Friday, January 11, 2013

पुन्हा एकदां दाभोळ

या ब्लॉगवर पूर्वी एन्रॉन या नावाने सुरू झालेल्या व नंतर केंद्रसरकारकडे हस्तांतरण झालेल्या दाभोळजवळील विद्युन्निर्मिति व गॅसआयात प्रकल्पाबद्दल लिहिले होते. खरे तर हा प्रकल्प दाभोळ येथे नाहीच! दाभोळ गाव व बंदरहि राहिले वासिष्ठी नदीच्या उत्तर तीरावर. हा प्रकल्प नदी (खाडी)च्या दक्षिण तीराच्याहि थोडा दक्षिणेला काही अंतरावर समुद्रकिनारी आहे. अनंत अडचणींनंतर येथे विद्युतनिर्मिति व्यवस्थित होऊं लागली मात्र त्यासाठी रिलायन्स प्रकल्पातून नैसर्गिक वायु पुरेसा मिळत नाही. परदेशातून द्रवरूप गॅस आयात करण्यासाठी सुरवातीपासूनच येथे समुद्रात दूरवर जेटी बांधून गॅस घेऊन येणारी जहाजे लागूं शकतील असे बंदर बांधण्याची योजना होती. काही महिन्यांपूर्वी ही जेटी, पाइपलाइन व इतर सोयी तयार होऊन गॅस आयात सुरू होणार अशा बातम्या आल्या तेव्हा मी या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले होते. मात्र पहिलेच जहाज लागताना काही दुर्घटना घडून मोठी दुरुस्ती करण्याची पाळी आली. आता ती पुरी होऊन गॅस आयात सुरू होणार आहे असे आज वाचले मात्र गॅस महाग आहे या कारणास्तव त्याचा येथे विद्युत निर्मितीसाठी वापर होणार नाही. मग गॅसचे काय होणार? तर प्रकल्पापासून गोवामार्गे बंगलोरपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. गॅस गोवा व कर्नाटकात जाणार व गॅसवर आधारित खत व इतर प्रकल्प उभे राहणार आहेत. छान आहे. बम्दर महाराष्ट्रात पण गॅस राज्याबाहेर! या गॅसवर आधारित एकहि प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचे कोठेहि वाचनात आलेले नाही. महाराष्ट्राची जनता व राज्यकर्ते झोपलेले आहेत ना! बंदर कर्नाटकात झाले असते तर सर्व गॅस महाराष्ट्रापर्यंत आला असता काय? एके काळी मुंबईजवळील ‘बॉम्बे हाय’प्रकल्पाचा बहुतेक सर्व गॅस असाच हाजिरा पासून उत्तरप्रदेशापर्यंत पाइपलाइन टाकून तिकडे गेला. महाराष्ट्राला फक्त थळ-वायशेत हा एकच प्रकल्प मिळाला. (तोहि स्थानिकांच्या विरोधामुळे जाणार होता.) उरण पर्यंतहि पाइपलाइन आली व एक खतप्रकल्प झाला पण उरणचा गॅसपासून वीज निर्मितीचा प्रकल्प मात्र गॅस मिळत नसल्यामुळे कधीच पूर्ण क्षमतेने चाललेला नाही. दाभोळच्या गॅसचे तेच होणार हे स्पष्ट दिसते आहे.‘आळशास ही व्हावी कैसी जेटी गॅसदायिनी?’

2 comments:

  1. प्रय्तेक बाबतीतच महाराष्ट्राचे राज्यकर्ते झोपलेले दिसतात. त्यांना आपसातल्या लाथाळ्यांमधून आपल्या राज्याचे भले बघायला वेळच नाही. कर्नाटकात ते आपसात कितीही लढत असले तरी राज्यात रस्ते, धरणे व प्रवासी सुविधा अप्रतीम आहेत. त्यांचे tourism Dpt. तर फारच कार्यक्षम आहे. महाराष्ट्रातही तितक्याच पाह्ण्यासारख्या गोष्टि असून दुर्लक्षित आहेत! मध्यप्रदेश Tourism ने तर National Geography वर त्यांची कमिशन्ड जहिरात केली आहे. ति अप्रतीम आहे. गुजरात्ने अमिताभ बच्चनला घेऊन केलेली डोकुमेंटरी लाजवाब आहे. महाराष्ट्राचे असे काहीच नाही वाईट वाटतेर.

    ReplyDelete
  2. नुकसान महाराष्ट्राचे होते आहे, फायदा राजकारण्यांचा! आम्हीच याना निवडून देतो म्हणावे तर दुसर्‍या कोणाला निवडून देऊनहि काही बदल होणार नाही!

    ReplyDelete