रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Thursday, December 13, 2012
हिंदु होता येते काय?
हिंदु होता येते काय?
काल एक बातमी वाचली ती विचार करण्यासारखी आहे. केरळच्या हायकोर्टाने एका केसमध्ये दिलेल्या निर्णयाची ती बातमी होती. एका मुस्लिम तरुणाने एका हिंदु मुलीशी लग्न केले होते. ते तिच्या घरच्या मंडळीना मान्य नव्हते व ते रद्दबादल ठरवावे असा दावा त्यानी केला होता. त्या तरुणाचे म्हणणे होते कीं त्याने हिंदु धर्म स्वीकारला होता व तो हिंदु झाल्याचे प्रमाणपत्र विश्व हिंदु परिषदेने दिले होते व त्यानंतर त्या दोघानी हिंदु विवाह कायद्याखाली लग्न केले होते. बातमीवरून असे दिसते कीं कोर्टाने त्याचा हिंदु झाल्याचा दावा अमान्य केला होता. व असे धर्म बदलून नवीन धर्माच्या कायद्याखाली केलेले लग्न बेकायदेशीर ठरवले व त्या दोघानी सिव्हिल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करावे म्हणजे ते कायदेशीर होईल असा त्याना सल्ला दिला. विश्व हिंदु परिषदेचा हिंदु करून घेण्याचा अधिकार कोर्टाने अमान्य केला असे म्हणता येईल. निर्णय देणारे दोन्ही जज्ज ख्रिश्चन होते याला काही महत्व देणे योग्य नाही पण ही गोष्ट लक्षात घेण्यास हरकत नाही. (ते हिंदु असते तर वेगळा निर्णय झाला असता?) त्या तरुणाने निर्णय मान्य करून कोर्टाच्या सल्ल्याप्रमाणे सिव्हिल मॅरेज रजिस्टर करण्याचे ठरवले असे बातमीत म्हटले होते.
या निर्णयाने माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. हिंदु आईबापाचीं मुलें आपोआप हिंदु ठरतात. हिंदु धर्मामध्ये अ-हिंदूला दीक्षा देणे असा काही प्रकार नाहीं. कोणतीहि अशी धार्मिक यंत्रणा नाहीं कीं जिला हिंदु म्हणून जन्माला न आलेल्या व्यक्तीला हिंदु करून घेण्याचा अधिकार आहे! विश्व हिंदु परिषदेने वा इतर एखाद्या व्यक्ति वा संस्थेने जरी काही धार्मिक विधि ठरवले व ते केल्यावर एखाद्या व्यक्तीला हिंदु झाल्याचे शिफारसपत्र दिले तरी त्याला धार्मिक वा कायदेशीर आधार नाही. सार्वत्रिक मान्यताहि नाही. हिंदु मुलीशी लग्न करण्यासाठी हिंदु होणे सोडा, पण एखाद्या अन्य धर्मीय व्यक्तीला हिंदु धर्म खरोखरच आवडला व त्याला हिंदु व्हावयाचे असेल तर त्याने काय करावे? अशी एखादी कायद्याला मान्य अशी, हिंदु होण्याची प्रक्रिया असावयास नको काय? हिंदु धर्माच्या नावाने गळे काढणार्या वा उर बडवणार्या व्यक्ति वा संस्थांनी यासाठी काही चळवळ वा मागण्या वा प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पण खरे तर अशी काही तजवीज अवश्य असायला हवी! मुस्लिम व ख्रिस्ती धर्मामध्ये दुसर्या धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्मात घेण्यासाठी दीक्षा देण्याची तरतूद आहे व त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने मुस्लिम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर त्याला कायद्याची मान्यता नाकारता येणार नाही. फक्त, आर्थिक व इतर प्रलोभन दाखवले गेले असे सिद्ध झाले तरच कायदा काही करूं शकेल.
बातमीतील मुस्लिम तरुणाचे जागी एखादा हिंदु तरुण असता व त्याने मुस्लिम / ख्रिस्ती मुलीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला असता व नंतर तिच्याशी मुस्लिम / ख्रिस्ती धर्माप्रमाणे विवाह केला असता तर कोर्टाने तो बेकायदेशीर ठरवला असता काय वा कोर्टाला तसे कायद्याप्रमाणे करता तरी आले असते काय हा मला पडलेला आणखी एक प्रश्न! बहुधा तसे करतां आले नसते! बातमी असे म्हणते कीं हे धर्म बदलून केलेले लग्न कोर्टाने बेकायदेशीर ठरवले. पण असे दिसते कीं फक्त हिंदु धर्मात प्रवेश करून केलेले लग्नच कायद्यात बसत नाही!
माझ्या मुस्लिम-ख्रिस्ती वाचकानी या निर्णयावरून धडा घ्यावा! हिंदु वाचकानी मात्र या विषयाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे असे मला वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोर्टाने जरी मुस्लीम/ ख्रिस्ती च्या विरोधात निर्णय दिला असता तरी तो राजकारणाने बदलला असता.
ReplyDeleteह्याच कारणास्तव माझ्या जर्मन पत्नीने माझ्याशी स्पेशल कायदा च्या अंतर्गत धर्म न बदलता लग्न केले.
ReplyDeleteतिला हिंदू होता न हे केवळ दुर्भाग्यपूर्ण आहे.
माझ्या मते हे दुर्भाग्यपूर्ण खरेच पण त्याला हिंदुसमाजाची उदासीनता व निष्क्रियता कारणीभूत आहेत. इतरधर्मीयांना सन्मानपूर्वक हिंदुधर्मात घेण्याची तरतूद आमच्यासाठी दुसरा कोणी आयती करून देणार आहे काय? कदाचित इंग्रजी राज्यकर्त्यानी ती केली असती! जर ते हिंदुधर्मी असते तर नक्कीच केली असती. श्री. आंबेडकरानी एवढा मोठा समाज हिंदुधर्माबाहेर नेला तेव्हांहि हिंदु धर्म कैवारी निष्क्रियच राहिले!
ReplyDeleteकृपया हे पण वाचावे - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008_09_01_archive.html
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्याला परत हिंदु करून. घेतले होते आणि मसुराश्रमात असे धर्मांतर होते,नरेंद्र महाराज पण धर्मांतर करवतात.
ReplyDeleteप्रश्न कायदेशीर मान्यतेचा आहे. तो सोडवणे हे मसुराश्रमाचे वा इतर कोणा व्यक्तीचे काम नाही. त्यासाठी योग्य त कायदेशीर तरतूद व्हावयास हवी व तशी मागणी हिंदु जनतेने केली पाहिजे. हिंदु होणार्या व्यक्तीला हिंदु विवाह कायदा वा हिंदु वारसा कायदा लागू होईल काय? सद्ध्या तरी तसे होणार नाही. कारण कायदाच नाही.
Deleteह्या विषयावर सर्व हिंदू संघटना एकत्र येउन एक मसुदा बनवावा व राजकीय पक्षांच्या मार्फत संसदेत कायदा करून घ्यावा,
ReplyDelete