Sunday, April 22, 2012

पॉल लोरेमची कथा.

जगामध्ये गुणवत्ता सर्वत्र असते पण संधि मात्र थोड्यानाच मिळते. पॉल लोरेम हे या अनुभवाचे उत्तम उदाहरण आहे. असे अनेकानेक लोरेम भारतात सर्वत्र विखुरलेले असतात व कधीकधी त्यांच्यातल्या एखाद्याला लोरेमसारखी संधि मिळते पण क्वचित! लोरेम आत्ता २५ वर्षांचा आहे. दक्षिण सुदान मधल्या एका विजेचे दर्शनहि न झालेल्या खेड्यातला आणि वर अनाथ! त्याचे मायबाप कधी शाळेत गेलेले नव्हते. एका रेफ्यूजी कॅंपात तो असाच वाढला. पण आज तो अमेरिकेतील प्रख्यात येल युनिव्हर्सिटीत पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. हे कसे घडले हीच त्याची कथा. ही बातमी न्यू यॉर्क टाइम्समध्ये देणार्‍याने त्याची मुलाखत येल कॅंपस मध्ये घेतली तेव्हा तो अतिशय नम्रपणे म्हणाला, 'माझे अनेक मित्र असे होते कीं ते माझ्यासारखेच गुणी होते त्याना माझ्यासारखी संधि मिळाली नाही. माझी एकच इच्छा होती कीं त्यानाही शिक्षणाची संधि मिळावी.' लोरेमचे घराणे गुरे बाळगणारांचे. सुदानच्या आग्नेय भागातील या दुर्गम प्रदेशाची परिस्थिति आपल्या आदिवासी भागांपेक्षा वेगळी नाही. शाळा वा आरोग्याच्या सोयी मुळीच नाहीत, जवळचा पक्का रस्ता काही दिवस पायी चालल्यावर भेटणार. त्यात भर म्हणून सुदानमध्ये अनेक वर्षे उत्तर-दक्षिण घोर यादवी युद्ध चालले होते. वयाच्या ५ व्या वर्षी लोरेमला क्षयाने ग्रासले. त्याचा जीव वाचावा म्हणून त्याच्या मायबापानी त्याला उत्तर केनिया या परदेशातील 'काकुमा अनाथ कॅंप' मध्ये नेऊन सोडले आणि परत आल्यावर दोघे मरूनहि गेलीं! लोरेम त्या कॅंपात त्याच्यासारख्या इतर मुलांच्यात वाढला. पण या इतर मुलानीच त्याला शाळेत घातले. शाळा कशी असेल त्याची आपण सहज कल्पना करूं शकतों कारण आपल्या मागास भागातल्या शाळा तशाच असतात. पण लोरेमला त्याच्या नशिबाने एक मिशनर्‍यांची छोटीशी लायब्ररी मिळाली आणि त्याने त्यातील सगळी पुस्तके अधाशासारखी वाचली! त्याच्या शिक्षकाना त्याचे फार प्रेम व अभिमान. त्यानी खटपट करून त्याला केनियातील एका ७वी-८वी च्या शाळेत पाठवले कारण तेथे त्याला हायस्कूलच्या प्रवेश परीक्षेला बसता येईल! अडचण एकच होती कीं ती परीक्षा 'स्वाहिली' या केनियातील भाषेत घेतली जाई आणि ती भाषा लोरेमला येत नव्हती पण त्याने हार मानली नाही. खडतर प्रयत्नांती परीक्षेत केनियाच्या त्या विभागातून तो दुसर्‍या क्रमांकाने पास झाला! त्याला केनियाची राजधानी नैरोबी येथील एका नावाजलेल्या आणि वसतिगृहाची सोय असलेल्या शाळेत प्रवेश व शिष्यवृत्ति मिळाली. नंतर दक्षिण आफ्रिकेतील 'African Leadership Academy' मध्ये त्याचे शालेय शिक्षण पुरे झाले. शाळेच्या शेवटच्या वर्षी दीर्घ प्रवास करून तो आपल्या जन्मगावी गेला आणि खटपट करून त्याने आपल्या लहान भावंडाना, ज्या कॅंपात तो वाढला तेथे पाठवले कां कीं तेथे त्यानाहि शिक्षण मिळेल! आता त्याला येल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश व शिष्यवृत्ति मिळाली आहे. मात्र शिक्षणाची भाषा इंग्रजी, जी त्याची पांचवी भाषा आहे! (इतर तीन आफ्रिकन व चौथी अरेबिक!) पण त्याने इतक्या अडचणींवर अद्याप मात केली आहे कीं हा अडथळाही तो सहज पार करील अशी येलमधील त्याला प्रवेश देणारांची खात्री आहे. बाळपणापासून अमेरिकेचा व्हिसा मिळेपर्यंत ज्या अनेकानी त्याला मदतीचा हात दिला त्या सर्वांचे ऋण तो मानतो. आपण त्याला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. त्या भरभरून देऊंया.

1 comment:

  1. रोचक माहिती. पण अशी 'एकाला' संधी मिळते तेव्हा ती किती लोकांना नाकारली गेलेली असते, याचही भान येत!

    ReplyDelete