Monday, June 11, 2012

१) ग्लास ब्लोइंग व २) जपानमधील जुना आतंक

ग्लास- ब्लोइंग
ही एक अद्भुत कला आहे पण ती आपणा सर्वसामान्यांच्या फारशी परिचयाची नसते. आजच्या पेपरमध्ये फोर्ड नावाच्या एका अशा कलाकाराची माहिती वाचली. दिवसा तो काचेची शास्त्रीय उपकरणे – उच्च दर्जाचीं व गुंतागुंतीच्या रचनेचीं – बनवणार्‍या कारखान्यात ग्लास-ब्लोइंगचे काम करतो व रात्री स्वतःच्या गॅरेजमध्ये आपल्या कलेचा वापर करून सुंदरसुंदर बस्तू बनवतो. त्याना कलात्मक मूल्य असतेच पण उत्तम किंमतही मिळते. त्याच्या कारखान्यातील कामाचे व कलेचे नमुने पहा.

औम शिनरिक्यो

१९९५ सालची जपानच्या टोकियो शहरातील एक भीषण बातमी अजून अनेकांच्या स्मरणात असेल. वर नाव दिलेल्या एका विचित्र व अघोर पंथाच्या काही लोकानी टोकियोच्या सबवे मध्ये मृत्युवायु सोडून हाहाःकार माजवला होता. १२ प्रवासी व एक स्टेशन कामगार त्यात मेले आणि इतर हजारोना यातना सोसाव्या लागल्या. त्या पंथाचे काही पुढारी व मुख्य गुरु ‘शोको आसाहारा’ तेव्हाच पकडले गेले पण काही आरोपी सापडले नव्हतेच. त्यातील एक स्त्री –नाव ‘किकुचि’ - टोकियोच्या परिसरात गरीब वस्तीत नाव बदलून एका सुतारकाम करणाराबरोबर 'तशीच'रहात होती व कोणाच्याही नजरेत येऊ नये अशा प्रकारे ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ असे दिवस काढत होती. ओळखण्याचा धोका टाळण्यासाठी त्यानी लग्नहि केले नव्हते! अचानक कोणीतरी तिला जुन्या काळातील पोलिसांच्या फोटोवरून अखेर ओळखलेच व ती पकडली गेली.

जुन्या व नव्या फोटोंमध्ये साम्य आहे पण ओळख पटणे सोपे नाही. ओळखणाराला पोलिसांकडून १,२५००० डॉलर बक्षीस मिळाले. आता तिच्याकडून मिळवलेल्या माहितीवरून एक अखेरचा फरारी आरोपीहि – नाव ‘टाकाहाशि’ - पकडता येईल अशी पोलिसाना आशा आहे. जपानमधील जनतेने ते सर्व प्रकरण विसरून जाण्याचे ठरवले होते पण पुन्हा एकदा त्या भीषण स्मृति जाग्या झाल्या आहेत.

1 comment:

  1. एका पोस्ट मध्ये मानवी मेंदूचा विधायक तर दुसर्या पोस्ट मध्ये विध्वंसक वापर केल्याचा उत्कृष्ट उदाहरण तेथी एकाच देशाचे दिले आहे.

    ReplyDelete