Sunday, May 13, 2012

भाड्याची गाडी आणि घरावर सोलर पॅनेल्स

भाड्याची गाडी
गाडी (कार) विकत घ्यायची नसेल तर तात्पुरती भाड्याने घेणे हा पर्याय अनेक व्यक्ति वा संस्था वापरतात. कित्येक ऑफिसांमध्येहि हा पर्याय वापरला जातो. मात्र डेट्रॉइट शहराच्या पोलिस खात्याची कथाच वेगळी! सध्याच्या येथील आर्थिक तंगीच्या काळात असे उघडकीस आले आहे कीं २००३ सालापासून या खात्याने एक २००४ मॉडेलची डॉज-इंट्रेपिड गाडी महिन्याला ६०८ डॉलर या दराने भाड्याने घेतली आणि अजूनहि ती तशीच भाड्याने चालू ठेवली आहे. मूळच्या भाडेकराराप्रमाणे २००५ साली ती परत करतां आली असती किंवा विकत घेतां आली असती आणि विकत घेतली असती तर नवीन मॉडेल मिळाले असते. खात्याने यातले काहीच केले नाही. भाड्याचा मीटर चालू राहिला आणि आजमितीस ५६००० डॉलर भाडे दिले एवढेच नव्हे तर आणखी १०,००० डॉलर,मूळचा करारापेक्षा खूप जास्त अंतर गाडी वापरली गेली या कारणास्तव जादा फी देणे आहे म्हणजे एकूण ६५,००० डॉलर झाले! २००३ साली भाड्या ऐवजी विकतच घेतली असती तर त्या गाडीची किंमत २५,००० डॉलर पडली असती.
खरी धक्कादायक गोष्ट ही कीं अशा शंभरचे वर गाड्या ज्यांचे लीज संपले आहे अशा अजूनहि ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे लाखो डॉलर विनाकारण खर्च पडले आहेत!
एकूण काय कीं इथे किंवा तिथे, एकच प्रकार, ‘आंधळं दळतंय …’

घरावर सोलर पॅनेल्स


आता सोलर पॉवरचा जमाना आहे. येथे घरावर लोकानी सोलर पॅनेल्स बसवावी यासाठी बर्‍याच सवलती दिल्या जातात. पूर्वीच्या मानाने आता किमतीहि खाली येत आहेत तरीहि अजून त्या सगळ्यानाच परवडण्यासारख्या खासच नाहीत. मोठमोठ्या कंपन्या आपल्या गोडाउन्सच्या छपरांवर सोलर पॅनेल्स बसवतात त्यात प्रसिद्धीचाहि काही भाग असतो.
एक नवीनच कल्पना वाचायला मिळाली. ती म्हणजे पॅनेल्स लीजवर बसवून देणे. म्हणजे काही कंपन्या जाहिरात करतात कीं तुम्हाला काडीचाहि खर्च न लावता आम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनेल्स बसवून देऊं. त्यातून निर्माण होणारी वीज तुमच्याच घरात तुम्ही वापरा. तिचे पैसे तुम्ही अमुक दराने आम्हाला दर महिना (मीटर दाखवील तितक्या युनिट्सचे) द्यावयाचे. हा दर वीज पुरवठा करणार्‍या कंपनीच्या वीजदरापेक्षा थोडा कमीच असतो त्यामुळे घरमालकाचा फायदा होतो. वीजनिर्मितीसाठी काही रोजचा खर्च नसल्यामुळे अशा मिळणार्‍या रकमेतून पॅनेल्स बसवणार्‍या कंपनीला भांडवली खर्च (वजा सरकारी सब्सिडी) व देखभाल खर्च विचारात घेऊनहि फायदा होतोच. पॅनेल्सना देखभाल नगण्य लागते (मात्र घरमालकाला ती कटकटीची ठरू शकते) आणि एकाच शहरात अनेक घरांवर अशी पॅनेल्स बसवली तर कंपनीला देखभाल व्यवस्था खर्चिक होत नाही. वीज खरेदी करण्याचा करार २० वर्षे अशा दीर्घ मुदतीचा असतो कारण पॅनेल्सचे आयुष्य तेवढे मानले जाते.
ज्या भागात विजेचा दर जास्त आहे तेथे ही योजना सर्वानाच लाभाची ठरते कारण घरमालकाला काही खर्च न करता विजेच्या खर्चात बचत होते शिवाय करारात नमूद केल्यापेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती फुकट! अडचण अशी एकच पडू शकते ती म्हणजे घर विकावयाचे झाल्यास नवीन मालकावरहि वीजखरेदी करार बंधनकारक असतो. अनेक कंपन्या आता अशा कराराच्या जाहिराती करताहेत. मुंबईतहि कदाचित टाटा पॉवर कंपनी असे करू शकेल पण मुंबईत स्वतंत्र घरे जवळपास नाहीतच त्यामुळे कठीण आहे.

1 comment:

  1. तुमचा लेख आवडला
    जर्मनी मध्ये सुद्धा घराघरांवर हि सौर उर्जेचे पेनेल दिसतात.
    पण माझ्या सासर्याच्या घरात मात्र त्यांनी अजूनही ते बसविले नाही आहे. कारण प्रचंड गुंतवणूक करण्यापेक्षा त्यांना अणूउर्जा स्वस्त पडते. येथे २०२२ पर्यंत अणुउर्जा टप्याटप्याने कमी करून सौर व पवन उर्जेवर भर द्यायचे ठरविले आहे. व हे तंत्रन्यान विकसित कार्याचे ठरविले आहे.

    ReplyDelete