Thursday, October 6, 2011

दसरा आणि रावण दहन

दरवर्षीप्रमाणे या वर्षीहि दसरा आला आणि दिल्लीमध्ये आणि इतरत्रहि रावणाच्या प्रतिमांचे समारंभपूर्वक दहन झाले. हे वर्षानुवर्षे चालले आहे पण दसरा आणि रावणवध यांचा काही संबंध आहे काय? मुळीच नाही!
राम वनवासाला गेला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता. रावणवधानंतर राम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आला तेव्हांहि ग्रीष्म ऋतुच चालू होता. रावणाचा वध चैत्र महिन्यात झाला होता हे वाल्मिकि रामायण (मराठी भाषांतर) वाचल्यावर सहजच स्पष्टपणे दिसून येते. रावणवध व सीताशुद्धि नंतर दशरथ प्रगट झाला व त्याने रामाला ’तुझी वनवासाची चौदा वर्षे पुरी झाली आहेत व रावणहि मारला गेला आहे तेव्हां तूं आता अयोध्येला परत जा’ असा आदेश दिला असे रामायणातच लिहिले आहे. तिकडे भरतहि चौदा वर्षे पुरी होऊन वचन दिल्याप्रमाणे आता राम येईल अशी वाट बघत होता. त्याप्रमाणे राम परत आलाच. वनवास ग्रीष्मात सुरू झाला तर चौदा वर्षे पुरी होतानाहि ग्रीष्मच होता. मग रामाने विजयादशमीला रावणवध कसा केलेला असेल? शक्यच नाही.
रावणाने सीतेला नेले तेव्हा शिशिर ऋतू चालू होता. ते वर्ष वालीवध सुग्रीव मैत्री यात गेले. मग सर्व पावसाळा रामाने किंश्किंधे जवळच्या गुहेत व सीतेने लंकेत काढला. पावसाळ्या नंतर हनुमानाने सीतेला शोधले, मग पुढच्या पावसाळ्या पूर्वीच सेतू बांधून वानरसैन्य व राम-लक्ष्मण लंकेत पोचले. दोनेक महिने युद्ध चालून पावसाळ्यापूर्वी रावणवध झाला. पावसाळाभर युद्ध चालून मग विजयादशमीला रावणवध झालेला नाहीं. सीतेला दुसरा पावसाळा लंकेत काढावा लागलेला नाहीं!
रामायणातील हे सर्व काल-उल्लेख असे स्पष्ट दर्शवतात कीं चौदाव्या वर्षाच्या अखेरीला पावसाळ्यापूर्वी रावणवध झाला. तेव्हा रावणवध व विजयादशमी यांचा काहीहि संबंध नाही.
तरीहि बिचारा रावण दरवर्षी विजयादशमीला समारंभपूर्वक व मंत्री-पुढारी-परदेशी पाहुणे यांच्या उपस्थितीत मरतो आहे वा जाळला जातो आहे!
उत्तर भारतातील या प्रथेचे मूळ कशात आहे, कोणी खुलासा करील काय? दक्षिण भारतात अशी प्रथा नाहीं हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

5 comments:

  1. तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न मांडला आहेत.

    माझे मत अभ्यासावर नाही फक्त अंदाजावर आधारित आहे हे आधीच सांगते - त्यामुळे चूक असू शकते त्यात.

    दसा-याचा संबंध फक्त रावण दहनाशी आहे अस वाटत नाही .. जरी आज तो प्रामुख्याने तसा असला तरी! इंद्राचा वृत्तासुरावर विजय, पांडवांचा अज्ञातवास पूर्ण होणे. महाभारत युद्धाचा आरंभ, सुगी ..दुर्गा प्रतिमेचे विसर्जन .. अशा अनेक गोष्टींशी तो जोडलेला आहे.

    जुन्या काळी कदाचित रामाच्या विजयाची बातमी अयोध्येपर्यंत पोचायला वेळ लागला असेल. शिवाय अशा बातम्यांची खातरजमा करून विजायोत्सावाचा आदेश राजा देत असे - त्याला वेळ लागला असणार.

    शोधात राहीन .. काही नवे सापडल्यास तुम्हाला कळवेन.

    ReplyDelete
  2. पांडवांचा अज्ञातवासहि ग्रीष्मऋतूतच संपला. दसर्‍याला नव्हे! हाहि एक गैरसमजच आहे.

    ReplyDelete
  3. कौरव-पांडव युद्धहि दसर्‍याला नव्हे तर मार्गशीर्ष प्रतिपदेला सुरू झाले.

    ReplyDelete
  4. आता कॅलेंडर बदलले आहे का आपले? कारण ज्या गोष्टी तुम्ही 'नाही' म्हणून सांगत आहात - त्या तशा असल्याचे वाचल्याचे आठवतेय. पण अर्थातच माझे वाचन या दृष्टिकोनातून नव्हते .. आता पुन्हा वाचताना ही बाब लक्षात घेऊन वाचेन.

    ReplyDelete
  5. रामायण महाभारतातील काल दर्शक उल्लेख स्पष्ट आहेत, संशयाला जागा नाहीं. रावण वध वा भारतीय युद्ध, दोन्हीचाही विजया दशमीशी संबंध नाहीं.

    ReplyDelete