Friday, November 16, 2012

धान्य कोठारे कीं मृत्यूचे सापळे?

अमेरिकेत अनेक प्रकारच्या धान्यांचे उदंड पीक येते. माणसाना वा पशूना खाण्यासाठी तसेच एथॅनॉल बनवण्यासाठी (कॉर्नपासून) त्याचा उपयोग होतो. मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी अमेरिकेत Silos चा वापर केला जातो. यामध्ये धान्य सुटे (बॅगेमध्ये न भरतां) साठवले जाते. ही कोठारे तेलाच्या टाक्यांसारखी गोल पण खूप उंच असतात.ती बहुतेककरून जाड लोखंडी पत्र्याचीं असतात. वरच्या छपरातून गोल दरवाजाने यांत्रिक पद्धतीने धान्य आत टाकले जाते. तळाला असलेल्या दरवाजातून ते हवे तेव्हा काढून घेता येते. तळाला, धान्य दरवाजाकडे ढकलण्यासाठी चरकासारखी यंत्रणा असते व बाहेर पडणारे धान्य Conveyor ने बॅगिंग मशिनकडे वा सुटे घेऊन जाण्यासाठी ट्रककडे नेले जाते. मनुष्यबळ कमी व महाग असल्यामुळे सर्वत्र यांत्रिकीकरणावर भर असतो. हे सर्व छानच आहे. मात्र अनेक ठिकाणी अपघात होऊन माणसे मृत्युमुखींहि पडतात. शेतकर्‍यांच्या स्वतःच्या शेतावर असलेल्या अशा कोठारांवर त्यांची शाळकरी मुले वा इतरहि अल्पवयीन मुले कामाला लावली जातात. कोठारांच्या भिंतींमध्ये तळाला व इतर ठिकाणीहि आत शिरण्यासाठी छोटे दरवाजे असतात. त्यातून आत शिरणे प्रौढ माणसास अवघड असते म्हणून ते काम मुलांवर ढकलले जाते. खरेतर अशावेळी आतील सर्व यंत्रणा पूर्णपणे बंद करणे उघडच आवश्यक आहे. मात्र यातहि हेळसांड होते. तळाशी असणारी गोल फिरणारी चक्की काही वेळा अचानक सुरू होऊन अपघात होतात. मात्र दुसरा अपघातांचा प्रकार जास्तच भीषण असतो. तो असा. कोठारात धान्य वरपर्यंत भरले गेले कीं ते दाबामुळे घट्ट झालेले असते. मग खालून काढून घ्यायला सुरवात केली कीं तळचे धान्य बाहेर पडून कधीकधी पोकळी निर्माण होते. वरच्या भागात घट्ट दाबले गेल्या धान्याचा घुमट तयार झालेला असतो व त्यामुळे धान्य खाली पडून बाहेर येणे बंद होते. कधीकधी धान्य भिंतीला चिकटून राहते व खाली पडतच नाही त्यामुळे फक्त मध्यभागी तळाला खड्डा होतो. अशा वेळी भिंतीतल्या दरवाजातून आत जाऊन काठ्यानी ढोसून वा इतर मार्गाने भिंतीला चिकटलेले धान्य मोकळे करून किंवा घुमट फोडून धान्य तळावर खाली पाडून मोकळे करावे लागते. अशा वेळी कधीकधी कडेचे धान्य जोराने खाली घसरून वा घुमट अचानक पूर्ण मोडून सर्व धान्य कोसळते व खाली कामासाठी शिरलेली व्यक्ति (प्रौढ वा मुले) धान्याखाली अडकून गुदमरून मरतात! त्यांच्या नाकातोंडात धान्य जाते,कधीकधी फुप्फुसांपर्यंतहि जाते! अपघात झाल्याचे बाहेरच्याना कळले तरी खालून धान्य हातानी काढून अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यास बराच वेळ लागतो व अनेकदां मृत देहच हाती लागतो. शाळाना सुटी असते त्या काळात अनेक मुले अल्प वेतनावर, चार पैसे मिळवण्यासाठी, शेतावर काम धरतात. शेतकर्‍यांची स्वतःचीं मुलेंहि अशी कामे करतात. मृत्यु दोन्हीमध्ये फरक करत नाही! खरे तर अल्पवयीन मुलांना अशा कामावर जुंपणे बेकायदेशीर आहे. मात्र स्वतःच्या मुलांना शेतावर कामाला लावणे कायदेशीर आहे! अर्थात अशा धोक्याच्या कामावर लावणे गैरच. २०१० साली असे २६ मृत्यु झालेले वाचून मला फार खेद वाटला. कायदे जास्त कडक करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध होतो हे त्याहून खेदकारक. कोठाराच्या वरच्या दरवाजातून एक दोरी सोडून, ती आत शिरलेल्या मुलाच्या कमरेला बांधली तर अपघात झाला तरी त्या दोरीच्या सहायाने मुलाला तुलनेने लवकर मोकळे करून ओढून वर घेणे शक्य होईल व जीव वाचेल. मात्र येवढेहि होत नाही. अमेरिकेत सर्व काही छान आहे असा गैरसमज असणारानी असे प्रकारहि ध्यानात घ्यावे असें मला वाटते.

4 comments:

 1. बरेचदा हे काय सवयीचेच काम आहे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि अपघात घडतात. :(:( अश्या प्रकारच्या धान्य गोदामात ( वरुन इतका प्रचंड दाब येत असल्यामुळे ) ठोस उपाय योजना असायलाच हवी. मायदेशी साखरकारखान्यात अशाप्रकारे दबून बरेच लोक मृत्युमुखी पडतात.

  ReplyDelete
  Replies
  1. साखर कारखान्यांमधले अपघात इतर कारणांमुळे होत असावे. साखर साठवण्यासाठी अशा प्रकारचे Silos असल्याचे माझ्या माहितीत नाही. भारतात साखर तयार झाल्यावर ती गोणत्यात भरून गोदामांत साठवली जाते. मी स्वतः साखर कारखान्यांचे काम केलेले आहे त्या माहितीच्या आधारे मी असे म्हणतो आहे. साखर 'सुटी' साठवणे संभवत नाही.

   Delete
 2. वेगळ्या विषयावरील लेख आवडला.

  ReplyDelete
 3. sir this is very interesting and informative subject.Thank you!!!

  ReplyDelete