, काम जड पॅकिंग केसेस हाताळण्याचे, कामाचे तास भरपूर, रहाण्याच्या सोयी जेमतेम, पगारातून खाण्यापिण्याचे व रहाण्याचे खर्च कापून घेतल्यावर हातात फारसे काही उरत नव्हते त्यामुळे आधीच स्वतः केलेला खर्च कसाबसा भरून निघाला म्हणजे मिळवली आणि Culchural Exchange कसलीच नाही असा एकूण प्रकार अनुभवाला आल्यामुळे अखेर चिडून जाऊन हे विद्यार्थी संपावर गेले. त्यानंतर आता या पिळवणुकीवर नियंत्रण आणले जात आहे. ज्या संस्थेतर्फे हे काम चालले होते त्या संस्थेची मान्यता काढून घेतली गेली आहे.
दुसरी बातमी वॉशिंग्टन स्टेट मधील सरकारी कॉलेजची होती. आर्थिक तंगीमुळे सरकारी ग्रॅंट कमी झाल्या आहेत. परदेशी विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढते आहे पण त्याना दामदुप्पट फी भरावी लागते. त्या उत्पन्नाच्या जोरावरच स्टेटमधील गरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देता येते. स्टेट बाहेरच्या विद्यार्थ्यानाहि परदेशी विद्यार्थ्यांप्रमाणेच जबर फी भरावी लागते आहे. तरी देखील परदेशातून, विषेशतः चीनमधून येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे. चीनमध्ये विद्यार्थी मिळवण्याचे काम काही कमिशन एजन्सी करताहेत त्याना खर्च देऊन, प्रवास व रहाण्याचा खर्चहि सोसून विद्यार्थी येतातच आहेत. म्हणजे एकप्रकारे वॉशिंग्टन स्टेटमधील गरीब विद्यार्थ्यांचा खर्च चीन सोसत आहे! जागतिकीकरणाचा असाहि एक परिणाम.
भारतातून अमेरिकेत कॉलेज शिक्षणासाठी (एन्जिनीअरिंग किंवा मेडिकल नव्हे) येणार्‍या विद्यार्थ्यांचेहि प्रमाण वाढत असल्याचे वाचलेले होते. याउलट आफ्रिकन वा इतर देशातून भारतातहि अनेक विद्यार्थी येतात त्याना भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा जबर जास्त फी व खर्च भरावा लागतो काय कल्पना नाही. खासगी कॉलेजांमध्ये तसे नक्कीच होत असणार.

2 comments:

  1. आफ्रिकन वा इतर देशातून भारतातहि अनेक विद्यार्थी येतात त्याना भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा जबर जास्त फी व खर्च भरावा लागतो काय कल्पना नाही. - उत्तर होय असा आहे - काही ठिकाणी ५ पट तर काही ठिकाणी १० पट देखिल पाहण्यात आलं आहे ! पुणे विद्यापीठात देखिल वेगवेगळे शुल्क आहे

    ReplyDelete
  2. परदेशी कशाला महाराष्ट्राबाहेरचे विद्यार्थ्यांना पण donation च्या नावाखाली खूप पैसा भरावा लागतो

    ReplyDelete