Thursday, December 20, 2012

बलात्काराला फाशीची शिक्षा

दिल्लीमधल्या भयानक बलात्कार प्रकरणानंतर अनेक व्यक्ति, राजकीय वा इतरहि, सर्रास बलात्काराला फाशीची शिक्षा हवी असे म्हणू लागले आहेत. हे फारसे विचारपूर्वक बोलले जात आहे असे वाटत नाही. पूर्वीहि एकदा श्री. अडवाणीनी अशीच, फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. खुनासारख्या गुन्ह्यालाहि जगात अनेक देशात फाशीची शिक्षा दिली जात नाही. फाशीची शिक्षा अजिबात नसावी असा विचार जगात अनेक देशात मान्य झालेला आहे आणि जरी भारतात फाशीची शिक्षा रद्द झालेली नसली तरी जगातील जनमताचा रेटा भारताकडून तशी अपेक्षा करत आहे. भारतातहि, जरी खुनाच्या गुन्ह्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यातून काढून टाकलेली नसली तरी सुप्रीम कोर्टाने त्याच्या वापरावर स्पष्ट बंधने टाकलीं आहेत. Rarest of Rare Case मध्येच फाशी फर्मावतां येईल असा नियम केलेला आहे. तसेच फाशीची शिक्षा होण्यासाठी गुन्हा पूर्णपणे निरपवादपणे सिद्ध व्हावा लागतो. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन, सेशन्स कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट अशा तीनहि ठिकाणी फाशी फर्मावली गेली तरीहि त्यानंतर दयेच्या अर्जाची तरतूद आहेच व त्याचा निर्णय अनेक वर्षे लागत नाही ही वस्तुस्थिति आहे. बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाला तर काही फायदा आहे काय हा विचार करण्यासारखा विषय आहे. या गुन्ह्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असू शकते. पोलिस, वकील न्यायाधीश या सर्वांची फिर्यादी व आरोपीकडे बघण्याची दृष्टि निकोप असते असे म्हणणे धार्ष्ट्याचेच ठरेल. कोर्टात खटला चालताना, फिर्यादी ही जणू आरोपी असल्याप्रमाणे तिला वागवले जाते! उलटतपासणीबाबत आरोपीच्या वकिलाना फार सवलतीने वागवले जाते. याउलट , काही वेळेला आकसाने वा अन्य हेतूने खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रकारहि होत नाही असे नाही! फाशीच्या शिक्षेचा कायदा झाला तर आरोप सिद्ध होण्याच्या कसोट्या जास्तच कडक होतील. त्याबाबत आरोपीला झुकते माप मिळेल अशी साधार भीति आहे. आरोप सिद्ध झाला तरीहि, Rarest of Rare Case हे बंधन राहीलच. त्यामुळे खरोखरी प्रत्यक्षात किती आरोपीना फाशीची शिक्षा दिली जाईल याची शंकाच आहे. उलट, कसोट्या कडक झाल्यामुळे निर्दोष सुटण्याचे प्रमाण कदाचित वाढेलच!. त्यामुळे फाशी हे या प्रष्नाचे उत्तर नाही. पोलिसांकडून फिर्यादी व्यक्तीला विश्वासाची, आधाराची, आदराची व न्यायाची वागणूक मिळू लागली व कोर्टात केस चालवण्याच्या पद्धतीत व दृष्टिकोनात सुधारणा झाली तरच न्यायाच्या मार्गावर स्त्रियांचा विश्वास बसेल नाही तर ‘आपले दुर्दैव’ असे म्हणून होणार्‍या अत्याचाराना बळी पडण्यापासून स्त्रियांना सुटका नाही.

3 comments:

  1. बलात्कार व खून असा दुहेरी गुन्हा सिद्ध होऊन कलकत्ता हायकोर्टाने फाशी सुनावलेल्या गुन्हेगाराला या मंत्रीमंडळाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यानी माफी दिली तेव्हा हे लोक कुठे होते?

    ReplyDelete
  2. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे राष्ट्रपतीकडॅ दयेचा अर्ज करणे व त्यावर अखेरचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असणे हे घटना दुरुस्ती करून काढून टाकले पाहिजे.

    ReplyDelete
  3. माफी द्यायचा अधिकार असलाच तर तो फक्त बलात्कार झालेल्या स्त्रीला असू शकतो -आणि ती जगली नसेल तर तिच्या जवळच्या व्यक्तींना. पण हे सगळं व्यवस्था म्हणून अंमलात आणणं कठीण आहे.

    सध्या लोक करत असलेली मागणी - "बलात्का-याला फाशी द्या" - हा एक प्रकारचा भावनिक उद्रेक आहे. तो समजून घेतला पाहिजे - मान्य करायलाच हवा असं काही नाही.

    ReplyDelete