सोलर पॉवर
अमेरिकेत वॉलमार्ट सारखी दुकानांची मालिका असलेल्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची दुकाने अवाढव्य असतात आणि साधारणपणे ही सर्व एकमजली इमारतीत असतात त्यामुळे त्यांच्या छपरांचे क्षेत्रफळ अफाट असते.
अशा अनेक दुकानांतून आता एक नवीनच बदल दिसून येऊ लागला आहे तो म्हणजे छपरांचा वापर सोलर विद्युतनिर्मितीसाठी करणे. छपराच्या विस्तीर्ण पसार्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर सोलर र्पॅनेल्स बसवली जातात. उत्पन्न होणार्या ऊर्जेचा वापर त्याच दुकानातून होत असल्यामुळे, साठवणे, दूर पाठवणे वगैरे भानगडी टळतात व त्यातून होणारा ऊर्जेचा व्ययहि टळतो.
अशा प्रकारे निर्माण होणार्या उर्जेचे प्रमाण फार झपाट्याने वाढते आहे. वॉलग्रीन कंपनीने देशभरात आपल्या १३४ दुकानांवर सोलर पॅनेल्स बसवली आहेत. वॉलमार्ट, कॉस्टको, कोह्ल अशा इतर कंपन्याहि तसे करत आहेत. IKEA या फर्निचर कंपनीनेहि वर्ष अखेरपर्यंत आपल्या सर्व दुकानांवर पॅनेल्स बसवण्याचे हाती घेतले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निरनिराळ्या कंपन्यांच्या ३,६०० ठिकाणी सोलर पॅनेल्स बसली आहेत. वॉलमार्टच्या १०० चे वर दुकानांवर बसलीं आहेत व एकूण १,००० प्रचंड दुकानांवर २०२० अखेरपर्यंत पॅनेल्स बसतील!
वॉलमार्ट, पॅनेल्सप्रमाणे Wind Turbines चाही उपयोग करूं पाहते आहे. रेड ब्लफ कॅलिफोर्निया येथील Distribution Center पाशी त्यानी १ मेगावॉट चे मोठे Turbine बसवले आहे.
हे सर्व वाचून मला प्रश्न पडला कीं असे काही भारतात कां होत नाही? मोठी दुकाने नाहीत पण कारखान्यांची प्रचंड छपरे आहेत, रेल्वेचे प्लॅट्फॉर्म आहेत. या सर्वांवर A C Sheets असतात. त्यांवर पॅनेल्स नक्कीच बसवता येतील. खालील भागात उष्णता कमी जाणवेल आणि निर्माण होणारी उर्जा तेथेच वापरता येईल. कोणाला तरी सुचेल अशी आशा करूं या.
No comments:
Post a Comment