Saturday, June 4, 2011

भ्रष्टाचार्‍याना फाशी द्या!

हा काय खुळेपणा आहे? भ्रष्टाचाराला पुरेशी शिक्षा कायद्यात सांगितलेली नाही म्हणून भ्रष्टाचार बोकाळला आहे काय? मोठा भ्रष्टाचार कोण करतात?, सरकारी अधिकारी, राजकारणी, उद्योगपति वगैरे उच्चशिक्षित, प्रतिष्ठित व्यक्तिच. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले आणि त्याना ८-१० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली आणि ती वरच्या कोर्टात रद्द झाली नाही, त्याना पॅरोल नाकारला तर त्यांची पुरेशी बेअब्रू होणार नाही काय? शिक्षेचे प्रमाण सध्या कमी असेल तर ते खुशाल वाढवा, जितक्या रकमेचा भ्रष्टाचार सिद्ध होईल त्याच्या पांचपट दंडाची तरतूद ठेवा, दंड न भरल्यास शिक्षा आणखी ५ वर्षानी वाढवा, भ्रष्टाचाराच्या गुन्हेगाराला पॅरोल मुळीच मिळणार नाही असा नियम करा. मुख्य प्रष्ण शिक्षेच्या प्रमाणाचा नसून, गुन्हा कोर्टात सिद्ध होण्याचा आहे! त्यावर काही तोडगा निघेल काय? सरकारी अधिकार्‍याच्यावर आरोप झाले तर तपासणी करण्यासाठीहि परवानगी लागते ती आधी बंद करा! राम जेठमलानीना कोणाही भ्रष्टाचार्‍याची केस लढवण्याची बंदी करा! जेवढा आरोपी मोठा तेवढे मोठे वकील त्याच्यापुढे पुढे हात जोडून (आणि पसरून)उभे!
बलात्काराला फाशी, भ्रष्टाचाराला फाशी, हा शुद्ध आचरटपणा आहे. भारतात सध्या खुनासारख्या भयंकर गुन्ह्यालाही rarest of rare case मध्येच फाशीची शिक्षा देता येते. जगात बर्‍याच देशांमध्ये फाशीची शिक्षाच नाही. जगात जनमत फार मोठ्या प्रमाणावर फाशीविरोधात आहे. अशा परिस्थितीत भ्रष्टाचाराच्या व बलात्काराच्या गुन्ह्याना फाशीची शिक्षा कायद्यात अंतर्भूत व अनिवार्य केली तर कोर्टांमध्ये हे गुन्हे सिद्ध होणारच नाहीत, सिद्ध झाले तरी फाशीची शिक्षा न्यायाधीश देणार नाहीतच !(किती रकमेच्या भ्रष्टाचाराला फाशीची शिक्षा?) स्वराज्य मिळाल्यापासून अद्यापपर्यंत किती लोकाना भ्रष्टाचारासाठी मोठी शिक्षा झाली आणि गुन्हेगार खरोखरी तुरुंगात बसले?
प्रश्न शिक्षेच्या प्रमाणाचा मुळीच नाहीं. गुन्हे सिद्ध कसे होणार हा आहे. सगळ्यासाठी फाशी हा नुसता बोलघेवडेपणा आहे! मागे अडवाणीसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने बलात्कारासाठी फाशी मागितली होती, आतां रामदेवबाबा भ्रष्टाचारासाठी मागताहेत. सगळे एकाच माळेचे मणी !

2 comments:

  1. जगातल्या ज्या देशांत फाशीची शिक्षा नाही त्या देशांतली परिस्थिती फार वेगळी आहे. तिथे कायद्‌याचा आदर राखल्या ज़ातो. कितीही मोठ्या कैद्‌याला ते अर्थव्यवस्थेवर फार भार न पडता तुरुंगात डांबू शकतात. आपल्या इथे असे कैदी फरार होण्याची भीतीच फार. त्यांना सोडण्यासाठी विमान पळवणे, ओलीस राखणे अशा घटना भारतात खूप घडतात. याचा अर्थ फाशीच्या शिक्षेबाबत मी उत्साही आहे असा नाही. पण 'जेठमलानींवर बन्दी घाला' हा तुमचा उपाय 'बोलघेवडेपणा' सदरात येत नाही काय? ती बन्दी घालणार कशाच्या आधारावर?

    गुन्हे न्यायालयात सिद्‌ध होत नसतील तर शिक्षेचे इतर प्रकार शोधले ज़ातील, सुष्टांतर्फे आणि दुष्टांतर्फेही. दुष्ट तर यात तरबेज़ असतातच. सुष्ट काय करणार, हा प्रश्न असतो. खंडोजी खोपड्याचा हात तोडला की इतरांना आपोआपच धाक सुटतो. एक कल्पना करू की ४-५ अतिभ्रष्टाचारी आणि प्रसिद्‌ध लोकांना सैन्यानी सरळ गोळ्या घातल्या आणि पन्तप्रधान-राष्ट्रपती-सैन्यप्रमुख कोणीतरी दूरदर्शनवर बातमी दिली की 'आम्ही असे केले आहे, तुम्ही करायचे आहे ते करा' तर त्याचा बराच परिणाम होईल. असा एकतर्फी निर्णय सरकारला घेता येतो; उदा. सुवर्णमन्दिरातले ऑपरेशन ब्लू-स्टार. आणिबाणीत अनेक निन्दनीय गोष्टी घडल्या असतील, पण भ्रष्टाचार खूपच आटोक्यात होता. सरकारी नोकर २ वाज़ता सुट्टी सम्पत असेल तर १:५८ पर्यंत आत शिरायला चहाचा कप अर्धा सोडून पळत. पण कोणालाच कशाचाच धाक नाही, अशी आज़ परिस्थिती आहे.

    ReplyDelete
  2. मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय.

    ReplyDelete