Friday, March 1, 2013

प्लेनव्ह्यू गावाची कहाणी.

टेक्सास राज्यातील प्लेनव्ह्यू नावाच्या लहानशा शहराची ही कहाणी आहे. गावाची लोकसंख्या २२३४३. या गावात उपजीविकेचे मुख्य साधन म्हणजे मांस खाद्यपदार्थ बनवणार्‍या एका कारखान्यात नोकरी. गावातील २,३०० लोक या कारखान्यात प्रत्यक्ष नोकरी करणारे. त्यांची कुटुंबीय मंडळीहि अप्रत्यक्षपणे कारखान्यावरच उदरनिर्वाहासाठी अवलंबून व गावातील अनेक छोटेमोठे व्यवसाय, शाळा इत्यादि देखील या कुटुंबांवरच अवलंबून अशी गावाची परिस्थिति. कित्येक कुटुंबे २-३ पिढ्यांपासून या कारखान्यातच काम करतात. यात अर्थातच अनेक लोक मेक्सिकन-अमेरिकन आहेत. हा कारखाना या गावात निघाला याचे कारण गावाजवळून जाणारा मोठा Interstate रस्ता आणि टेक्सास राज्यात पूर्वीपासून जोरात चालणारा पशुपालनाचा व्यवसाय. हा व्यवसाय दूध उत्पादनासाठी नव्हे तर मांस निर्मितीसाठीच केला जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे कारखान्याला कच्च्या मालाचा पुरवठा भरपूर होता. मात्र गेली काही वर्षे या भागात पाऊस फार कमी झाला आहे. त्यामुळे गवत आणि पशुखाद्याची टंचाई भासू लागली आहे व त्याचा पशु उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गुरे बाळगणे, त्यांची पैदास हे परवडत नाहीसे झाले आहे. अनेक Ranch मालकानी गुरे विकून टाकून व्यवसाय बंद केला. त्यामुळे या कारखान्याकडे येणारा जनावरांचा ओघ आटला आहे. जनावरेच आली नाहीत तर कत्तल कोणाची करणार व मांसपदार्थ कसे निर्माण करणार असा प्रश्न कारखान्या भेडसावू लागला. परिणामी या महिन्यात कारखाना पूर्णपणे बंद झाला आहे. शेवटच्या काही दिवसांचा पगार देऊन झाला कीं संपले! वर्षाला कारखान्यातून पगार रूपाने गावात येणारा १६ मिलियन डॉलरचा ओघ बंद झाला आहे. कारखाना चालवणारी कंपनी काही लहान नाही. तिचे इतर शहरातहि असेच कारखाने आहेत. जमले तितक्या लोकाना कंपनीने इतर ठिकाणी सामावून घेतले आहे हे खरे. पण अनेक कुटुंबांतून पेचप्रसंग उभे राहिले आहेत. ज्या घरातील सगळीच माणसे अनेक वर्षे येथेच कामाला होती त्या घरातील काहीना नवीन ठिकाणी घेतले आहे पण जाणाराना नव्या गावात सर्वच नवीन जम बसवायचा आहे आणि ज्याना ती संधि नाही त्यानी सद्ध्याच्या ठिकाणी निर्वाह कसा करायचा असा प्रश्न उभा आहे. शाळकरी मुले गाव सोडून गेली तर शाळांवरही विपरीत परिणाम होणार कारण मिळाणारी ग्रॅंट घटणार. गावाची वस्तीच अर्ध्यावर आली तर गावातील दुकानदारी व इतर व्यवसायहि ठ्प्प होतील अशी भीति आहे. कारखाना चालवणारी कंपनी म्हणते कीं आम्ही अनुकूल परिस्थिति आली तर कारखाना पुन्हा सुरू करूं. पण गुरे विकून टाकून व्यवसाय बंद केलेल्या लोकानी पुन्हा पशुपालन सुरू करून काही काळ गेल्यानंतरच कारखान्याला पुरेसे प्राणी मिळू लागतील. ‘गुरेच मिळाली नाहीत तर आम्ही काय कापावे?’ असे कारखान्याचे मॅनेजर म्हणतात, तेहि खरेच आहे. अर्थात ‘कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद होऊ दिला जाणार नाही’ अशा राजकीय घोषणा देणारे तेथे कोणी नाहीत!

2 comments:

  1. स्वयंपूर्ण गावे टिकविण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही वर्षे कमी पाऊस पडल्याने गावे ओसाड पडणे हे आपल्याकडे ऐकून होतो. अमेरिकेतही ही स्थिती आहे हे वाचून खंत वाटली. बाकी अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. न्यूयॉर्क टाइम्स मधील सविस्तर बातमीच्या आधारे लिहिले आहे. अभ्यास वगैरे काही नाही. भारतापेक्षा एक वेगळे जग अशा बातम्यांतून दिसते ते वाचकांपुढे उलगडतो एवढेच.

      Delete